लूक आफ्रिका

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

केंद्र सरकार आफ्रिकेकडे विशेष लक्ष देत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 29 उच्चपदस्थांनी आफ्रिकेला भेटी दिल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच अशा भेटी झाल्या. हिंदुस्थानसाठी आफ्रिका हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंदुस्थानने आग्नेय आशियाई देशांबरोबर संबंध घनिष्ठ करण्यासाठी ‘लूक ईस्ट’ किंवा ‘ऍक्ट ईस्ट’ हे धोरण विकसित केले. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात पश्चिम आशियाई देशांशी संबंध घनिष्ठ करण्यासाठी ‘लूक वेस्ट’ या पॉलिसीविषयी हिंदुस्थानने प्रयत्न सुरू केले. तशाच प्रकारे आता आफ्रिकेबाबतही ‘लूक आफ्रिका’ किंवा ‘ऍक्ट आफ्रिका’ असे एखादे धोरण हिंदुस्थानने अवलंबिले पाहिजे.

गेल्या आठवडय़ात दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा परिणाम हिंदुस्थान- आफ्रिका या देशांच्या संबंधांवर झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सात दिवसांचा आफ्रिका दौरा नुकताच पार पडला. या सात दिवसांमध्ये राष्ट्रपतींनी तीन देशांना भेटी दिल्या, तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मोझांबिक या देशाचा दौरा केला. केंद्र सरकारचा आफ्रिकेवरील भर यातून स्पष्ट होतो. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकार आफ्रिकेकडे विशेष लक्ष देत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 29 उच्चपदस्थांनी आफ्रिकेला भेटी दिल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच अशा भेटी झाल्या. मध्यंतरी इंडिया – आफ्रिका फोरमची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडली होती. त्यामध्ये 41 आफ्रिकन देशांचे प्रमुख आले होते. हा एक प्रकारचा इतिहासच आहे. 2015 मध्ये झालेल्या या बैठकीत आफ्रिकन देशांना 10 हजार डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा केली होती. 2017 मध्ये अतिरिक्त 8 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास होकार देण्यात आला. त्याव्यतिरिक्त अत्यंत गरीब आफ्रिकन देशांना हिंदुस्थानात मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या सर्वांवरून हिंदुस्थान आता मोठय़ा प्रमाणावर आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित करतो आहे हे स्पष्ट होते.

हिंदुस्थान आणि आफ्रिका यांमधील व्यापार हा 2000 सालापासून जास्त वाढीला लागलेला आहे. आज दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास 70 अब्ज डॉलर्स इतका आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानची आफ्रिकेतील गुंतवणूकही मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे. हिंदुस्थानची आफ्रिकेतील गुंतवणूक 50 अब्ज डॉलरची आहे. आफ्रिकन देशांना हिंदुस्थान मोठय़ा प्रमाणात विकास निधी देत आहे. त्याचप्रमाणे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी या आफ्रिकन देशांच्या संघटनांनाही हिंदुस्थानकडून मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. तसेच आज 30 लाख हिंदुस्थानी आफ्रिकेत आहेत. यामध्ये व्यावसायिक, अभियंते यांचा समावेश आहे. हिंदुस्थान अफगाणिस्तानात, पॅलेस्टाईनमध्ये विकासात्मक भूमिका पार पाडत आहे, तशाच प्रकारची विकासात्मक भूमिका हिंदुस्थान आफ्रिकेमध्ये पार पाडत आहे. हिंदुस्थानचे विकासाचे 137 प्रकल्प हे आफ्रिकेतील 41 देशांमध्ये सुरू आहेत.हिंदुस्थानने ‘क्षमता विकास कार्यक्रम’ आखून त्याद्वारे 25 हजार आफ्रिकन लोकांना क्षमता विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.

आफ्रिका खंड हा भौगोलिकदृष्टय़ा दुसऱया क्रमांकाचा खंड आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा सर्वात मोठा खंड आहे. या खंडाची लोकसंख्या जवळपास 1.7 अब्ज एवढी आहे. या खंडात एकूण 54 देश येतात. गेल्या दोन दशकांमध्ये या सर्व देशांची आर्थिक प्रगती ही अतिशय गतिमान झालेली आहे. या आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्था वार्षिक पाच टक्के दराने विकसित होत आहेत. या देशांचा ‘सकल घरेलू उत्पन्न’ म्हणजे ‘जीडीपी’ 2.8 ट्रिलियन डॉलर एवढा आहे. जसा हिंदुस्थानात आर्थिक उदारीकरणाच एक भाग म्हणून मध्यमवर्ग वाढीला लागलेला आहे, त्याच प्रकारचा मध्यमवर्ग हा आफ्रिकेतही वाढीला लागलेला आहे. हिंदुस्थानात ज्याप्रमाणे तरुणांची संख्या अधिक आहे तशीच आफ्रिकेमध्येही तरुणांची संख्या ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोलियम पदार्थ (खनिज तेल) आणि सोन्यासारखे विविध धातू यांचे फार मोठे स्रोत आफ्रिकेमध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आफ्रिकेकडे लागलेले आहे. आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील मोठे देश अमेरिका, जपान, चीन यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे. यामध्ये सध्या तरी चीनने बाजी मारलेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून चीनने अतिशय पद्धतशीरपणे आफ्रिकेतील तेल उत्खनन क्षेत्रात व साधन संपत्तीचा विकास या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याचा परिणाम आफ्रिकेतून एकटय़ा चीनला 12 टक्के निर्यात होते, जी सर्वाधिक आहे. आफ्रिकेकडून हिंदुस्थानला होणारी निर्यात ही फक्त चार टक्के आहे. थोडक्यात, चीन या स्पर्धेत फार पुढे गेला आहे. हिंदुस्थान हा आफ्रिकेबरोबर तिसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, पण हिंदुस्थानने आपले स्थान आणखी प्रबळ करणे गरजेचे आहे.

हिंदुस्थानसाठी आफ्रिका हा अत्यंत महत्त्वाचा आहे याचे कारण हिंदुस्थानला पेट्रोलियम (खनिज तेल) पदार्थांसाठी आणि सोन्यासाठी आफ्रिकेच्या मदतीची गरज आहे. आफ्रिकेमध्ये तेलाचे साठे विपुल प्रमाणात आहेत. तसेच हिंदुस्थानच्या मेक इन इंडिया प्रकल्पातून जी उत्पादने तयार होतील त्यांच्या निर्यातीसाठी आफ्रिकेची बाजारपेठ महत्त्वाची आहे. हिंदुस्थानकडून आफ्रिकेला होणाऱया निर्यातीत तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत- अ) औषधांची निर्यात, ब) प्रक्रिया केलेल्या पेट्रोलियम पदार्थांची निर्यात, क) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि शिक्षण क्षेत्रात आपण त्यांना फार मोठय़ा प्रमाणावर मदत करतो. दोन्ही देशांमधील आयात-निर्यात समुद्रमार्गाने होते आणि त्यामुळे या वाहतुकीचे चाच्यांपासून संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे चाचे जहाजांचे खंडणीसाठी अपहरण करतात. त्यांच्यापासून जहाजांचे आणि हिंदुस्थान आफ्रिकेला जोडणारा जो समुद्री मार्ग आहे, त्याचे संरक्षण हा मुद्दा असतो. हिंदुस्थान सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी हिंदुस्थानला आफ्रिकन देशांकडून फार मोठा पाठिंबा लागणार आहे. असे करताना आफ्रिकेत काही आव्हानेदेखील आहेत. त्यामुळे हिंदुस्थानने आग्नेय आशियाई देशांबरोबर संबंध घनिष्ठ करण्यासाठी ‘लूक ईस्ट’ किंवा ‘ऍक्ट ईस्ट’ हे धोरण विकसित केले. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात पश्चिम आशियाई देशांशी संबंध घनिष्ठ करण्यासाठी ‘लूक वेस्ट’ या पॉलिसीविषयी हिंदुस्थानने प्रयत्न सुरू केले. तशाच प्रकारे आता आफ्रिकेबाबतही ‘लूक आफ्रिका’ किंवा ‘ऍक्ट आफ्रिका’ असे एखादे धोरण हिंदुस्थानने अवलंबिले पाहिजे.

(लेखक परराष्ट्रधोरण विश्लेषक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या