पाकिस्तान-तालिबानचं का बिनसलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने ज्या तालिबानला आपले हत्यार बनवले होते तोच तालिबान आज पाकिस्तानच्या गळ्यातील फास बनू पाहात आहे. अफगाणी सैन्याविरोधातील युद्धात पाकिस्तानने तालिबानला उघड मदत केली. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा सर्वात मोठा हितचिंतक बनण्याची पाकिस्तानची इच्छा होती, मात्र झाले उलटेच! सध्या डय़ुरंड लाइनवरून तालिबान-पाकिस्तान हे आमने-सामने उभे ठाकले आहेत. तालिबान सरकार पाकिस्तानी लष्कराकडेच डोळे वटारून पाहत असेल तर इम्रान खान सरकार तालिबानला समर्थन का देत आहेत, असा प्रश्न आता पाकिस्तानातील विरोधक विचारू लागले आहेत.

तालिबान आणि पाकिस्तानच्या नात्यामध्ये अखेरीस जे घडणार याची शक्यता होती तेच घडले आहे. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि बोलघेवडे परराष्ट्रमंत्री शाह महमूद पुरेशी हे तालिबानसाठी जगभरात समर्थन मागत फिरत आहेत, तर दुसरीकडे तालिबान डय़ुरंड लाइन मानण्यास तयार नाही आणि पाकिस्तानच्या हद्दीत तालिबानने तोफांचा मारा सुरू केला आहे. इतकेच नव्हे तर तालिबानच्या सुरक्षेत असलेले तहरीक-ए-तालिबानचे दहशतवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करत आहेत. यामुळे दोघांमधील तणाव वाढला आहे. डय़ुरंड लाइन हा 19 व्या शतकातील रशियन आणि ब्रिटिश साम्राज्यामधील ग्रेट गेमचा वारसा आहे. तत्कालीन भयभीत ब्रिटिश साम्राज्याने पूर्वेकडील रशियन विस्तारवाद टाळण्यासाठी अफगाणिस्तानचा बफर झोन म्हणून वापर केला. 12 नोव्हेंबर 1893 रोजी ब्रिटिश नागरी सेवक सर हेन्री मॉर्टिमर डय़ुरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात डय़ुरंड लाइनवर स्वाक्षरी झाली होती. तथापि, तालिबानची नवी राजवट ही डय़ुरंड लाइन, त्याचे सीमांकन मानण्यास तयार नाहीये.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर हिंदुस्थानने तेथे लावलेली विकासाची रोपटी सुकून जातील, कट्टरतावाद हा विकास गिळून टाकेल असे वाटले होते, परंतु तसे घडले नाही. तेथील तालिबानी आजही हिंदुस्थानची प्रशंसा करतात. हिंदुस्थानने पाठविलेल्या मदतीबद्दल त्यांनी हिंदुस्थानचे आभारही मानले आहेत. आपल्या देशात हिंदुस्थानने सुरू केलेले प्रकल्प सुरू ठेवावेत, असे तालिबानी युद्ध सुरू असल्यापासूनच सांगत आले आहेत. याउलट जो पाकिस्तान युद्धकाळात तालिबान्यांचा हितचिंतक आणि सल्लागार होता, त्याच्यावरच तालिबानी आता नाराज आहेत. हिंदुस्थानने नुकतीच अफगाणिस्तानात वैद्यकीय सामग्री पाठविली. मदत साहित्यासह हिंदुस्थानात अडकून पडलेल्या 90 अफगाणी नागरिकांनाही विमानातून मायदेशी पाठविण्यात आले. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंदजे यांनी सांगितले की, हिंदुस्थानने 1.6 मेट्रिक टन जीवनरक्षक औषधे पाठविली आहेत. ही औषधे काबूलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात येतील आणि त्यानंतर काबूलच्या इंदिरा गांधी बाल चिकित्सालयात ती पाठविली जातील असे सांगितले गेले आहे. ममुंदजे यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मी ही मदत पाहून भावूक झालो आहे. हिंदुस्थानला धन्यवाद!

अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरण्यात येणार नाही, असे आश्वासन तालिबानने नेहमीच दिले आहे. हिंदुस्थाननेही आधीपासूनच अफगाणिस्तानात मानवतेच्या भूमिकेतून मदत पाठविली आहे. हिंदुस्थानकडून पाकिस्तानमार्गे 50 हजार टन गहू अफगाणिस्तानात पाठविला जाणार आहे. मानवतेच्या भूमिकेतून अफगाणिस्तानला मदत करणार असल्याचे अमेरिकेनेही म्हटले आहे. ही मदत थेट तालिबानच्या स्वाधीन न करता आंतरराष्ट्रीय मदतीचे वाटप करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारला जगातील सर्व देशांनी मान्यता द्यावी, असे पाकिस्तानला वाटते, परंतु अद्याप तरी तसे घडलेले नाही. युद्धात पाकिस्तानने तालिबानला उघड मदत केली. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा सर्वात मोठा हितचिंतक बनण्याची पाकिस्तानची इच्छा होती, मात्र झाले उलटेच!

एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी इम्रान खान सरकारकडे केली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार सरहद्दीवर तारेच्या कुंपणाचे काम करू देत नाही तसेच दोन्ही देशांदरम्यानची सीमारेषा मानण्यासही तालिबान तयार नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. तालिबान सरकार जर पाकिस्तानी लष्कराकडेच डोळे वटारून पाहत असेल तर इम्रान खान सरकार तालिबानला समर्थन का देत आहे, असा पाकिस्तानातील विरोधकांचा सवाल आहे. हिंदुस्थान सरकारचे अफगाणिस्तानविषयक धोरण यशस्वी होत असल्याचे अफगाणिस्तानातील परिस्थितीवरून दिसून येते. दुसरीकडे तालिबानसाठी एवढे सगळे करूनसुद्धा पाकिस्तानला अफगाणिस्तानमधील तालिबानकडून विरोध सहन करावा लागत आहे. सीमेवर काटेरी कुंपण उभारणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना जीव वाचवून पळ काढावा लागला आहे.

एकंदरीत पाहता अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने ज्या तालिबानला आपले हत्यार बनवले होते तोच तालिबान आज पाकिस्तानच्या गळ्यातील फास बनू पाहात आहे. वास्तविक, अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित करण्यामागे पाकिस्तानचा खूप मोठा हात होता. मुळात तालिबानचा उगम हा पाकिस्तानात विद्यार्थी चळवळीतून झालेला आहे. आज तालिबान ड्रग्ज माफिया, शस्त्रास्त्रांची चोरटी आयात, रिअल इस्टेटमधील काळा पैसा या सर्वांशी जोडला गेलेला आहे. तालिबानला लष्करी साहित्य, शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची सर्व ती मदत पाकिस्तानकडून केली जाते. तसेच अमली पदार्थांच्या तस्करीतून, दाऊदसारख्या अंडरवर्ल्ड डॉनच्या व्यवसायातून आलेला पैसा हा तालिबानला आर्थिक रसद म्हणून पुरवला जातो. या सामरिक आणि आर्थिक भक्कम पाठिंब्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव करण्यात यश मिळवले. पाकिस्तानने हे करण्यामागचे कारण म्हणजे अफगाणिस्तानचे सामरिक स्थान. मध्य आशिया, पूर्व आशिया आणि पश्चिम आशिया या तिन्हींना जोडणारा देश म्हणून अफगाणिस्तानची ओळख आहे. त्यामुळे अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवल्याने या तिन्ही उपखंडांवर प्रभाव पाडणे सोपे जाते. त्यामुळेच पाकिस्तान अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी प्रयत्नशील होता. अमेरिकन फौजा माघारी फिरून तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर पाकिस्तानचे मोठे स्वप्न पूर्ण झाले. तालिबान हा होमोजिनियस किंवा एकजिनसी गट नाहीये. तालिबानमध्ये एकूण सहा प्रमुख टोळय़ा आहेत. त्यांच्यात अंतर्गत मतभेद प्रचंड आहेत. त्यामुळेच डय़ुरंड लाइनवरील वादावर पडदा पडल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा हा वाद उभा राहिला. येणाऱ्या काळात तालिबानपुढे झुकायचे की त्यांना शह द्यायचा, हा मोठा पेच पाकिस्तानपुढे आणि इम्रान खान यांच्यापुढे असणार आहे. कारण पाकिस्तानातील त्यांचे विरोधक आता तालिबानच्या मुद्दय़ावरून इम्रान यांच्यावर ताशेरे ओढू लागले आहेत.

आपल्या देशातील हस्तक्षेपाबद्दल तालिबान पाकिस्तानवर आधीपासून नाराज होताच, त्यातच नांगरहार प्रांतात सीमेवर काटेरी तारेचे कुंपण उभारत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना तालिबानने नुकतेच रोखले. या वेळी काटेरी तारेसह अन्य सामग्री तालिबानने जप्तही केली. पाकिस्तानी सैनिकांना तेथून पळून जावे लागले. या भागात तालिबानने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून टेहळणी सुरू केली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान एकंदर 2600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. पाकिस्तानने आपल्या अनेक भागांवर कब्जा केला असल्याची तक्रार अफगाणिस्तान पूर्वीपासूनच करीत आहे. या सीमेवर तारेचे कुंपण उभारून अफगाणी नागरिकांची ये-जा बंद करण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचा प्रवक्ता इनायतउल्लाह खावर आजमी यांनी या घटनेला पुष्टी दिली आहे. पाकिस्तान नांगरहार प्रांतात काटेरी तारांचे कुंपण उभारू इच्छित असून, आम्ही त्याला रोखले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे त्याने म्हटले आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)