
हिंदुस्थानात दरवर्षी 1.3 दशलक्ष कॅन्सरची नवीन प्रकरणे आढळून येतात आणि त्यापैकी 8.5 लाखांहून अधिक व्यक्तींना जीव गमवावा लागतो. सध्या तरुण वयोगटातील महिलांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक असून 44 ते 54 वयोगटातील महिलांनी वर्षातून एकदा तरी मेमोग्राम करणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्तनाचा कर्करोग हा जागतिक दर्जावर चिंतेचा विषय ठरत आहे. ग्लोबोकन 2020 च्या अहवालानुसार आपल्या देशात दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक कर्करोगाची नवीन प्रकरणे आढळून येतात. त्यातील नव्वद हजारांहून अधिक व्यक्तींना स्तनाच्या कर्करोगामुळे जीव गमवावा लागतो. सुरुवातीच्या टप्प्यात स्तनाच्या कर्करोगाचे निदान केल्यास त्यावर मात करणे शक्य होते. स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वयं स्तन तपासणी, क्लिनिकल तपासणी तसेच वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गाठ आढळल्यास डॉक्टरांकडून ती गाठ तपासून घेणे, स्तनाची सोनोग्राफी, मॅमोग्राफी किंवा एमआरआय करून तिचा शोध घेणे. ती गाठ घन आहे की द्रवपदार्थाने भरलेली आहे हे निश्चत करण्यास या तपासणीमुळे मदत होते. गाठ संशयास्पद आढळल्यास त्या गाठीची बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो. 44 ते 54 वयोगटातील महिलांनी वर्षातून एकदा तरी मेमोग्राम करणे गरजेचे आहे. मॅमोग्राम केल्यास सुरुवातीच्या टप्प्यावरच कोणत्याही प्रकारचा कर्करोग ओळखण्यास मदत होते. वयाच्या 54 वर्षांनंतर महिलांनी दर दोन वर्षांनी किंवा ज्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे अशा महिलांनी दरवर्षी मॅमोग्राम करून घेणे आवश्यक आहे. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांकरिता मॅमोग्राम किंवा स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असल्यास मॅमो-सोनोग्राम करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी कोणतीही लक्षणे आढळल्यास महिलांनी योग्य तपासणी तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखणे, जसे की, स्तन किंवा काखेत गाठ होणे, स्तनाग्रातून स्राव होणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, आयरोला किंवा स्तनाजवळील त्वचेचे स्वरूप बदलणे तसेच स्तनाग्रात होणारे बदल वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
निरोगी जीवनशैली बाळगल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. अल्कोहोलचे सेवन टाळणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तपासणी आणि कर्करोगाबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात स्तन कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास असल्यास त्याची कल्पना तुमच्या डॉक्टरांना देणे आवश्यक आहे. वेळीच लक्षणे समजून घेणे आणि योग्य वेळी त्यांचे व्यवस्थापन करणे हे स्तनाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहेत.
– डॉ. श्रुती गांधी
(सल्लागार, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि हेमॅटोलॉजी, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, पुणे)

























































