भटकेगिरी : क्लिफ ऑफ मोहर

572

>> द्वारकानाथ संझगिरी

डब्लिनला गेल्यावर ‘क्लीफ ऑफ मोहर’ न पाहाणं म्हणजे माथेरानला जाऊन पॅनोरमा पॉइंट न पाहाणं. डब्लिनहून टुरिस्ट बस तुम्हाला थेट पश्चिम किनाऱयावरच्या ऍटलांटिक समुद्रापर्यंत घेऊन जाते. त्या बसने प्रवास करताना पोटातलं पाणी, गिनिज बीअर, व्हिस्की काहीही हलत नाही. उलट आदल्या रात्रीच्या अंमल जास्त झालेल्या बीअर किंवा स्कॉचमुळे आलेला हँगओव्हर निसर्गाची हिरवी सजावट पाहता पाहता माणसाला नॉर्मल करतो. आमच्या बसच्या ड्रायव्हर कम गाइडने सांगितलं, ‘आमच्या हिरवळीच्या हिरव्या रंगाला 34 शेडस् आहेत.’ मला चार-पाच शेडस् नक्की सापडल्या. उरलेल्या 28 शेडस् हा अतिशयोक्तीचा प्रकार होता की माझी दुबळी दृष्टी हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. पण ज्या काही शेडस् दिसत होत्या त्याने डोळे सुखावत होते.

जाता जाता डुलकी येऊ नये म्हणून तो बरीच माहिती देत होता. तो म्हणाला, ‘आयर्लंडमध्ये तुम्हाला फारशी मॉल संस्कृती दिसणार नाही. आम्ही स्थानिक लोकांकडून खरेदी करतो. पूर्वापार चालत आलेल्या धंद्यांना प्रोत्साहन दिले जाते.’ मी डब्लिनचा कोपरान् कोपरा पाहिला असं नाही. पण जे मी पाहिलं, त्यात मोठे मॉल दिसल्याचं स्मरत नाही. त्याने आणखीन एक गोष्ट सांगितली. त्यांच्या देशात इलेक्ट्रिक गाडय़ांना भरपूर प्रोत्साहन दिले जातंय. पुढील दहा वर्षांत सर्व मोटरगाडय़ा इलेक्ट्रिकवर चालणाऱया असाव्यात, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी काय केलंय? इलेक्ट्रिक गाडय़ांना पार्किंग चार्ज नाही. सरकार त्यांना करात कपात करते. त्यांना विशेष ग्रॅन्ट देते. इलेक्ट्रिक गाडी ही पेट्रोल किंवा डिझेलच्या गाडीपेक्षा महागच असते. खरं तर खूप महाग असते. पण एखादी चांगली ‘ई गोल्फ’सारखी इलेक्ट्रिक गाडी तिथे 46 हजार युरोला असेल तर सरकारी मदतीमुळे ती 36 हजार युरोला पडते. बऱयाचशा चार्जिंग स्टेशन्सवर तिथे इलेक्ट्रिक गाडय़ांना चार्जिंग मोफत आहे. आयर्लंडमध्ये सध्या 26 हजार 200 गाडय़ा विद्युतशक्तीवर चालतात.
असो. आम्ही मात्र डिझेल बसने क्लिफ ऑफ मोहरकडे जात होतो. अजून 10-15 वर्षांनी तुम्ही याल तर इलेक्ट्रिक बसमधून जात असाल. ड्रायव्हर कम गाइडला फ्ल्युचिरिस्टिक व्हायची उबळ आली. मलाही मूड आला. मी म्हटलं, ‘पुढच्या जन्मी मी येईन तेव्हा बस उडत असेल.’ ड्रायव्हरला विनोद आवडला की त्याला मिळणाऱया पगाराला स्मरून तो हसला येसू ख्रिस्त जाणे! पण छान हसत खेळत आम्ही मोहरच्या टेकडीजवळ कधी पोहोचलो कळलंच नाही.

‘क्लीफ ऑफ मोहर’ म्हणजे ऍटलांटिक समुद्र नावाच्या निळय़ा शाईत आपलं कमरेखालचं अंग लपवून उभा असलेला डोंगर. चेहरा थोडा गोरा. कारण त्या डोंगराची जडणघडण चुनखडीची (थ्ग्सेदूहा) आहे. हा मोहरचा कडा दक्षिण-उत्तर असा 14 कि.मी.चा आहे. दक्षिणेकडे पाण्यावर तो 390 फूट आहे तर उत्तरेकडे 702 फूट. त्याच्याजवळच एक गाव दक्षिणेकडे सहा कि.मी.वर आहे आणि दुसरं उत्तरेकडे सात कि.मी.वर डुलिन, जिथे रेस्टॅरंटमध्ये मी तिथल्या स्थानिक बीअरबरोबर एक ‘मुंबई चिकन’ खाल्ली. एरवी मोहरच्या कडय़ाजवळ माणसांची वस्ती नाही. डिशचं नाव ‘मुंबई चिकन’ होतं. आयर्लंडमध्येही बॉम्बेचं मुंबई झालंय हे पाहून बरं वाटलं! मुख्य म्हणजे मस्त भूक लागली होती. कारण मोहरच्या कडय़ावरून फिरून आलो होतो.

मुंबईत कडा चढायचा की नाही याबद्दल मी शंभर वेळा विचार केला असता. पण तिथे ‘थोडं अजून वर जाऊया…थोडं अजून वर’ वगैरे विचार करता करता मी दक्षिण टोकाच्या माथ्यावर कधी पोहोचलो ते मला कळलंच नाही. अत्यंत शुद्ध हवेचा हा परिणाम आहे. हातात काठी घेतलेले गोरे जोडप्याने वर चढताना पाहून आपलाही हुरूप वाढतो. त्या कडय़ावरून दिसणारा निळा ऍटलांटिक आणि वरचं निळं आकाश डोळय़ात साठून राहतं. तिने मानवाने बांधलेला एक पडका किल्ला सोडला तर मानवी काही नाही. आहे तो निसर्ग. त्या निसर्गापुढे आपण किती क्षुद्र वाटतो. माणसातल्या मोठय़ात मोठय़ा चित्रकाराची पेंटिंग्ज निसर्गाच्या कुंचल्याच्या निर्मितीसमोर थिटी पडतात. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, पाश्चात्य देशात ही निसर्गाची पेंटिंग्ज पॅरिसच्या ललुर्व्हमधल्या मोनालिसाच्या पेंटिंग्जप्रमाणे जपली जातात. ती खराब करण्याचा प्रयत्न कुणाला करून दिला जात नाही. वर्षाला 16 लाख पर्यटक तिथे जातात. म्हणजे दिवसाला पाच हजार वगैरे. त्यांच्यासाठी व्हिजिटर सेंटर तिथे उभं केलंय. त्यात सुखसोयी आहेतच, पण विविध चित्रफितीतून तुम्हाला माहिती पुरवली जाते.

तिथे पक्ष्यांचे साम्राज्य आहे. ते जपले जाते. तिथे पफिन नावाचे पक्षी पाहायला मिळतात. पोटाकडे गोरे, पाठीकडे काळे. त्यांची खासियत म्हणजे ते समुद्राच्या पाण्यात थेट आत जातात. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते. समुद्रातल्या पाण्यातलं सावज ते वरतून हेरतात आणि वेगात झडप मारतात. ते पंख किती वेगात हलवत असतील? एका मिनिटात चारशेच्या आसपास वेळा पंखांची उघडझाप करता येते. सर्व पक्षी मिळून तिथे 30 हजार पक्ष्यांची जोडपी आहेत. तुम्ही नशिबवान असाल तर समुद्रात तुम्हाला डॉल्फिन्स आणि शिळमासे दिसू शकतात. मी नव्हतो. बोटीतून त्या कडय़ांच्या पायथ्याशी आम्ही गेलो. कुठल्या फलाण्या सिनेमाचं शूटिंग कुठल्या ठिकाणी किंवा गुहेत झालं हे सांगितलं गेलं. त्यात हॅरी पॉटर सिनेमा होता.

तिथून निघताना कोकणाचा किनारा माझ्या डोळय़ांसमोर आला. काळे कातळ आले. त्यातल्या कपारी आल्या. गुहा आल्या. अरे, पांढरा डोंगरच विकला जातो असं नाही. काळा पण जातो. पण विकायची बुद्धी, कौशल्य आणि वृत्ती हवी. कोकणातल्या मातीतल्या आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या आणि आज आयर्लंडचा पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकरकडे ती आहे. उरलेल्या कोकणी माणसांना कोकण पर्यटनाच्या जागतिक नकाशावर कधी येणार, हा प्रश्न का पडत नाही?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या