मानसिक विकारांचं स्वरूप जीवनशैलीशी निगडित

>>डॉ. शुभांगी पारकर

हिंदुस्थानात मानसिक आजाराची मर्यादा ही वेडेपणा एवढीच मानली जाते, पण मानसिक आरोग्याच्या समस्या यापेक्षा कमी तीव्रतेच्या असतात. नैराश्य, चिंता वगैरे यात माणसाचं आरोग्य योग्य दिसतं परंतु त्याच्या मानसिक विकाराने त्याचे जगणे मुश्कील केलेले असते. निराशेचा आजार किंवा डिप्रेशन ही तशी एक समस्या आहे. असे अनेक मनोविकार आढळून येतात. ज्यामुळे त्याची आनंद अनुभवायची क्षमता कमी होते आणि मग त्याची जगण्याची ऊर्जाच नष्ट व्हायला लागते. मानसिक रुग्णंना सर्वप्रथम हवी असते ती आधाराची गरज कारण, मानसिक दृष्टिकोनातून पाहिले तर व्यक्तीला असहाय्य वाटते, आपण निरर्थक आहोत आणि निरुपयोगी आहोत असे वाटते. इतर आजारांत व्यक्तींची शारीरिक क्षमता कमी होते तर मनोविकारांमध्ये मात्र त्यांच्या मनावरच घाला गेलेला असतो. म्हणूनच अशा रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य मिळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने मनोविकार झालेल्या रुग्णांना उपचारासाठी विम्याचे संरक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

माणसाला जसे शारीरिक विकार होत असतात त्याचप्रमाणे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात. तथापि शारीरिक विकार दृश्य स्वरूपात असतात. परंतु मानसिक विकार वैयक्तिक असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने ञस्त आहेत. म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे म्हणणे वावगे ठरू नये.

मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभीर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने ऑगस्ट 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा चालू आहे जेणे करुन सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा. याअंतर्गत आता ग्रामीण भागात तालुका पातळीवर शासनाद्वारे उपचार केंद्रं उभारण्यात आली आहेत. आपल्या सर्वाजनिक आरोग्य विभागात मनोरुग्णांसाठी त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात. यात अद्ययावत उपचार पद्धती, औषधोपचार, समुपदशेन अशा विविध मार्गांनी सेवासुविधा दिल्या जातात. मात्र खासगी पद्धतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांना अमर्याद खर्चांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी हा निर्णय लाभकारक आहे.

मानसिक आजार असलेल्या रुग्णांबाबत आपल्याकडे 1987 मध्ये मानसिक आरोग्य विधेयक करण्यात आले. ज्यात सर्वतोपरी मनोरुग्णांच्या हक्कांचा विचार करण्यात आला आहे. आता त्यानंतर मागच्या वर्षी या कायद्याच्या च्या जागी सरकारने नवीन मानसिक आरोग्य काळजी विधेयक मंजूर केले. ज्यात मानसिक आजारग्रस्तांच्या हक्कांना महत्त्व देण्यात आले आहे. डॉक्टरने गरजेनुसार रुग्णावर कठोर पद्धतीने उपचार करण्याची तयारी दाखविली तर तो ती नाकारू शकतो. या अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे आरोग्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती जाणून घेण्याबाबत आपण उदासीन आहोत.

आपल्याकडे मानसिक विकारांचं स्वरूप हे आपल्या जीवनशैलीशी निगडित आहे. यात व्यसनाधीनता, नातेसंबंधातील तणाव, भावभावनांचा अतिरेक या गोष्टींचा समावेश होतो. पुरुषांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण जास्त दिसून येत असे परंतु आता यात स्त्र्ायांचेही प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे. मानवी मनाच्या त्रस्त भावनाचे शारीरिक लक्षणांत रूपांतर होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. या मागची मानसिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
डॉ. शुभांगी पारकर, केईएम रुग्णालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख