आपल्याला रक्ताची वाट दाखवणाऱ्या असंख्य आत्मज्योतींची कहाणी

267

>> डॉ. विजया वाड,  [email protected]

म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा, स्त्री म्हणजे आकाशीची वीज, स्त्री म्हणजे शक्तिपीठ हे जितकं खरं तितकंच स्त्री म्हणजे आनंद दुसऱयास देण्यासाठी स्वतः ‘सोसणघर’ होणारी, अनंत यातनांचे घर असलेली एक अबला हेही खरं. पण अशा ‘मुक्या’ स्त्रियांना ज्यांनी ‘आवाज’ दिला त्या समाजधुरीण 15 स्त्रियांच्या आयुष्याचा लखलखणारा दिवा म्हणजे उजळले स्मृतींचे दिवे हे मुक्ता केणेकर यांचे पुस्तक, ‘उजळले स्मृतींचे दिवे’.आज आम्ही शिकलेल्या सर्व स्त्रिया समाजात अभिमानाने जगू शकतो आहोत यामागे सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, कमलाबाई होस्पेट, ताराबाई मोडक, अनुताई वाघ अशा तपस्विनींची तपश्चर्या आहे. त्या ‘तेव्हा’ होत्या म्हणून ‘आज’ आम्ही आहोत याची विनम्र जाणीव आम्हास आहे.

एकूण 15 स्त्रिया मुक्ताबाईंच्या लेखणीतून आपल्याशी आत्मनिवेदनपर शैलीतून बोलतात. आपापली आयुष्यगाथा समोर उलगडतात त्या आहेत सौ. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, श्रीमती काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे, सौ. आनंदीबाई कर्वे, डॉ. रखमाबाई राऊत, डॉ. आनंदीबाई जोशी, पार्वतीबाई आठवले, सौ. काशीबाई हेर्लेकर, जनाक्का शिंदे, सौ. अवंतिकाबाई गोखले, ताराबाई मोडक, कमलाबाई होस्पेट आणि अनुताई वाघ. 1831 ते 1992 पर्यंतचा कालखंड… त्यातल्या या तेजस्विनी. या स्त्रिया स्वतःच आपल्याशी संवाद साधत असल्याने यात मृत्यू नाही. आहे ते जिचे तिचे असाधारण, बोलके काम!

जमिनीवर पाय ठेवून आकाशाला भिडणाऱया या स्त्रियांना बोलकं करणाऱया मुक्ताबाईंनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने एकेक निवेदन लखलखीत केले आहे. स्त्रियांची ही निवेदने नुसतीच अभ्यासू नाहीत, अतिशय वाचनीय केलीयत त्यांनी. पुस्तक एकदा हाती घ्याल तर पुरे केल्याशिवाय चैन पडणार नाही एवढा विश्वास आपणास देते.

आपली कूस उजवली नाही म्हणून ‘मालकांना’ दुसऱया लग्नाचा आग्रह करणारी सावित्री आणि 175 वर्षांपूर्वीच्या काळात ‘तुजवर अन्याय करणार नाही’ असं म्हणणारे ‘जोतिबा’ माणूसपणाचा कळस गाठतात. बावनकशी सोन्यासारखी ही माणसं मन उजळून टाकतात. आपल्या पत्नीला धुळाक्षरे गिरवून शिकविणारे मालक आणि स्त्र्ााrशिक्षणासाठी लोकांनी अंगावर घाण टाकली तरी ‘घेतले क्रत’ न सोडणाऱया निश्चयी सावित्रीबाई मनावर गारुड करतात.

पंडिता रमाबाई तर कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्मलेली स्त्र्ााr, पण आई गेली तेव्हा प्रेताला खांदा द्यायला चौथा माणूस मिळेना. अशावेळी धैर्य गोळा करून 1874 साली ही स्त्री तेही काम करायला पुढे होते? 1882 त त्यांनी स्त्रीशिक्षण’ या विषयावर एक तेजस्वी व्याख्यान दिले ते समाजमनाच्या हृदयावर अधिराज्य करणारे ठरले. रमाबाईंची मुलगी मनोरमा. तिने आईवर एक पुस्तक इंग्रजीत लिहिले. कोणते? ‘विधवांची मैत्रीण रमाबाई’ हे. स्त्री म्हणजे पापग्रह. स्त्रीजन्म म्हणजे दोषांनी भरलेली गोणी. किती अपसमज होते स्त्रीबद्दल समाजमनात. एक तर तिला देवी म्हणून पूजा, भजा नाहीतर ‘दासी’ म्हणून पायातली वहाण बरी अशी अतिनीच वागणूक द्या… देवीचे मानसन्मान फक्त आणि फक्त मूर्तीला… नि लत्ताप्रहार ‘जीवनाला’… अशा ढोंगी, आपमतलबी, पुरुषसत्ताक समाजाला उपरोधिक लेखणीने फटकारे देणाऱया, पुरुषांना टीकात्मक शब्दांनी घायाळ करणाऱया ताराबाई शिंदे मनभर उरतात. वैधव्य हा का स्त्रीचा दोष? का तिला अंधारकोठडीत डांबता? महाजबर अपराध्यापेक्षाही नीच वागणूक? ताराबाईंची वाक्ये वाचून मन गलबलून जाते.

आनंदीबाई कर्वे या तर स्वतः पुनर्विवाह करून समाजात एक धाडसी पाऊल टाकणाऱया धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी! लेखिका, सुधारक लेखणीने समाज ढवळून काढणाऱया काशीबाई कानिटकर बहारदार स्वगते, काळजाला भिडणारी लेखणी… मुक्ता केणेकरांनी एकेक निवेदन जिवंत केले आहे.

एकोणिसाव्या शतकात हिंदुस्थानी विवाहसंस्थेत वधूवरांची अनुरूपता गौण मानली जात होती. कौटुंबिक विचार प्रबळ होता. स्त्रीच्या अस्तित्वाची, तिच्या गुणांची, कर्तृत्वाची गळचेपी करणाऱया विवाहसंस्थेला आव्हान देणाऱया डॉ. रखमाबाई राऊत यांनी तर झगडून स्वातंत्र्य मिळविले आणि ते समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणले. ‘अजाण वयात झालेला विवाह मला बंधनकारक नाही’ असे म्हणायची हिंमत 19 व्या शतकात दाखविणारी ‘रखमा’ तेजाची शलाकाच भासते. त्यांचे ‘सुरत’ येथील इस्पितळ आजही डॉ. रखमाबाईंचे इस्पितळ म्हणून ओळखले जाते.

1865 ते 1887 एवढीच छोटी जीवनरेखा लाभलेल्या आनंदीबाई जोशी यांचे ते छोटेसे आयुष्य म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी अखंड अशी तपश्चर्या आहे. ‘आर्य हिंदूंचं प्रसूतीशास्त्र’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय. परदेशात शिक्षण घेऊनही परधर्म न स्वीकारणारी ज्वलंत देशाभिमानी स्त्री खरोखर ‘लार्जर दॅन लाईफ’ होते. ‘अनुताई वाघ’, ‘कमलाबाई होस्पेट’ आणि ‘ताराबाई मोडक’ या आज ज्या स्त्रिया 65 ते 70 वयोगटात आहेत त्यांनी पाहिलेल्या स्त्रिया. बाकी सारी इतिहासाची लखलखीत सोनेरी पाने. मन उजळेल. बघा वाचून. या सुंदर आत्मकथा जाळीदार पिंपळपानागत आहेत बरे.

उजळले स्मृतींचे दिवे
लेखक – मुक्ता केणेकर
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठ – 169
किंमत 250 रु.

आपली प्रतिक्रिया द्या