दुबईतील कालवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

कुठलेही सुंदर शहर मला रात्री फिरायला आवडतं (मात्र तुमच्या मनात आहे ‘फक्त’ तसं नव्हे) म्हणून मी माझा मित्र दिलीप खेडेकरला म्हटलं, ‘‘चल, आज रात्री दुबई फिरू’. तुमच्या मनातलं ‘नाइट लाइफ’ मी अनेक मोठय़ा शहरांत फिरून पाहिलंय. अगदी दुबईतसुद्धा. आपल्या डान्स बार्सना आपण दारिद्रय़रेषेखाली असल्याची जाणीव होईल असे डान्स बार्स दुबई-अबुधाबीत होते, आजही असतील. दुबई एक मुस्लिम राज्य आहे. तिथे बुरख्याचं राज्य आहे. ‘शरीरविक्रय’ हा शब्दही त्यांच्या शब्दकोशात नाही, हा तुमचा समज असेल तर ती अंधश्रद्धा आहे. पूर्वी चक्क रंगरंगोटी केलेल्या पूर्व युरोपियन बायका रस्त्यावर ‘गिऱहाईकं’ शोधताना दिसत. आता ते बंद झालंय, पण आता रस्त्यारस्त्यावर सुंदर ललनांचे फोटो पडलेले दिसतात. माझा सज्जन मित्र दिलीपच्या गाडीवर रोज कुणीतरी येऊन ते फोटो टाकत. पण एक उत्कंठा म्हणूनही तो त्याकडे पाहत नाही. गाडीवरचा ‘कचरा’ साफ करावा त्या भावनेने तो ते फोटो फेकून देतो. एक लेखक म्ह्णून माझी उत्कंठा जागृत झाल्यामुळे ते पाहत होतो. मी नाही पाहिले तर तुम्हाला कसं सांगणार, केवळ हाच त्यामागचा शुद्ध हेतू.

पण मी रात्रीची दुबई सफर म्हणतो ती ही नव्हती, पण उत्तम रोषणाई मिरवणारं रात्रीचं शहर पाहायला आवडतं. हाँगकाँगसारखी शहरं निमॉन वाईन्समध्ये न्हालेली असत. तो बटबटीतपणा मला आवडे. युरोपियन शहरं शांत, शीतल दिव्यांनी उजळून निघतात. तो पिवळा प्रकाशही मला भावतो. दुबई या दोन्हीमधलं आहे आणि दुबईमध्ये सातत्याने त्यांची स्कायलाइन बदलत असते. कधी एखादा नवा विभाग जन्माला आलेला असतो. कधी ‘नव्या बाळा’च्या प्रसूती वेदना सुरू असतात. यावेळी दोन इंटरेस्टिंग गोष्टी मला दिलीपने दाखवल्या. एक मरीन कंटेनर्सने उभी केलेली दुकानं व रेस्टॉरण्टस् आणि दुसरा चक्क कालवा.

दुबईच्या शेखच्या मनात काय येईल हे कधी सांगता येत नाही. दुबईला काय कृत्रिम बेटाची गरज आहे का? पण ‘पाम ट्री’च्या आकाराचं. ‘पाम जुमैरा’ बेट उभं केलं गेलं. आकाशातून ते पाम ट्रीसारखं दिसतं. अजून दोन बेटं जन्माला यायची आहेत. डेरा आयर्लंड आणि पाम जेबेल अली अशी. पुढच्या दुबई भेटीच्या वेळी नवजात बाळाचं दर्शन घ्यायला दिलीप मला घेऊन जाईलच. शेखच्या मनात आलं की, दुबई शहरातून कालवा जात नाही. त्याने तो करून टाकला. अर्थात हे स्वप्न पूर्ण करणं फारसं कठीण नव्हतं. कारण दुबईच्या एका बाजूला खाडी आहे आणि दुसऱया बाजूला समुद्र. त्यामुळे या दोन गोष्टी जोडल्या गेल्या. पैसा हा प्रश्नही त्यांना सतावत नसावा. अलीकडे दुबईत जागांची भाडी आकाशाला भिडली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे शारजात राहतात आणि नोकरीला दुबईत येतात. दिलीप सांगत होता की, गाडय़ांच्या पार्किंगचं भाडं अचानक दुप्पट झालं. आता पाच टक्के व्हॅट आला. उद्या इन्कम टॅक्स येऊ शकतो. बरं, हुकूमशाहीत मोर्चा, सत्याग्रह, संप वगैरे नसतात. त्यामुळे हे सर्व निमूटपणे स्वीकारावं लागतं. ‘‘अरे, या देशाला हुकूमशाही पाहिजे’ असं म्हणणारे आपल्याकडे कमी नसतात. त्यांनी एकदा हुकूमशाही देशात राहून पाहावं. मग लुळीपांगळी लोकशाही का परवडते ते कळेल.

असो, तर काय सांगत होतो? हं, दुबईत प्रोजेक्टला पैसा कमी पडत नाही. हा कालवा बांधताना काही ठिकाणचे पॉश बंगले (त्यांना दुबईत व्हिला म्हणतात) भरपूर नुकसानभरपाई देऊन उद्ध्वस्त केले गेले. 2 ऑक्टोबर 2013 ला कालव्याचं काम सुरू झालं. 9 नोव्हेंबर 2016 रोजी उद्घाटन झालं. कालवा म्हणजे पाणी. एका ठिकाणाहून दुसरीकडे सोडलं असं नाही. तो अख्खा विभाग पर्यटकांना आकर्षित करायला सजवला गेला. एक रोड शॉपिंग सेंटर उभारलं गेलं. ‘दुबई म्हणजे शॉपिंग’ हे समीकरण दुबईत जास्त घट्ट केलं जातंय. मग चार मोठी हॉटेल्स उभारली. 450 रेस्टॉरंट उभी राहिली. आलिशान राजेशाही थाट असलेली घरं उभी राहिली. कालव्याच्या बाजूने चालायला ‘वॉकवे’ तयार केला गेला. एक रूपगर्विता उभी केली गेली. तिच्याकडे पर्यटक आकर्षित होतील हे पाहिलं गेलं. मग बोटीतून फिरण्याची सोय केली गेली. तुमची स्वतःची यॉट असेल तर ती ठेवण्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली. या कालव्यावर पूल बांधले गेले. त्यांची उंची पाण्याच्या पातळीपासून साडेआठ मीटर ठेवली गेली. त्यामुळे बोटी त्या पुलाखालून जातात. कालव्यावरचे पुलही त्या रूपगर्वितेच्या सौंदर्यात भर टाकतील हे पाहिलं गेलं. त्यातल्या शेख झाईद रोडवरच्या पुलाला दोन्ही बाजूंना मिळून सोळा लेन्स आहेत आणि लोकांना एका किनाऱयावरून दुसऱया किनाऱयावर जाण्यासाठी जो पूल उभारलाय तो उत्कृष्ट कमानीसारखा आहे. कौतुकाची गोष्ट हीच असते की रूपगर्वितेचं सौंदर्य डागाळलं जात नाही. ते डोळय़ात तेल घालून पाहिलं जातं.

या कालव्याचा एक रत्नजडित दागिना म्हणजे जिथे हा कालवा शेख झाईद रोडला मिळतो, तिथला पाण्याचा धबधबा. तो कृत्रिम यांत्रिकी धबधबा आहे. तो अखंड आहे. त्या पुलावरून पाणी पंप केलं जाते. रात्री विविध दिव्यांच्या रंगांमध्ये तो उठून दिसतो आणि जेव्हा बोट आल्याचं सेन्सर्समधून कळतं तेव्हा ते पाणी थांबतं. थिएटरमध्ये पडदा उघडतो, तसं ते वाटतं आणि त्यातून बोट जाते.

सर्वच अप्रतिम! पैसे अशा प्रोजेक्टमध्ये टाकले जातात आणि ते दामदुपटीने वसूलही केले जातात. ती दृष्टी दुबईच्या शेखकडे आहे. म्हणूनच दुबई हे आखातातील सर्वांत सुंदर रत्न ठरलंय.

– [email protected]