प्रेमळ भूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड

चित्रकार मानकार काका… स्वत: कर्जबाजारी होऊन लहान मुलांचे टॉनिक दैनिक सुरू ठेवण्याचा आटापिटा करणारे मनस्वी संपादक… कलावंत… आपल्या ‘देवचार’ या आत्मचरित्रातून ते अगदी प्रांजळपणे व्यक्त झाले आहेत…

एकवीस वर्षांपूर्वी हे पुस्तक अगदी ताजं, तरुण वाटतं. चित्रकार मानकरकाका यांचं आत्मचरित्र ‘देवचार’ म्हणजे कोकणातलं प्रेमळ भूत. या भुतासारखेच काका सदैव झपाटलेले होते. टॉनिकचे लहान मुलांचे अंक सदैव झोळीत भरून ते शाळाशाळांतून ती जड झोळी मिरवत असत. रेल्वेच्या दुसऱया वर्गाच्या डब्यातून मोठय़ा आनंदाने त्यांचा प्रवास चाले. त्या भरगर्दीत चौथ्या सीटवर बूड टेकून कोणाचेही स्केच काढणारे मानकर काका अतिशय लोकप्रिय होते.
या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक आठवणी मनात जाग्या झाल्यात. ‘टॉनिक’ या लहान मुलांसाठीच्या अंकासाठी भारंभार कर्ज करून ठेवणारा हा अवलिया! त्याचे कर्ज फेडायला बायकोखेरीज कोण पुढे येणार? कथाने आयुष्यभर आनंदाने नोकरी केली. घर चालवले. नवऱयाचे कर्ज फेडायला आपले दागिने गहाण टाकले. पण नवऱयास जपले. अगदी पेटीतला तन्मणी जपावा, इतक्या ममतेने. त्या माणसाचे हे आत्मचरित्र.

हे पुस्तक म्हणजे खरेतर एक मुक्त भटकंती आहे. हिंदुस्थानातलं पहिलं मुलांचं दैनिक सुरू केलं ते मानकर काकांनी, पण ते चालवताना प्रचंड नुकसान पदरी आलं. कर्जभार डोंगराएवढा वाढला. तो एकहाती फेडावा म्हणून गृहस्थांनी नोकरी सोडली हो! पीएफ, ग्रॅच्युएटी मिळून कर्जफेड होईल ही आशा!
हे खरे पण, आरशासारखं लख्खपण, स्वभावातील बेबंदपण, मुक्तपण. सारंसारं ‘देवचार’ या पुस्तकात प्रतिबिंबित झालं आहे. हे पुस्तक म्हणजे मानकरकाकांच्या धिप्पड देहातला प्राजक्तसडा आहे. त्या सुकोमल, सुगंधी क्षणाची साक्ष पुस्तकात उमटली आहे. वाचकांना ती वाचताना जाणवेलच याची मला खात्री वाटते.‘देवचार’ वाचताना आपल्याला बेभानपणे आकाशभर विखुरलेल्या चांदण्याची आठवण येईल. कारण तेही असंच बेभान, बेहिशेबी जीवन जगले. काकांमध्ये एक छोटं निरागस मूल दडलं होतं. ते मूल ‘देवचार’ वाचित असता जागोजाग भेटत राहातं.

आपली पत्नी कथा हिच्यावर जीव उधळून प्रेम केलं काकांनी. त्यांचं लग्न 4 तारखेला झालं. म्हणजे 4 तारीख हा लग्नाचा मासिक वाढदिवस! तो जोडीने सिनेमा पाहूनच साजरा करायचा, ही रसिकता जपत असत मानकरकाका.हे आत्मकथन लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? तर दत्ता इसवलकर यांच्या नव्या शाळेत गेले असता त्यांना मुलांची आत्मचरित्रे त्यांनी लिहिलेली दिसली. त्यांनी मित्राला विचारले, ‘हा काय प्रकार आहे?’ तेव्हा मित्र म्हणाला, ‘मुलांना आतापासून आयुष्याकडे बघायची सवय लागावी म्हणून हा एक प्रयत्न आहे.’

त्याच वेळी काकांनी ठरवून टाकलं की आपणही आपल्या आत्मचरित्रात आठवणींची कवाडं खुली करायची. कोणतीही झाकपाक न करता काका नि कथा यांच्या लग्नाची आठवण लई भारी रंगविली आहे. पुस्तकात हा भाग अतिशय वाचनीय झाला आहे. एका मित्राला काही पैसे उसने दिले होते. ते त्याने लग्नात अहेर म्हणून कसे परत केले आणि वर एक शंभराची नोट दिली. तो प्रसंग वाचनीय झाला आहे. या पैशातून माथेरानचा हनिमून करण्याची काकांची कल्पना भन्नाट वाटते.

लग्नानंतरचा काही भाग या पुस्तकात कथाने लिहिला आहे. आयुष्यातील सहप्रवासाची सुरुवात माथेरानपासून झाली असली तरी काकांनी कथाला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खूप हिंडविले, त्याचे यथोचित कौतुक कथा करते. पृ. 103 वर काकांचे नि कथेचे नवपरिणित पोशाखातले एक दुर्मिळ चित्र नजरेस सुखावून जाते. या पुस्तकात महनीय व्यक्तींची रेखाचित्रे आहेत. ती सारी काकांनी काढली आहेत. ‘देवचार’ म्हणजे कोकणातलं प्रेमळ भूत! या भुतासारखेच काका सदैव झपाटलेले. या अवलियाने मुलांवर इतके प्रेम केले की मुलांत मिसळताना, ते मूलच होऊन जात. हे पुस्तक जगात अवतरलं तेव्हा काका साठीचे होते, पण ते आठ-दहा वर्षांचं निरागस मूल त्यांनी मनीमानसी तसेच जपले होते.

त्यांनी काढलेल्या पुस्तकातील रेखाचित्रात मला मा.मनोहर जोशी आणि मा. वसुंधरा पेंडसे-नाईक यांची रेखाचित्रे फार आवडली. काका फार उशिरा जीडी आर्टसाठी कॉलेजात गेले. तो प्रसंग खुलविताना काका लिहून जातात, ‘आख्खा वर्ग माझ्या एण्ट्रीबरोबर उभा राहिला. त्यांना वाटले आपला प्राध्यापकच आला. पण मी स्डुडंट म्हणून सर्वात मागे जाऊन बसलो तेव्हा सारेच माना वाकडय़ा करून मजकडे बघत होते.’ आपल्या डोळय़ासमोर उभा राहिला ना प्रसंग प्रिय वाचकांनो? त्यांचा या कलेतील विद्यार्थी रमेश पावसकर हाच त्यांचा मास्तर कसा झाला तो किस्सा मनोविनोदन करतो.

काकांनी चालविलेली साने गुरुजी कथामाला, निःस्वार्थ बुद्धीने केलेले उत्कर्ष मंडळाचे काम, रात्ररात्र जागून तयार केलेले टॉनिकचे अंक या साऱयांचा ऊहापोह पुस्तकात जागोजागी येतो. चंद्रकांत खोतांचे एका अभिनेत्रीसोबतचे प्रेमप्रकरण, तिचे खोतांना पूर्ण नागवणे नि मग फाटक्या चिंधीसारखे फेकून देणे हे वाचताना मन शिणून जाते. खोतांचे निवडणुकीस उभे राहणे नि डिपॉझिटही जप्त होणे हा क्लेशकारक मजकूरही पुस्तकाचा काही भाग व्यापतो.‘देवचार’ या प्रेमळ नि सतत चालणाऱया प्रेमळ भुतासारखेच मानकरकाका. काकांना कशाकशाची आवड होती? अहो दर चार तारखेचा सिनेमा, इथे तिथे होणारे समारंभ नि त्यात काढलेली स्केचेस, नाटके, प्रवास, माणसे, भटकंती नि पोरेटोरे! त्यांचा लाडका चित्रभूषण! काका म्हणजे रसरसलेला जीवनानुभव! एक प्रेमळ प्रपात. मी एकदा त्यांच्यात गेले असता कथाची बहीण म्हणाली, ‘भिंतभर निस्ती लाकडं!’ (म्हणजे काकांची बक्षिसं!) त्यावर काका म्हणाले होते, ‘मावशे त्यांच्याकडे माझ्या डोळय़ांनी बघ गं!’ आवडलं ना? जरूर वाचा ‘देवचार’!

z [email protected]
देवचार – मानकरकाका
z पृष्ठ – 308,z किंमत 200/-
z डॉ. मीनाक्षी प्रकाशन.