समाजभान – सुजाण पालकत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parents-child

>> डॉ. स्वाती घाटे

मुलांचे मानसशास्त्र्ा जाणून घेऊन, आपला व आपल्या पाल्याचा पिंड, भोवतालची परिस्थिती आणि भविष्याचे भान ठेवून केलेलं डोळस संगोपन म्हणजे सुजाण पालकत्व. मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार त्याच्या मनाची ओळख असणं, त्याचं वागणं समजून घेणं, त्यावर योग्य तऱहेनं रास्त बंधनं घालणं, त्यांचे गुणदोष टिपणं व निकोप वाढीसाठी त्यांना विविधांगी आधार देणं ही सुजाण पालकांची काही लक्षणं म्हणता येतील. असे पालक मुलाबरोबर स्वतःचाही विकास घडवून आणत असतात.

गर्भधारणेपासून ते मूल सर्वार्थाने आपल्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ करणं व त्याच्या विकासात मदत करणं ही पालकांची जवाबदारी असते. मुलांच्या अन्न, वस्त्र्ा, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच आरोग्यविषयक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा हा कालखंड हल्ली साधारण 24-25 वर्षांचा झाला आहे. परंतु या महत्त्वाच्या व प्रदीर्घ कामासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायला हवी, माहिती व मार्गदर्शन हवं, शिकत रहायला हवं याची बऱयाच पालकांना कल्पना नसते. आपल्या लहानपणचे, पाल्य म्हणून आलेले अनुभव आठवून साधारणपणे त्या धाटणीने पालक मुलांना वाढवतात.

मुलांची शारीरिक वाढ, पोषण, लसीकरण याबाबतीत बहुतेक सुशिक्षित पालक जागरूक असतात. पण मानसिक आरोग्य, सर्वांगिण विकास, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, व्यवसायाची निवड इत्यादी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या बाबींकडे तितक्या सजगतेने पाहिल्या जात नाही. शालेय शिक्षण उत्तम दिले की या सर्व घटकांमध्ये आपोआप पाल्य पारंगत होतो, असा गैरसमज समाजात पसरलेला आढळून येतो.

मुलांचे मानसशास्त्र्ा जाणून घेऊन, आपला व आपल्या पाल्याचा पिंड, भोवतालची परिस्थिती आणि भविष्याचे भान ठेवून केलेलं डोळस संगोपन म्हणजे सुजाण पालकत्व. मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार त्याच्या मनाची ओळख असणं, त्याचं वागणं समजून घेणं, त्यावर योग्य तऱहेनं रास्त बंधनं घालणं, त्यांचे गुणदोष टिपणं व निकोप वाढीसाठी त्यांना विविधांगी आधार देणं ही सुजाण पालकांची काही लक्षणं म्हणता येतील. असे पालक मुलाबरोबर स्वतःचाही विकास घडवून आणत असतात. शिशू, शाळकरी मूल, किशोरवयीन मूल व नवतरुण यांच्या मानसिक, भावनिक, बौद्धिक कुवतींमध्ये वयानुसार साहजिकच खूप बदल होत जातात. असे पालक त्यांचा मागोवा घेतात. मुलाच्या वाढीच्या टप्प्यानुसार आपल्या अपेक्षा, वागणं, बोलणं, शिस्तीचे नियम बदलत जातात. साहजिकच मुलांना असे पालक जवळचे वाटतात.

अलीकडच्या काळात मुलांसमोरची आव्हाने फार वेगळी आहेत. एकटेपणा, पालकांच्या अवास्तव मागण्या, रोज बदलत जाणारे यंत्र व तंत्रज्ञान, जीवघेणी प्रतिस्पर्धा, समाजमाध्यमे व नेटचे मायाजाल, लैंगिकतेशी अनुचित प्रकाराने घडणारी ओळख, प्रेम प्रकरणे, करीयरचा तिढा, व्यसनाधीनता, नैराश्य, चिंता यासारखे मनोविकार इत्यादी समस्यांचा आजच्या पिढीभोवती विळखा आहे. पालक म्हणून या खाचखळग्यांची माहिती ठेवणे आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या संगोपन शैलीत बदल करणे आधुनिक पालकत्वात अभिप्रेत आहे. उशीर होण्याअगोदरच योग्य प्रकारे व योग्य ती माहिती स्वतःच पाल्यांच्या समोर ठेवणे हे संवादकौशल्य त्यांनी अंगी बाणणे गरजेचे आहे. बचावाचे कवच म्हणून मुलांना उपयुक्त जीवनकौशल्य शिकविणे हे त्यांचे मोठे काम आहे. धोक्याचे कंदील वेळीच टिपणे, त्यावर उपाय करणे व गरज पडल्यास व्यावसायिक सल्ले घेणे ही काळाची गरज पालकांनी समजणे आवश्यक आहे.

ही सारी जाण ठेवणाऱया सकारात्मक पालकांच्या कुटुंबामध्ये एकवाक्यता असते. घराचे नियम घरातील सर्व मोठे, मुले मिळून ठरवतात. नियम पाळल्यास वा मोडल्यास काय परिणाम होतील हेदेखील ठरलेले असते व त्याचे सातत्याने पालन होते. त्यामुळे मुलांच्या वागण्याला योग्य दिशा मिळते व ती भरकटत नाहीत. घरात माझ्या मताला किंमत आहे, या विचाराने मुलांना कुटुंबाशी एकरूपता वाटते. ती मोकळेपणाने आपले मत माडू शकतात, समस्या सांगू शकतात, चुका उघड करू शकतात. लपवाछपवीची वेळ येत नाही.

आपल्या आदर्श वागणुकीतून पालक मुलांना अधिक प्रभावीपणे आणि खूप काही शिकवू शकतात. एकंदरीतच मुलांचं लक्ष पालक काय बोलतात यापेक्षा जास्त पालक काय करतात इकडे असते. आईवडील कसे वागतात, आपली दिनचर्या कशी पाळतात, नैतिकता कशी जोपासतात इत्यादींचे त्यांच्या मनावर खोल परिणाम होत असतात. स्वतः यथेच्छ स्क्रीन वापरणारे पालक मुलांसमोर ‘फोनवर फार वेळ घालवू नये’ अशी नुसती पोपटपंची करत असतील तर ही वागण्याबोलण्यातली तफावत मुलाच्या लगेच लक्षात येते. त्यांना पालक दुटप्पी वाटतात. खोटे बोललेले, वागलेले चालते हा संकेत मिळतो. सचोटीची किंमत उरत नाही व पालकांची किंमत कमी होते. अशा संभ्रमावस्थेतून बालक-पालक नात्यात अढी निर्माण होण्याची खूप शक्यता असते.

अशी अढी नसणं, पालकांशी सलोख्याचे, सौहार्दाचे संबंध असणे हीच मुलांची फार मोठी गरज असते. मुले बुद्धीने अपरिपक्व असल्यामुळे हे प्रेमाचे धागे सांभाळण्याचे कर्तव्य व जवाबदारी मुख्यत्वे पालकांची असते. पतंगाच्या दोरीप्रमाणे पाल्याला आपल्याशी व कुटुंबाशी सतत बांधून ठेवणं, आपला निरपेक्ष आधार देऊ करणे त्यांना जमायला हवे. नेमका हवा तितका (शिस्तीचा) ताण आणि योग्य वेळी (प्रेमाची) ढील दिली की आपल्या मुलांचा जीवनपतंग उंच भराऱया घेऊ शकतो, हे सुजाण पालक समजतात, शिकतात आणि साधतातही!

वळण लावण्याच्या पालकांच्या तऱहा घरोघरी वेगवेगळ्या असतात. जरा काही चुकले की लगेच शहानिशा, न्यायनिवाडा, सजा ठोठावणे व ती कठोरपणे अमलात आणणे हा हुकूमशाही खाक्या काही पालक पसंत करतात. या प्रकारात चूक काहीही असो मूळ मुद्दा बाजूला राहून इगोची म्हणजे श्रेष्ठत्वाची लढाई सुरू होते. सुजाण पालक मुलांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या अनुषंगाने विचार करू शकतात. याला सह-अनुभूती (empathy) म्हणतात. मुलांकडून नावडते वर्तन घडल्यास त्यावर एकदम टोकाची प्रतिक्रिया (reaction) न देता ते प्रतिसाद (response) देतात. यामुळे पुढे शांतपणे त्या वर्तनाबद्दल बोलण्यास, ऐकण्यास व स्वतःमध्ये सुधार करण्यास मूल तयार असते. राग नियंत्रणाचा, समस्या सोडविण्याचे धडेही असे पालक अनायासे मुलांना घालून देतात.

(लेखिका जयपूरच्या बाल व किशोर रोग तज्ञ तसेच मानसतज्ञ आहेत)
n [email protected]