
>> द्वारकानाथ संझगिरी
स्कॉटलंडला गेलात तर आईल ऑफ स्कायला नक्की जा. ते एक बेट आहे. स्कॉटलंडच्या मूळ भागाशी एका पुलाने जोडलंय. तो पूल ही मूळ गर्भाला जोडणारी नाळ आहे. ते बाळ, मूल गर्भाच्या सौंदर्यात भर घालतं. ते पाहणं म्हणजे हिमाचलला जाऊन धरमशालेला न जाण्यासारखं आहे. पाहायचं काय तर निसर्गच! मर्दानी डोंगर, निळं पाणी, डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे दुधाळ धबधबे, निसर्गाने तयार केलेली डोंगरातली शिल्पं आणि अंगावर वारा झेलत, समुद्राकडे पाहत स्कॉच प्यायची. ऐषआरामी चैन! निसर्गरम्य बेट म्हटल्यावर श्रीमंतांचे वलयांकित बंगले आलेच. ती श्रीमंती पाहिली आणि आफ्रिका-आशियातली गरिबी पाहिली की, माडगूळकरांच्या गीताची ओळ आठवते, ‘कुणा मुखी पडते लोणी, कुणा मुखी अंगार!’ लोणी चाखता येत नाही, पण लोणी पाहायला काय हरकत आहे?
तिथे फिरायला गाडी हवी आणि मजबूत पाय. असंच एक फिरायचं ठिकाण म्हणजे ‘ओल्ड मॅन ऑफ स्टार’. हे शिखर खूप लांबून दिसतं. आपण कर्नाळय़ाला गेल्यावर ‘थम्स अप’ केलेला डोंगर किती कौतुकाने पाहतो? फार नाही, पण आईल ऑफ स्कायला गेल्यावर ‘ओल्ड मॅन ऑफ स्टार’ कौतुकाने पाहत त्याचे फोटो काढतो. उत्साही मंडळी वर चढायला जातात. तुम्ही पॅकेज कसं बनवून विकता त्यावर सर्व अवलंबून असतं. या डोंगराच्या एका बाजूला. म्हणजे पूर्वेकडे उभा कडा आहे. तो निळय़ा तलावात पाय सोडून उभा आहे, पण पश्चिमेकडून एक गवती रस्ता आहे. तिथून तुम्ही वर चढू शकता. कार पार्कपासून न थांबता वर चढायला सवा तास लागतो. वर गेल्यावर तिथून विहंगम दृश्य नक्की दिसत असेल, पण किती कडे चढायचे? आता लोकांना हा कडा चढवायला लावायचा म्हणून या कडय़ाभोवती एक दंतकथा रचली गेली. ‘ओल्ड मॅन ऑफ स्टार’ हा एक प्रचंड राक्षस वगैरे होता. तो तिथे राहायचा. तो मेला. मग त्याला पुरलं तेव्हा त्याचा अंगठा वर राहिला. ते शिखर म्हणजे तो त्याचा अंगठा. बरं, त्याचं एका दंतकथेवर भागलं नाही. दुसरी दंतकथा अशी आहे की, तिथे ब्राऊनी नावाचा प्राणी होता. या आईल ऑफ स्कायच्या बेटावरच्या ओशिन (O’sheen) नावाच्या एका गावकऱयाने एका ब्राऊनीचे प्राण वाचवले. त्यामुळे दोघे मित्र झाले. म्हणजे माणूस आणि पशू! त्या ओशिनची बायको वारली आणि ओशिन दुःखीकष्टी झाला. त्यातच तो मेला. मग त्या ब्राऊनीने काय करावं? त्याने डोंगराला तोडून दोघांच्या स्मरणार्थ दोनं शिल्प बनवली. त्यातला मोठा दगड म्हणजे ओशिनसाठी केलेलं शिल्पं आणि दुसरं छोटं त्याच्या बायकोसाठी! बोला? ही दंतकथा पसरवली की, आजच्या विज्ञान युगातही माणसं तिथे येतात.
जाता जाता आणखी एक दंतकथा ऐकून जा. सील मासा देखण्या माणसाचं रूप घेतो. कुणी म्हणतं, त्यांना वर्षातून एकदा संधी मिळते. कुणी म्हणतं, चक्क नऊ दिवसांतून एकदा मिळते. अतृप्त स्त्र्ायांना सुख देणं हे त्यांचं प्रमुख काम असतं. जगभरात इतरत्र मत्स्यकन्यांच्या कथा सांगितल्या जातात. स्कॉटलंडमध्ये चक्क मत्स्यपुरुषांच्या! मुख्य म्हणजे काही मंडळींनी असं काही पाहिल्याचे अनुभव लिहून ठेवले आहेत.
कपोलकल्पित कथांनी जागांचे माहात्म्य वाढवायचं हा तिथला एक उद्योग आहे. एकंदरीत अंधश्रद्धा हिंदुस्थानातच नाही, चक्क जगभर आहे. तसा हा म्हातारा फक्त 719 मीटर उंच आहे. हौस असेल तर चढा वर आणि अंगठा सर करा.
‘फेअरी पूल्स’ ही आणखी एक आकर्षक जागा आहे. दुधाळ पाणी कलिन डोंगरांच्या अंगाखांद्यावरून नाचत खाली येते. ते खाली येते तिथे लगून्स तयार होतात. पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक आहे की, पाण्याखालचे डोंगर वगैरे आरशात पाहिल्यासारखे दिसतात. गाडी कार पार्कमध्ये ठेवून एक अडीच किलोमीटरचं अंतर दगडावरून चालायचं कोठेही. फार मोठा चढउतार नाही. ते खळाळून वाहणारं स्कॉचचं पाणी तुमच्या सोबतीला असतं. आकाश निरभ्र असेल आणि तुम्ही नशीबवान असाल तर पाणी चक्क हिरवं भासतं. त्यालाही एक दंतकथा आहे. आईल ऑफ स्कायमध्ये इतिहासपूर्व काळात सुंदर पऱया राहत असत. तिथे अनेक जागांचा उल्लेख फेरी अमुक, (Fairy) फेरी तमुक असा असतो. या सुंदर तलावांमध्ये या पऱया आंघोळ करत असतात म्हणून हा ‘फेअरी पूल’ प्रेमात पडावं. अशी छोटी तळी आहेत आणि आत उडी मारायची भयंकर इच्छा होते. पण तुम्ही अंगात एक स्वेटर किंवा कोट घालून फिरत असाल तर पाण्याच्या वाटेला जाऊ नका. रोज गिझरच्या गरम पाण्याने आंघोळ करणाऱयांचं ते काम नाही. त्यांनी काठावर बसावं. पाय पण पाण्यात सोडू नयेत. आपला चेहरा पाण्यात पाहावा. जर शर्ट आणि अर्ध्या चड्डीत फिरत असाल तर मनाचा हिय्या करून पाय पाण्यात टाकून बघावं. बर्फाच्या पाण्यात उतरायची तयारी असेल तर उतरावं. पण तिथे आत उतरून जलतरणाचा आनंद घेणारे गोरे पर्यटक पाहिले की, वाटतं, त्यांच्या शरीराला हीटर्स बसवलेले असावेत. एरवी त्या पाण्यात पऱयाच पोहू शकतात. माणसं नाहीत.
काळय़ा कलिन डोंगराच्या पायथ्याशी एक लेक आहे. स्कॉटलंडमध्ये सुंदर लेक आहे ही बातमी नाही. त्या तलावाचं नाव लॉक कोरुस्क. खरं सांगू, अनेकदा कानावर पडूनही त्या तलावाचं नाव माझ्या लक्षात राहिलेलं नाही. हा गोड पाण्याचा तलाव आहे. त्यालाही आख्यायिका आहे. स्कॉटलंडच्या तलावाच्या पोटात असं काय घबाड आहे की, तिथे चित्रविचित्र प्राणी राहत असावेत असं त्यांना वाटतं. आधी त्या तलावाचं स्पेलिंग सांगतो. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उच्चार करा – Loch Coruisk. या तलावात म्हणे केल्पीज राहतात (Kclpies). ही घोडय़ासारखी भुतं आहेत. कारण ते त्याचा उल्लेख स्पिरिटस् असा करतात. ती भुतं दिसतात घोडय़ासारखी आणि त्यांच्यात शंभर घोडय़ांची ताकद असते. तिथल्या टुमदार फॉलकर्क शहराजवळ. मोटरवेने जाताना दोन प्रचंड लोखंडाचे घोडे दिसतात. म्हणजे त्यांची डोकी घोडय़ासारखी आहेत. ती शिल्पं आहेत, पण त्या दंतकथेतून निर्माण झालेली.
स्कॉटलंडला फिरायला जाताना स्कॉटिश दंतकथा वाचून जा. मग तुम्हाला विविध गोष्टींचा उलगडा होईल. हिंदुस्थानातही काही ठिकाणी काही गोष्टी समजून घ्यायला पुराण वाचावं लागतंय. घरोघरी मातीच्या चुली.



























































