वंगभंगिमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड

पुलंची सिद्धहस्त लेखणी आणि गुरुदेवांचे शांतिनिकेतन. आठवणींचे सप्तक आपल्यापुढे उलगडते.

शांतिनिकेतनातील दिवस वर्णितांना पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘7-7-77 ही एक मजेदार तारीख आहे. असा संख्यायोग यापुढे 10 वर्षांनी येणार. 8-8-88 या दिवशी! हा दिवस मला दिसेल की नाही कोण जाणे? पण आकडय़ांची ही गंमत मला सलील घोषने आपल्या पत्रातून नजरेस आणून दिली. सात सूर, सात रंग यातूनच जीवनाचा विकास व्हावा असे मानणाऱया रवींद्रनाथांनी सप्तकांची आश्रमातून सप्तपर्णी वृक्षाखाली त्याच्या पानांची पाठवणी करण्याची पद्धत सुरू केली होती.’

विचार मनात येतो, गुरुदेव रवींद्रनाथ खरोखर निसर्गाचे चेले होते. मुक्काम पोस्ट शांतिनिकेतन पु.लं.च्या आयुष्यात चक्क पन्नाशी उलटली तेव्हा घडले. 1970 साली त्यांना बंगाली भाषा शिकायची होती म्हणून हे झाले. त्या मातीचा गंध घेत त्यांनी ‘वंगचित्रे’ लिहिले पुढे 7-7-77 ला जेव्हा शांतिनिकेतनमध्ये मुक्काम होता. तेव्हा बंगालमधली राजकीय परिस्थिती उग्र झाली होती. त्यामुळे हिंस्र वातावरणात बाहेर हिंडता आले नाही. महिनाभर शांतिनिकेतन एके शांतिनिकेतन. खुद्द तेथले वातावरणही बदलले होते. तेव्हा त्यांनी दैनंदिनी लिहिली. या मुक्कामात त्यांना कोणते अनुभव आले, कोणती माणसे भेटली, त्यांचे विचार, भावना, आवडी-निवडी या दैनंदिनीत मोकळेपणी व्यक्त होताना दिसतात. प्रस्तुत पुस्तकाचा पहिला भाग या दैनंदिनीचा आहे आणि तो अप्रकाशित भाग प्रकाशकांनी या पुस्तकात प्रकाशात आणला आहे. मोठी रोचक वर्णने आहेत. आपणास भुरळ घालतील. प्रिय वाचकांनो! तर दैनंदिनी हा पहिला भाग आहे.

पुढे स्वाध्याय! त्यात रवींद्रनाथांची बालकविता इतकी गोड आहे की वाचून दिलं खूश होऊन जातो. एक कविता चक्क मुळाक्षरांची आहे. ती वाचल्यावर लक्षात येते की,

‘बालात मिसळुनी बालक झाला हा महान कविराज
देतो कवितेला मुळाक्षरांचा नादोमय स्वरसाज’
बघा हं!
‘क चा काय सुरेख थाट, उभा कटीवर ठेवून हात
ख ला झाला खोकला, खोकून खोकून थकला
ग सांगे लवकर या, घरात आला गणराया
घ घरात बसून राही, लंगडी खोखो खेळत नाही
ड्. एकटा राहत नसतो, रङ्ग गङ्ग संङ्ग बसतो’

अशी अ पर्यंत कविता पळते. ‘म’ला ब्रेक घेते. ‘अ’ला कविराज म्हणतात – ‘अ’ भारी भित्रा, पळतो बघून कुत्रा!’
वाटली ना मजा?

आयुष्याच्या शेवटच्या वर्षात रवींद्रनाथांनी बंगालीची अंकलिपी रचली. अशी अंकलिपी जगात कुठल्या भाषेची नाही असा बंगाली साहित्यिकांचा दावा आहे बरंय याचे अनुकरण नंतर अनेकांनी अनेक भाषांत केले असावे. पण ‘तिसरी घंटा’ वाजली असताना माणूस इतका ‘बालरंगी’ रंगताना पाहून मनास अनुकरणाचा मोह ज्येष्ठांना नक्की होईल. आनंदरंगात न्हाऊन निघण्यासाठी तरी हा भागवाचा असे मी आग्रहापूर्वक म्हणेन. अहो अवघड लिहिणे, बोलणे, सोपे असते. पण इतके सोपे लिहिले गेलेय की ते किती अवघड आहे याची कल्पनाच येणार नाही! बरे ते र ला ट नाही. मजेदार, चटकदार आहे.

रवींद्रनाथांची पत्रे चिठीपत्र, 7 वा खंड यातून घेतली आहेत आणि त्याचा सरल अनुवाद या पुस्तकात आला आहे. या चिठ्ठय़ा कुणा नामवंताला लिहिल्या आहेत का ‘गीतांजली’कारांनी? नाही हो! त्यांच्यावर प्रेम करणाऱया लोकांसाठी ही अक्षरधारा आहे. आता हेच बघा ना! कादंबिनी दत्त कुणी सुप्रसिद्ध स्त्र्ााr नव्हेत. लौकिक अर्थाने उच्चशिक्षितही नव्हेत. महिमचंद्र सरकाराची ही कन्या प्राणगोपाल दत्तांची पत्नी. लग्नानंतर फार लवकर नवरा बाप्पाकडे गेला. रवींद्रनाथांची राजर्षी वाचून त्या इतक्या भारावल्या की एका गावातली बोकडब्गळीची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी उपोषण सुरू केले होते. तीन दिवसांनी ‘वचन’ मिळाले की ही प्रथा आम्ही बंद करू’ तेव्हा कुठे त्यांनी उपोषण सोडले. त्या एक सरळमार्गी, भावनाप्रधान, कर्तव्यतत्पर शिक्षिका होत्या.

त्यांना इतकी भावमधुर पत्रे लिहिली आहेत गुरुदेवांनी की वाचून त्यांचा साधेपणा, सच्चेपणा दृग्गोचर व्हावा. ते म्हणतात, ‘गुरुच्या थाटात तुला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही, पण एक सांगू? ज्या संसारात तू प्रवेशकेला आहेस त्याला तू धैर्यानं, क्षमेनं, मंगलानं आणि माधुर्यानं अभिषिक्त कर. आणि हीच गोष्ट मनात ठेव की भगवान आमच्या सेवेची अपेक्षा करीत नाही. माणसाच्या सेवेतच त्याची सेवा! तोच परिरूपानं आमचं प्रेम, पुत्ररूपानं स्नेह, दीन रूपानं आमच्या दयेचा स्वीकार करीत असतो. ज्याची सेवा करशील, मंगल करशील तीच पूजा होऊन ईश्वरचरणी रुजू होईल.’ वाचून कसे वाटते? शुद्ध, पवित्र, मंगल वाटते की नाही प्रिय वाचकांनो?

आणखी एक अतिसुंदर विचार.

‘मन जेव्हा म्हणून अप्रसन्न होऊ इच्छित असेल त्या क्षणी तुझ्या सर्व सर्व शक्तीनिशी त्याला वर उचलून घे आणि म्हण-

सुख वा यदि वा दुःखमप्रियं वा यदि वा।़।़प्रियम्
प्राप्तं प्राप्तमुपासीत
हृदये ना पराजिता।।’

पत्रातून भेटणारे रवींद्रनाथ मृत्यूशय्येवरून वयाच्या 80 व्या वर्षी मिस राथबोन या बाईला (इंग्रज) लिहिलेल्या अनावृत्त पत्रातही ही चीड व्यक्त करतात. ‘इंग्रजांच्या घरात जन्माला आलेले जनावरदेखील आमच्या देशातील लोकांपेक्षा श्रेष्ठ मानले जावे या गोष्टीचा माझ्या मनावर विलक्षण आघात होतो.
महाराष्ट्र साहित्यपत्रिका जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 1976 मधला एक लेख शरच्चंद्र आणि रवींद्रनाथ या बंगाली साहित्यातील रवी-चंद्राच्या मधला परस्पर जिव्हाळा समजायला उपयोगी पडावा.

पु. ल. देशपांडे याच्या प्रकाशित, अप्रकाशित गोष्टी वाचून मन विचारमग्न होते. शांतिनिकेतन ते दादर ‘वहाँ से यहाँ’ लानेवाला लाजवाब लेख. अवश्य वाचा. श्रीमंत व्हा! मुक्काम शांतिनिकेतन.

मुक्काम शांतिनिकेतन
लेखक – पु. ल. देशपांडे
प्रकाशक – मौज प्रकाशन गृह
पृष्ठ- 163, प्रथमावृत्ती 2001
मूल्य – रु. 125/-.