
>> दुर्गेश आखाडे
तंटामुक्त गाव…हगणदारी मुक्त गावानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत ती सेंद्रिय गावे. सेंद्रिय गावांची अभिनव संकल्पना रत्नागिरी जिल्हय़ात राबवली जातेय. जिह्यातील नऊ गावांत जैविक खतांचा वापर करून शेती आणि बागायती केल्या जाणार असल्याने या गावांना सेंद्रिय गाव म्हणून ओळख देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरणारी ही संकल्पना रासायनिक खतांच्या जोखडातून शेतीला बाहेर काढेल अशी आशा वाटते.
रासायनिक खतांच्या वापराचे दुष्परिणाम सर्वांना कळून चुकल्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता जगाने जाणले आहे. सेंद्रिय शेती हा आपल्यासाठी नवा शोध नसून आपले पूर्वजच जैविक खतांचा वापर करत होते त्याच सेंद्रिय शेतीच्या पायवाटेवरून जाण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचनांचा आणि जीवनचक्र जाणून रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती होय.
आज झटपट पैसा कमाविण्याच्या युगात सेंद्रिय शेतीची पाळेमुळे रुजविणे तितके सोपे नाही. पण हे शिवधनुष्य उचललं ते रत्नागिरी जिल्हा परिषदेने. कृषी अधिकारी आरिफ शहा यांना असलेल्या सेंद्रिय शेतीच्या अभ्यासाचा फायदा जैविक ग्राम समृध्दी योजना तयार करताना झाला. त्यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा परिषदेने जैविक ग्राम समृध्दी योजना तयार केली. महाराष्ट्रात अशाप्रकारे सेंद्रिय गावे निर्माण करण्याची योजना कागदावर तयार करून ती शेतात प्रत्यक्ष उतरविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. जैविक ग्राम योजनेसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने नऊ गावांची निवड केली. पण ही योजना उचलून नऊ गावांच्या माथी मारली नाही. तर त्या गावाच्या मातीत आणि गावकऱयांचा मनात रुजवत गावाला सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केले. सर्वप्रथम गावच्या ग्रामसभेत सेंद्रिय गाव करण्याचा ठराव करण्यात आला. त्याच वेळी गावकऱयांनी एक शपथ घेतली की, यापुढे गावात कुणीही रासायनिक खतांचा वापर करणार नाही. शेती आणि बागायतीसाठी जैविक खतांचा वापर करू अशीही शपथ भविष्यात वरदान ठरणारी आहे. रत्नागिरी तालुक्यातील खानू, लांजा तालुक्यातील विवली, मंडणगड तालुक्यातील पालये, चिपळूण तालुक्यातील मोरवणे, राजापूर तालुक्यातील गोवळ, गुहागर तालुक्यातील पाभरे, खेड तालुक्यातील अनासपुरे, दापोली तालुक्यातील वीरसई, संगमेश्वर तालुक्यातील सरंद या गावांची लाखमोलाच्या जैविक ग्राम समृध्दी योजनेसाठी करण्यात आली. ही योजना लाखमोलाची आहे, कारण या योजनेतून प्रत्येक सेंद्रिय गावाला एक लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. लाखभराच्या योजनेतून गावाचं काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला तरी लाखातून भविष्यात कोटीची उड्डाणे आपण करू शकतो. एक लाखाच्या निधीत काय होणार, तर सेंद्रिय गावात 50 हजार रुपयांचे काडीकचरा बारीक करणारे यंत्र देण्यात आले आहे. काडीकचरा आपण जाळून टाकतो आणि कंपोस्ट खत विकत आणतो अशी आपली परिस्थिती आहे. या यंत्रामुळे काडीकचरा एकत्र करून तो व्यवस्थित बारीक करण्यात येणार आहे. त्यानंतर वीस हजार रुपये गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले आहेत. दहा हजार रुपये जैविक कीटकनाशकांसाठी वापरण्यात येणार असून दहा हजार रुपये सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. अपेडाच्या अंतर्गत 22 संस्था सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करतात. रत्नागिरी जिल्हय़ातील नऊ गावांच्या सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण पुणे येथील ग्रीनसर्ट ही संस्था करणार आहे. आता तुम्ही म्हणाल, एक लाख रुपयातील नव्वद हजारांचा खर्च सांगितलात, दहा हजार कुठे ठेवलेत? या दहा हजारपैकी पाच हजार खर्च होणार आहेत ते गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सेंद्रिय गावाची कमान उभारण्यासाठी. उर्वरित पाच हजारातून गावातील प्रत्येक शेतकऱयाला नोंदवही देण्यात येणार असून तो आपल्या सेंद्रिय शेतीच्या दैनंदिन कारभाराची नोंद ठेवणार आहे.
गावात सर्वच जण सेंद्रिय शेती करत आहेत की नाहीत किंवा कुणी रासायनिक खतांचा वापर केला आहे का? हे पाहण्यासाठी गावच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती सेंद्रिय गावावर देखरेख ठेवत आहे. नऊ गावांत जैविक ग्राम योजना सुरू झाल्यानंतर त्याच गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून गांडूळ खत प्रकल्प, घर तेथे शोषखड्डा अशी कामे करून ही योजना अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील 110 हून अधिक देशामध्ये आता सेंद्रिय शेती केली जात असली तरी सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक शेती आहे. आपल्या आजोबा-पणजोबांनी कुठे रासायिनक खते आणली होती. तेव्हा आपण तो जुना ठेवा पुन्हा आत्मसात करणे आवश्यक आहे. जैविक खते म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, माशांचे खत होय. सेंद्रिय शेतीतून अधिक वेगाने उत्पादन मिळणार नसले तरी त्याचा रासायनिक खतांचा वापराचा खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचे गुणोत्तर काढले तर जास्त फायदा हा सेंद्रिय शेतीत आहे. कारण थोडी कष्टाची असली तरी सेंद्रिय शेतीचा खर्च अल्प प्रमाणात आहे हे नाकारता येणार नाही. खर्चात घट आणि उत्पन्नात वाढ हे सेंद्रिय शेतीचे वैशिष्टय़ आहे. सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठेत खूप चांगली मागणी आहे. अलीकडे नागरिक आरोग्याबाबत जागरुक झाले असून ते सेंद्रिय शेतमालाची मागणी करताना दिसतात. प्रमाणित केलेल्या सेंद्रिय शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे उद्या या नऊ गावांत लाखमोलाच्या योजनेतून कोटीची उड्डाणे दिसू शकतात. ज्या शेतकऱयांनी जैविक खते वापरून आंबा उत्पादन घेतले आहे त्यांना खूपच चांगला भाव आणि भरपूर मागणी मिळाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापराचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱयांना होणार आहे. सेंद्रिय शेती अन्न सुरक्षेची खात्री आणि जीवनमान उंचविण्यास मदत करते. रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात. जैविक खते शेतीवर अवलंबून असणाऱया जिवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देत असल्यामुळे पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. सेंद्रिय गावातील मातीचा आरोग्य स्तर कायम राहून त्या जमिनीत नत्राचे प्रमाण अधिक दिसेल. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्यता अधिक वाढेल. गावातील शेतमालाला चांगला भाव मिळून सेंद्रिय गाव म्हणून कृषी पर्यटनात त्यांची भर पडेल.





























































