
>> द्वारकानाथ संझगिरी
जर्सी बेटाची सफर दोन गोष्टी पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. एक ‘जर्सी वॉर टनेल’, दुसरं ग्लास (काचेचं) चर्च!
‘जर्सी वॉर टनेल’ हे एक वॉर म्युझियम आहे. दुसऱया महायुद्धात हे बेट हिटलरच्या सेनेने काबीज केलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे जर्मनांनी अनेक बोगदे खणले. त्यातल्या एका बोगद्यात हे म्युझियम आहे. एकेकाळी तिथे हॉस्पिटल होते.
दुसऱया महायुद्धाच्या काळातलं हे म्युझियम म्हणजे राजकीय आणि सामाजिक इतिहास आहे. आक्रमकांचा अत्याचार कसा असतो, जग जिंकण्याची खुमखुमी असलेली धर्मांध हुकूमशाही किती क्रूर आणि कठोर असू शकते याचा तो इतिहास आहे. एरवी शांत, सुखासीन, खेळकर, रोमँटिक जर्सी कसा तुरुंग बनून जातो त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण महाराष्ट्रात युद्धाच्या झळा कधी अनुभवलेल्या नाहीत. त्यामुळे ते मनाला जास्त भिडते.
तुम्हाला त्या बोगद्यात माझ्या बरोबर घेऊन जाण्याआधी थोडी पूर्वपीठिका सांगतो.
1 सप्टेंबर 1939 साली जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं. हिटलरचं आक्रमण एवढं प्रलयकारी होतं की, दोस्तांच्या फौजा डन्कर्क या फ्रेंच बेटापर्यंत नऊ एक महिन्याच्या आत मागे सरकल्या. फ्रान्सचा किनारा जर्सीपासून फक्त 14 मैलावर आहे. त्यामुळे जर्सीच्या सरकारला विनंती केली गेली की, सैन्याची सुटका करण्यासाठी म्हणजे शहीद न होता माघार घेण्यासाठी विमान पाठवा. त्यांनी 16 आणि 17 जूनला काही विमाने पाठवून सैनिकांची सुटका केली.
गंमत पहा. जर्सी हे ब्रिटिशांचा अंकुश असलेलं स्वतंत्र बेट होतं. जर्सीच्या सुरक्षेची जबाबदारी ब्रिटिशांची होती आणि इंग्लंडहून निरोप आला. ‘जर्सीचं रक्षण केलं जाणार नाही. इथलं सैन्य आम्ही काढून घेत आहोत.’ त्यात एक उपकाराचा निरोप होता – ‘ज्यांना ब्रिटिश सैन्यात सामील व्हायचंय. त्यांच्या स्त्र्ाया-मुलांच्या सुटकेसाठी बोटी पाठवल्या जातील.’ आणि हे सर्व ठरवून सुटकेसाठी फक्त 24 तास दिले होते.
समजा तुम्ही त्यावेळी जर्सीत आहात. काय हलकल्लोळ माजला असेल याचा विचार करा. क्षणापूर्वी सूर्याच्या उन्हात तुम्ही सुखासीन आयुष्य जगत होतात. पुढच्या क्षणी आकाशात सूर्य होता, पण तुमच्या आयुष्यात अंधार पडला होता. इथून त्या म्युझियमची सुरुवात होते. उत्तम फोटोग्राफ्स आणि मोठय़ा अक्षरात लिहिलेल्या माहितीतून तुमच्यापुढे तो काळ उलगडत जातो. बघता बघता तुम्ही त्या काळातले जर्सीकर कधी होता ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही. जर्सी सोडण्यासाठी 23 हजार नागरिकांनी नावं दिली. म्हणजे जवळपास निम्म्या लोकसंख्येला पळायचं होतं. त्यांना बँकेकडून फक्त प्रत्येकी 25 पौंड काढायची मुभा होती आणि जायचं कुठे? इंग्लंडला जाऊन करायचं काय? तिथेही अंधारच! बघता बघता मी त्या घोळक्यातला एक होतो. मी बंदरावर गेलो. त्या कोळशाच्या, धान्याच्या, सिमेंटच्या बोटी पाहिल्या. त्यात खच्चून भरलेली माणसं पाहिली आणि बंदरावर तसाच उभा राहिलो. अडकलो जर्सीत म्हणून घरी परतलो तर घर लुटलं होतं. ज्यांनी पळण्यासाठी नावं दिली नव्हती त्यांना वाटलं मागे उरलेले सर्व त्यांचंच आहे. त्यांनी ते लुटलं. माणूस संस्काराचे कपडे मनावरून क्षणात फेकून जनावर बनतो. फक्त साडेसहा हजार लोकं जर्सी सोडू शकले. जी माणसं इंग्लंडमध्ये गेली त्यांना‘निर्वासित’ म्हणून लॅन्कशायर, येशायर, यॉर्कशायरमध्ये वसवण्याचा प्रयत्न केला गेला. जर्सीवाल्यांना सर्वच नवं होतं. त्यांनी पांढऱया आणि काळय़ा गाई पाहिल्या नव्हत्या. त्यांना कारखाने आणि रेल्वे ज्ञात नव्हती.
इथे मी स्वतःला जर्सीवासीयांतून बाहेर काढलं आणि तटस्थपणे पुढचा म्युझियम पाहिला.
मग तुम्हाला दिसतात ती जर्मन्स आल्याची चित्रं. त्यांनी महत्त्वाच्या इमारती आणि ऑफिसेस ताब्यात घेतली. घडय़ाळातली वेळ जर्मनीप्रमाणे केली. ट्रफिकचे नियम बदलले आणि मग हिटलरचे धर्मांध विषारी दात बाहेर आले. तिथल्या ‘ज्यू’ची एक वेगळी यादी करण्यात आली. म्हणजे ते त्यांचा छळ करायला मोकळे झाले. थेट गोळी घातली की माणूस एकदाचा सुटतो. छळ केला की तो रोज मरण भोगतो. हिटलरने छळ केला. त्यानंतर जर्सीमध्ये जे ब्रिटनमध्ये जन्म घेतलेले होते त्यांची एक यादी केली गेली. त्यांना जर्मनीत पाठवण्यात आलं. निखळ जर्सीकर जर्सीत राहिले.
या म्युझियममध्ये त्यानंतर जर्सीवासीयांचं आयुष्य दाखवलंय. ‘कल चमन था, आज एक सेहरा हुआ’ म्हणजे काय याची तिथे जाणीव होते. साखर, चहा, कॉफी, साबण, बूट, कपडे वगैरे प्रचंड महाग झाले. साखरेऐवजी बीटसिरपचा वापर केला जायचा. चहा गाजरापासून बनवला जायचा. जुने पडदे आणि चादरी कापून कपडे बनवले गेले आणि बुटांचे सोल झिजल्यावर लाकूड लावलं गेलं. तेल आणि रंगातून लिपस्टिक तयार केली. त्यानंतर बार्टर सिस्टीम सुरू होती. एका बुटाच्या जोडीवर पडद्याचं कापड मिळायचं. सायकलची टायर टय़ूब देऊन खुर्ची विकत घेतली जायची वगैरे! ज्यावेळी सर्वसाधारणपणे आठवडय़ाला दोन पौंड पगार होता, तेव्हा सुप्रसिद्ध ‘बर्डस् कस्टर्ड’ चार पौंडाला मिळायचं.
म्युझियमचा त्याचा पुढचा भाग तुम्हाला एक नागडं सत्य सांगतो. तिथे एक जुनी म्हण लिहिली होती. ‘When patriotism touches a man’s pocket or his stomach it often evaporates’ त्यामुळे काही ‘जर्सीकरांनी’ जर्मन सैनिकांपुढे लोटांगण घातलं. कुणी ब्रिटिशप्रेम दाखवलं तर त्यांच्या चहाडय़ा केल्या गेल्या. त्याच्या बदल्यात त्यांना अस्सल चहा, पाव, कपडे वगैरे सुख मिळवता आले. जर्सीतल्या काही मुली देखण्या जर्मन सैनिकांच्या प्रेमातच पडल्या. काहींनी प्रेमाचं नाटक केलं. ‘देहदान’ करून सुखं मिळवली. अर्थात जर्मनविरोधात छुपं कारस्थानं करणारी मंडळीही तिथे होती.
या वॉर बोगद्यासह अनेक बोगदे हे पकडलेले सैनिक, युरोपात अटक केलेले विविध देशांतले नागरिक. त्यांना गुलाम करून बांधून घेतले गेले. ‘ज्यू’ खालोखाल हिटलरचा राग रशियन्सवर होता. त्यांना तो मनुष्य मानायला तयार नव्हता. या मंडळींना रोज बारा तास अत्यंत वाईट परिस्थितीत काम करायला लावलं. एकही दिवस सुट्टी नाही. काम कष्टाचं, दगड फोडणे, दगड वाहून नेणे, लोखंडाची मोठी अवजारं वापरणे. वगैरे! खाणं इतकं कमी असे की हे शिक्षित, उच्चशिक्षित मजूर पोट भरण्यासाठी उकिरडे फुंकत. ‘नरेची केला हीन किती नर’ हे तो म्युझियम पाहताना पटतं. त्याचं दुर्दैवं पहा. दोस्त राष्ट्र जिंकत चालल्यावरही जर्सीकरांना जीवनावश्यक गोष्टी पाठवायला चर्चिलने नकार दिला. का? तर त्या तिथे पाठवल्यावर त्याचा फायदा तिथल्या जर्मन सैनिकांना होईल या भीतीने! नंतर कधी तरी रेडक्रॉसच्या वतीने त्यांना काही गोष्टी मिळाल्या.
8 मे 1945 साली जर्मनी शरण आल्याचं सर विन्स्टन चर्चिलचं भाषण जर्सीकरांनी ऐकलं. आनंदाला उधाण आलं. मग प्रतिशोध सुरू झाला. ज्या मुलींनी जर्मन सैनिकांबरोबर संबंध ठेवले त्यांना ‘जर्सी बॅग्ज’ म्हटलं गेलं. त्यातल्या काही सैनिकांबरोबर फासावर लटकल्या. ज्यांनी जर्मन सैनिकांना मदत केली होती त्यांच्या घरावर मोठमोठी स्वस्तिक काढली गेली. ते तुरुंगात गेले. जर्सी पूर्ववत व्हायला दशकं लोटावी लागली.
म्युझियम पाहून मी त्या काचेच्या चर्चमध्ये गेलो. संपूर्ण अंतरंग काचेने बनवलंय.
एका लॅलिक (Lalique) नावाच्या फ्रेंच आर्किटेक्टची ती कमाल आहे. ते ऍग्लिकन चर्च आहे. तिथे ना मेरीची मूर्ती आहे, ना ख्रिस्ताची! एक मोठा काचेचा क्रॉस उभा आहे. मी क्रॉससमोर हात जोडले आणि आकाशातल्या बापाला सांगितलं. ‘जगभरात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखात मला हिटलरचा वंश दिसतो. कृपया त्यातून हिटलर निर्माण करू नकोस. आम्हाला इतिहासातून शिकायला शिकवं… त्यांना सुबुद्धी दे.’



























































