भटकेगिरी : स्कॉटलंडचे नंदनवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

इनव्हरनेस, बेननेव्हिस, आईल ऑफ स्काय हा त्रिकोण केल्याशिवाय स्कॉटलंडमधून परतू नये. पाप लागतं. माणसाच्या कलात्मक जाणिवेचा अपमान होतो. स्कॉटलंडच्या नैसर्गिक आस्वादामध्ये फक्त स्कॉच, व्हिस्की येत नाही. आम्ही हा त्रिकोण पालथा घातला. गाडीने जात असल्यामुळे हवं तिथे थांबता यायचं. मुख्य म्हणजे हवं तिथे जाता यायचं. अलीकडे जीपीएसमुळे वाकडी वाट केली, तरी पुन्हा हमरस्त्यावर येणं सोपं होतं.

थंडीत सकाळी उठल्यावर दुलईतून बाहर पडणं नकोसं वाटतं. स्कॉटलंडचा निसर्ग तसा आहे. तिथून बाहेर पडणं नकोच वाटतं. तुम्ही फिरता, त्यावेळी नशिबवान असाल तर वर निळं आकाश असतं. या उत्तर पश्चिमेस कुठला ना कुठला तलाव असतो. पाणी तसचं निळं असतं. तलावाची नावं बदलतात. रस्त्याच्या दुसऱया बाजूला डोंगर असतो. माणसाने सजवलंय वाटावं इतपत हिरवेपण शिस्तबद्ध असतं. मेंढय़ांचे कळपच्या कळप, तो फाइव्ह स्टार बुफे रिचवत असतात. एकंदरीत त्यांच्या शरीराकडे पाहिल्यावर त्यांच्या सुखवस्तूपणाची जाणीव होते. रस्ते संगमरवराचे न बनवूनही गुळगुळीत वाटतात. ते फार रुंद वगैरे नसतात. पण ट्रफिकची शिस्त असल्यामुळे केवळ ‘पहिले आप’ म्हटल्यामुळे अखेर रस्ता रुंद वाटायला लागतो. ‘पहिले आप’चं कौतुक लगेच तो समोरून येणारा मोटरवाला करतो, इतकी वर्षे परदेशी जाऊनही एका गोष्टीचा मला अचंबा वाटणं कमी झालेलं नाही. अरुंद रस्त्यावर समोरून गाडी आली की प्रत्येकजण दुसऱयाला आधी जाऊ देण्याचा प्रयत्न करतो. हिंदुस्थानी माणसासाठी ही शिस्तीची परिसीमा आहे. आपल्याकडे आपण असा एकतर्फी प्रयत्न केला तर उर्वरित आयुष्य आत गाडीत बसून राहू.

त्या तलावाजवळच्या रस्त्यावरची झाडं बऱयाचदा कमानी करून उभी आहेत असं वाटतं. काहीवेळ बाजूला अनंत सुंदर फुलं पाहायला मिळतात. ऱहोडोडेंड्रॉन्स (Rhododendrons) नावाची फुलं तिथे रस्त्याजवळ मैलोन्मैल दिसतात. ती केवळ रस्त्यावर दिसतात. निसर्गतः दिसतात. म्हणून त्याला ‘रानटी फुलं’ म्हणणे विचित्र वाटतं. हे ऱहोडोडेंटड्रॉन्स थंड प्रदेशात जास्त खुलत असावे. उत्तर अमेरिकेत किंवा आपल्याकडे नेपाळ, उत्तराखंड वगैरे ठिकाणी ती फुलं सापडतात. जर्मनीत या फुलांच्या बागा तयार केल्या आहेत. बऱयाच ठिकाणी त्याचं खास रोपण केलं जातं, अशी ऱहोडोडेंड्रॉन स्कॉटलंडच्या फार्टविल्यम्सला बेवारशासारखी उगवताना दिसतात. निसर्गाचा विचित्र न्याय आहे हा. इंग्लंडच्या काही किनाऱयांवर बारीक वाळू खास आणून टाकलीए. कारण तिथे जास्त छोटे गोटे सापडतात आणि अरबी आखातात वाळू सर्वत्र बेवारशासारखी पसरलेली असते, तसंच हे आहे. निसर्ग कुणाला काय देईल सांगता येत नाही. त्याने अरबांना वाळू दिली, कडक उन्हाळा दिला. गरम चटके दिले आणि त्याबरोबर तेल देऊन टाकलं. स्कॉटलंडला गोठवणारी थंडी दिली. दोन उशाःप दिले. एक हिरवागार रंगबेरंगी उन्हाळा आणि डोंगरातून खळाळत वाहणारं पाणी, ज्याची किंमत स्कॉच, व्हिस्की पिताना कळते. हुशार गोऱयांनी बर्फ आणि थंडीतल्या छोटय़ा दिवसाचेही नंदनवन केले. तिथला हिवाळा आता बर्फातल्या खेळांनी दुमदुमून जातो.

स्कॉटलंडमध्ये जाऊन बेननेव्हिस न पाहणे म्हणजे सिक्कीमला जाऊन कांचनगंगा शिखर न पाहण्यासारखं आहे. बरं पाहणं, म्हणजे नुसतं पाहणं हं. वर जाणे नाही. तो फक्त स्कॉटलंड नाही, तर ब्रिटनचा मुकूट आहे. चार हजार चारशे अकरा फुटांवरचं ब्रिटनचं सर्वांत उंच शिखर! तसे ब्रिटनचे डोंगर बुटकेच. स्कॉटलंडमध्ये डोंगरात त्यातल्या त्यात उंची दिसते. त्यातलं हे सर्वांत उंच. पर्यटक म्हणून तुम्ही तिथे जात नाही. कारण वर साधं हॉटेलही नाही. टॉयलेट्सही नाही. तिथे गिऱहारोहक जातात. डोंगराशी संबंधित जेवढे साहसी खेळ आहेत ते बेननेव्हिसच्या कुशीत खेळता येतात. तिथे 1771 साली 17 ऑगस्टला पहिला माणूस पोहचला. जेम्स रॉबर्टसन हे त्याचं नाव. आता दरवर्षी एक लाख साहसी पर्यटक तो चढून जातात. त्यात तीनचतुर्थांश मंडळी कच्चा रस्ता वापरतात. त्याला पोनीट्रक म्हणतात… या ब्रिटिशांच्या मुकुटाचा आकार कोसळलेल्या घुमटासारखा आहे. तिथे पूर्वी एक ‘ऑबझरवेटरी’ होती. ती साधारण 1883 ते 1904 पर्यंत ‘कार्यरत’ होती. आता ती बंद आहे. अर्थात बेननेव्हीस चढणं फारसं कठीण नसावं. त्या ‘पोनीट्रक’ची नीट काळजी घेतली जाते. डोंगरातून वाहणाऱया स्कॉचच्या पाण्यामुळे आणि काही ठिकाणी विविध आकाराचे दगड यामुळे काही भाग निसरडा ठरू शकतो. चढ सरळ नाहीए, नागमोडी वळणं आहेत. त्यामुळे उत्साह असेल आणि पायात आणि छातीत दम असेल तर वर नक्की चढावं. जे नेहमी डोंगरखोऱयात रमतात त्यांच्यासाठी बेननेव्हीस चढणं हा वेगळा आनंद ठरू शकतो.

इथे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी बेननेव्हीस धावत चढून उतरण्याची शर्यत होते. त्याला ‘बेननेव्हीस रेस’ म्हणतात. 1895 साली फोर्ट विल्यम्समधला एक नाभिक धावत बेननेव्हीस चढला आणि उतरला. तो सप्टेंबर महिना होता. त्याने साधारण 2 तास एकेचाळीस मिनिटं घेतली. तिथे या शर्यतीचे बीज पडले. त्यावर एखादं रोपटे उगवले, पुन्हा जमीनदोस्त झाले. पण 1937 पासून हे रोपटं खऱया अर्थाने फोफावलं. आता फोर्ट विल्यम्स इथल्या क्लॉगन पार्क, फुटबॉलच्या मैदानावरून शर्यत सुरू होते. ती 14 किलोमीटर्स लांबीची आहे. त्यात 4400 फुंटाचा (1340 मीटर्स) चढ आहे. फक्त पाचशे धावपटूंना भाग घेता येतो. ज्यांनी किमान तीन डोंगर रनिंग स्पर्धेत भाग घेतलाय त्यांचीच निवड होते. धावपटूला स्वतःचा रेनकोट, एक टोपी, हातमोजे आणि एक शिट्टी आणावी लागते. एखादा धावपटू दोन तासांत बेननेव्हिसला भोज्या करू शकला नाही तर त्याला वरून परत पाठवलं जातं. आजचा तिथला विक्रम एक तास 25 मिनिटे 34 सेकंदांचा आहे. पण तो 1984 साली केस्वीक (लेक डिस्ट्रिक्ट)च्या केनी स्टुअर्टने केला होता. आजही तो अबाधित आहे. महिला फार मागे नाहीत. 2018 साली व्हिक्टोरिया विलकीनसनने एक तास त्रेचाळीस मिनिटे आणि एक सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला. तुम्हाला हे विक्रम मोडायचेत तर पळा बेननेव्हीसवर.

पण जी मंडळी दोन जिने चढायला लिफ्ट वापरतात त्यांच्यासाठी हे काम नाही. त्यांच्यासाठी जवळच्या एका शिखरावर जायला गोंडोला आहे. त्याने मस्त वर जायचं. तो जवळच्या डोंगरावर 650 मीटर्सपर्यंत घेऊन जातो. जाताना समोरचे डोंगर तलाव दिसतात. बेननेव्हिस दिसतं. वर एक चांगलं रेस्टॉरंट आहे. मी तिथे गेलो तेव्हा पाऊस उन्हाचा खेळ सुरू होता. ढग आलं की समोरचं दृश्य मिटून जाते. फक्त राखाडी पडदा दिसत होता. ढग गेले, सूर्य आला की समोरचं दृश्य साठवायला दोन डोळे अपुरे वाटतात. हातात एक गरम कॉफी घ्या आणि एक एक घोट होत समोरच्या डोंगरात आणि तळय़ामध्ये हरवून जात. तिथे काही खेळही आहेत. पक्ष्यासारखं उडता येते. सायकलने खडबडीत रस्त्याने खाली उतरता येते. नाहीतर गोंडोला आहेच परत जायला तो आपले कष्ट झेलतो आपण विसवतो.

मला तर गोंडोलाच माझा मित्र वाटला.

– [email protected]