षड्यंत्रावर शिक्कामोर्तब?

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

कोरोनाचा प्रसार जगभरात होऊ लागल्यानंतर काही शास्त्र्ाज्ञांनी, अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत तयार झालेला असून तो नैसर्गिक नसल्याचे दावे केले होते. आता ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या अहवालानुसार चीनने आपले विस्तारवादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठय़ा युद्धाची तयारी सुरू केली असून हे युद्ध चीनला अण्वस्त्रांनी नव्हे तर महासंहारक जैविक अस्त्रांनी लढायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना हा यासाठीच्या षड्यंत्राचाच एक भाग असल्याचे हा अहवाल सांगतो.

द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या प्रसिद्ध वृत्तपत्रातील एका अहवालात नुकताच एक अत्यंत खळबळजनक स्वरूपाचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सबळ पुरावे आलेले असून हे पुरावे या निर्णयाप्रत घेऊन जाऊ शकतात की कोरोनाची निर्मिती ही कोणत्याही पद्धतीने नैसर्गिक नसून किंवा ती अपघातात्मक पद्धतीने झालेली नसून हा एक अत्यंत मोठय़ा चिनी षड्यंत्राचा भाग आहे, असा दावा या वृत्तपत्रातील अहवालाने केला आहे. चिनी सरकारमधून फुटलेल्या या दस्तावेजांची खातरजमा करण्यात आली असून ते अस्सल असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. ‘सार्सचा अनैसर्गिक स्रोत आणि तिसरे महायुद्ध लढणाऱया जनुकीय जैविक अस्त्र्ाांच्या मानवनिर्मित प्रजाती’ या शीर्षकांतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी याबाबतची सर्व माहिती गोळा केली असून ती त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला सादर केलेली आहे. त्यावरून चीनने तिसऱया महायुद्धाची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज जागतिक सत्तासमीकरणे, सत्तास्पर्धा आणि वर्चस्व या सर्व गोष्टी अर्थकारणाशी निगडित आहेत. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, सक्षम आहे त्या देशाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा प्रभाव मोठा आहे. ही बाब अचूकपणाने ओळखून चीनने इतर राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कशा प्रकारे डबघाईला येतील आणि आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे सदृढ बनेल अशा दृष्टिकोनातून कोरोनाची निर्मिती केली. कोरोनाचा मुख्य उद्देश हा शत्रू देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हा होता. आज चीनचा कोरोनानिर्मितीमागचा हा उद्देश बऱयाच अंशी सफल होताना दिसत आहे. कारण आज जगामध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी, चौथी लाट येत आहे. युरोपमधील संपूर्ण मोठय़ा अर्थव्यवस्था कोरोनाच्या महासंकटाने पूर्णतः कोलमडल्या आहेत. सातत्याने लॉक डाऊनचा पर्याय अवलंबावा लागत असल्याने त्यांचे अर्थचक्र थंडावले आहे. कोरोना संकटाने जगभरातील अनेक देशांमधील मोठमोठे उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये पाच कोटी लोक कोरोना संकटकाळात बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाने मरण पावणाऱयांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेलेली आहे. कोणताही देश आज या संकटापासून पूर्णतः मुक्त झाल्याचा दावा करू शकत नाहीये. परिणामी एकंदर जगाची स्थिती आज अत्यंत बिकट बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून प्रत्येक देशांच्या आर्थिक विकासासंदर्भातील आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यामध्ये बहुतांश देशांचा आर्थिक विकासाचा दर 2021-22 या वित्तीय वर्षांतही नकारात्मकच राहील असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. कोरोनाने जगाला अनेक वर्षे मागे लोटलेले आहे. एखाद्या युद्धामध्येही जितके नुकसान होत नाही त्याहून महाभयंकर नुकसान कोरोनाच्या महासंकटामुळे होताना दिसत आहे.

एकीकडे ही सगळी परिस्थिती असताना ज्या चीनमध्ये कोरोनाचा उगम आणि प्रसार झाला तेथे मात्र सारे काही आलबेल असल्याचे दिसत आहे. आज इतर देशांमध्ये लसीकरणासाठी मोठमोठय़ा मोहिमा हाती घेतल्या जात आहेत, प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी झटताना दिसत आहे; पण चीनमध्ये मात्र अशी कोणतीही मोहीम हाती घेतली गेलेली दिसून येत नाहीये. तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश देशांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः लॉकडाऊन केले जात आहेत, पण असे लॉकडाऊन चीनमध्ये दिसून आले नाहीये. संपूर्ण जग चिंताक्रांत, निराश आणि हतबल झालेले असताना चीनमध्ये मोठमोठे समारंभ पार पडत आहेत. ज्या वुहानमधून कोरोनाचा उगम झाला तेथे नुकताच स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिव्हल साजरा झाला. या फेस्टिव्हलमध्ये लाखो चिनी लोक सहभागी झाले होते. तिथे कसल्याही प्रकारच्या मास्कची वा सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करण्यात आली नव्हती. यामुळे चीनसंदर्भातील गूढ आता वाढू लागले आहे.

दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसलेला नसल्याचे दिसत आहे. आज बहुतांश देशांचे व्यापार आणि निर्यात यावर कोरोनाचा मोठा आघात झाला आहे, परंतु चीनची निर्यात मात्र प्रचंड वाढलेली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी लागणाऱया साहित्याच्या व्यापारातून चीन बक्कळ नफा कमावताना दिसत आहे. कोरोनावरच्या लसीच्या निर्यातीत चीनचा वाटा सर्वाधिक आहे. कोरोना लसींच्या एकूण निर्यातीपैकी 50 टक्के निर्यात एकटय़ा चीनकडून होत आहे. त्यातून चीन अब्जावधी डॉलर्स नफा कमावतो आहे. थोडक्यात, कोरोनामुळे जग बुडत असताना चीन पूर्णपणे फायद्यात येताना दिसत आहे.

चीनचा यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तेथील साम्यवादी एकाधिकारशाही राजवटींपुढे एखादे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यांच्या लेखी माणसाचे आयुष्य फार महत्त्वाचे नसते. उदाहरणच घ्यायचे तर मागील काळात बीजिंगमध्ये तियांन मेन स्क्वेअरमध्ये शांततामय मार्गाने सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी चीनने त्यांच्यावर रणगाडे चालवले आणि त्यांना चिरडून मारून टाकले होते. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, साम्यवादाचा प्रभाव टिकवण्यासाठी चीनमधील हुकूमशहा कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. कोरोनाबाबत विचार करता चीनने असे का केले असेल याचा विचार केला तर चीन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी देश आहे. चीन त्याला ‘मिडल किंगडम थिअरी’ म्हणतो. म्हणजेच जगाच्या नकाशात चीन केंद्रस्थानी आहे आणि आम्ही जगाला नेतृत्व दिले पाहिजे अशी एक मोठी महत्त्वाकांक्षा चीनमध्ये आहे. या महत्त्वाकांक्षेपोटी चीन सदैव तयारी करत असतो; परंतु अमेरिका असेपर्यंत ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे चीनला माहिती आहे. कारण चीनच्या तुलनेत अमेरिका प्रगत आहे. त्यामुळे चीनला अमेरिकेचा समोरासमोर सामना करणे, युद्धमार्गाने मुकाबला करणे शक्य नाही. शिवाय अंतराळ, सामरीक यांसारख्या क्षेत्रात अमेरिकेचा मुकाबला करणे चीनला शक्य नाही. त्यामुळे कटकारस्थानाच्या माध्यमातून अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रयत्न चीन करतो आहे असा दावा काही अभ्यासक करू लागले आहेत. या अभ्यासकांनी काही साहित्याचे संदर्भही दिलेले आहेत. त्यानुसार अमेरिकेचा सामना कसा करता येईल यासाठी चीनमधील लष्करी अधिकाऱयांनी काही साहित्यनिर्मिती केली होती. त्यामुळे अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्यासाठी चीनने हा विषाणू तयार केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सार्ससारखा विषाणू चीनमधूनच आला होता.

आता मुद्दा उरतो तो म्हणजे जरी चीनविरोधात सबळ पुरावे असले तरी त्यांच्याविरोधात कारवाई करणार कोण? कारण गेल्या दशकभरात चीन एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आलेला आहे. अनेक देशांना चीनने भरमसाट कर्जे देऊन त्यांची स्वायत्तताच आपल्याकडे गहाण ठेवली आहे. अनेक मोठय़ा देशांत चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकी आहेत. चीन हा सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या 15 महत्त्वाच्या समित्यांचा चीन सदस्य आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरून चीनविरोधात काही कारवाई केली जाणे हे खूप अवघड आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जरी एखाद्या देशाने धाव घेतली आणि न्यायालयाने चीनविरोधात निकाल दिला तरी त्याची अंमलबजावणी कोण करणार हा प्रश्नच आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय समुदायामध्येही एकी नाहीये. उलट चीन, रशिया, इराण, पाकिस्तान हे देश एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे जगाला महासंकटाच्या खाईत लोटूनही चीन नामानिराळाच राहण्याची शक्यता अधिक आहे.

चीनने आपल्या विस्तारवादाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला मूर्त रूप देण्यासाठी ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) हा प्रकल्प हाती घेतला होता. सुरुवातीला या प्रकल्पामध्ये 70 हून अधिक देश सहभागी होणार होते, परंतु आता या प्रकल्पाला बहुतांश देश विरोध करू लागले आहेत. कारण यामागचा चीनचा कावेबाजपणा हळूहळू अनेक देशांना उमगू लागला आहे. त्यामुळे चीनने आपले विस्तारवादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता एका मोठय़ा युद्धाची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे चीनला हे युद्ध अण्वस्त्रांनी लढायचे नाहीये तर त्यासाठी महासंहारक जैविक अस्त्र्ाांचा वापर करण्याचा त्यांचा डाव आहे. ही तयारी एक दशकापूर्वीच चीनने सुरू केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या तयारीचा भाग म्हणजेच कोरोना विषाणूची निर्मिती ही प्रयोगशाळेत करण्यात आली. थोडक्यात, कोरोना हा एका मोठय़ा षड्यंत्राचा भाग आहे अशा स्वरूपाचे खळबळजनक वृत्त ‘द ऑस्ट्रेलियन’ने दिले आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या