लिस्बनमधील ‘गोवा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

लिस्बनच्या विमानतळावरून हॉटेलला जाताना मी का कुणास ठाऊक, गोव्याच्या, विशेषतः पणजीच्या खाणाखुणा शोधत होतो. लिस्बनच्या समोर पणजी चिमूटभर आहे, पण तिथे फिरताना डोक्यातून गोवा जात नाही हे नक्की! लंडनच्या हिथ्रोवरून लिस्बनला जाताना विमानाच्या रांगेत आणि विमानात मला पोर्तुगीजांमधलं भारतीयत्व दिसलं होतं. इंग्लंडमध्ये आजही शिस्तीला महत्त्व आहे. ‘पहिले आप’ ही संस्कृती इंग्लंडच्या नव्या पिढीच्याही रक्तात उतरलीय. पोर्तुगाल एअरलाइन्सच्या विमानात शिरताना चक्क ‘पहिले मै’ ही हिंदुस्थानी भावना दिसली. इतकी तिथे झुंबड उडाली. आपण ‘इंग्लंड सोडतोय ही जाणीव तिथल्या तिथे झाली. लिस्बनला विमान उतरल्याक्षणी हिंदुस्थानात ऐकू येतात तसे सीटचा पट्टा काढल्याचे आवाज फटाक्यांची माळ लावल्यासारखे आले. विमान थांबायच्या आधीच काही मंडळींनी वरून आपलं सामान काढलं होतं. चुकून आपण पणजीला उतरतोय की काय असं वाटायला लागलं, पण टॅ नदीतून हॉटेलवर जाताना आजूबाजूचे वातावरण, थाटमाट हा युरोपचा होता.

मात्र हवामान ओळखीचं होतं. पोर्तुगालच्या एका बाजूला स्पेन आहे, तर दुसरीकडे अटलांटिक महासागर आहे. त्यामुळे तो युरोपातला एक ‘उबदार’ हवामान असलेला देश आहे. स्वेटर जाऊ दे, फुलशर्टही आता अमिताभला अमरसिंग नकोसा वाटतो तेवढा तिथं नकोसा वाटत होता. त्यामुळे पोर्तुगाल-स्पेनच्या आमच्या सफरीत शॉर्ट पॅण्ट आणि टी शर्टच्या शिवाय एखादा पोषाख घालणं हा त्या वातावरणाचा अपमान होता. आमच्या हॉटेलच्यासमोर एक बुल रिंग होते. तिथून पहाटे तीन वाजेपर्यंत संगीत ऐकायला येत होतं. आमच्या ग्रुपमधली काही उत्साही मंडळी तिथे सकाळपर्यंत नाचत होती. पण रात्री मी सारखा तळमळत होतो कारण तिथे जून महिन्यात तीन संतांना आदरांजली वाहणारा ‘सॅन्तोस पॉप्युलर्स’ हा एक उत्सव असतो. सेंट ऍन्थोनी, सेंट जॉन, सेंट पीटर हे ते तीन संत! मला त्यातलं संगीत ऐकायचं होतं. रॉक आणि पॉप संगीताच्या क्षेत्रात पोर्तुगीज कलाकार टॉपवर आहेत. त्यामुळे त्यात मला रस होता. मी त्यांच्या ‘फादो’ संगीताबद्दल वाचलं होतं. उदास, हळव्या, करुण सुरांनी नटलेलं असतं. असं म्हटलं जातं की, अस्सल ‘फादो’ ऐकणं म्हणजे लिस्बनला जाणं, पण हॉटेल रूममध्ये सूर कानावर पडत होते ते उदास, हळवे वगैरे सूर नव्हते. त्यामुळे तो ‘फादो’ नसावा, पण जे काही होतं ते नाचायला लावणारं होतं.
गोव्यात ‘फादो’ संगीताचे काही प्रोग्रॅम होतात, पण ते साधारण पाश्चात्त्य, शास्त्र्ााrय संगीताच्या वाटेनं जाणारं असतं. सोनाली शिरसाट नावाची मुलगी गोव्यात या क्षेत्रात लोकप्रिय आहे. तिची आई कॅथलिक आहे. अशा मैफलींना उच्चभ्रू कॅथलिक जास्त जातात. तिथल्या कॅथलिकांमध्येही आपल्यासारखी जाती व्यवस्था आहे याची तुम्हाला कल्पना असेल! ख्रिश्चन होताना आणि बऱयाच जणांच्या बाबतीत त्यांच्यावर त्यासाठी जबरदस्ती होताना तिथे हिंदू आपली जात बरोबर घेऊन त्या धर्मात गेले. लिस्बनमध्ये चुकलेले ‘फादो’ संगीत कधीतरी गोव्याला ऐकेन.

एक गोष्ट मी मात्र जी लिस्बनमध्ये करायची ती केली. तिथली वाईन आणि मासे. गोव्याचे मासे तिथे नाहीत. सुरमयी नाही, बांगडे नाहीत आणि ‘चणक’ही नाही. गोव्यातला बांगडा हा जगातील सर्वोत्कृष्ट मासा असं माझी जीभ सांगते. ‘चणक’ मी फक्त गोव्यात खाल्लाय. जग म्हणतं की, ‘सॅमन’ हा सर्वोत्कृष्ट मासा. तो महागही असतो, पण बांगडा तो बांगडा! मॅकॅरललाही (पाश्चिमात्त्य बांगडा) आपल्या बांगडय़ाची चव नाही. बांगडा अॅण्डरसन असेल तर मॅकॅरल उमेश यादवही नाही. लिस्बनमध्ये उत्तम कॉड मिळतो. तिथे त्या कॉड माशाचे पदार्थ करण्याचे तीनशे पासष्ट प्रकार आहेत. म्हणजे सर्व ‘प्रकारां’ची चव घेताना एक वर्ष आरामात निघेल. तिथला ‘संझगिरी’ ते करत असेल. तिथे एक तर सोमवारी उपवास नाही आणि श्रावणही नाही. त्यामुळे तिथल्या डिसिल्व्हा, फर्नांडिसला रोज एक कॉडचा वेगळा प्रकार खाता येतो. आम्ही तिघांत थंड बिअरबरोबर कॉड तर मागवलाच. पण कोळंब्या आणि ऑयस्टर्सही मागवले. कॉड संपला याची हुरहूर वाटली. कोळंब्या-ऑयस्टर्स ‘संपवावे’ लागले. माशांबरोबर घेतलेली पोर्तुगीज बिअरही मस्त होती. आमचं संध्याकाळचं जेवण एका हिंदुस्थानी पंजाबी रेस्टॉरंटमध्ये होतं. व्यावसायिक ट्रव्हल कंपनीतून गेल्यावर हाच त्रास असतो. बऱयाचशा ग्रुपमधल्या मंडळींसाठी संध्याकाळचं जेवण हा प्रेमाने चर्चा करायचा विषय असतो. युरोपात रोज हिंदुस्थानी खाणं घेणं म्हणजे लंडनच्या पबमध्ये जाऊन ऑरेंज ज्यूस पिण्यासारखं आहे. युरोपात फिरायचं तर घ्या ना स्थानिक जेवणाचा आस्वाद! सतत कशाला हवी दाल, रोटी आणि बटर चिकन. पोर्तुगीज पोर्टवाईनची इच्छा मात्र मी पूर्ण केली. सर्वसाधारणपणे मला पोर्टवाईन आवडत नाही. ती खूप गोड असते, पण ज्या शहरात जायचं तिथल्या खास गोष्टींचा आस्वाद घ्यायलाच हवा. अर्थात ‘खास’ गोष्टींमध्ये फक्त खाणं आणि मद्य हेच अंतर्भूत आहेत. कृपया गैरसमज नसावा. अरे हो, पोर्कचा विंदालू खायचा राहिला. चला, पुन्हा गोव्यात जाऊन ती हौस भागवायला हवी.

लिस्बनमध्ये फिरताना गोवा आठवत राहणं हे अपरिहार्य आहे. तिथल्या सरकारी इमारती पाहिल्या की, पणजीची आठवण येतेच. पणजीपेक्षा मोठय़ा इमारती, पण तसंच साधं बाह्यरूप. मुख्य म्हणजे तेच ‘पेस्टल’ रंग. पेस्टल रंग म्हणजे हे मृदू, डोळय़ाला सुखावणारे, भडक नसलेले रंग! साधारणपणे लाइट गुलाबी, निळा, पिवळा वगैरे! पणजीच्या इमारतीवर ते जसे दिसतात तसेच ते लिस्बनमध्ये दिसतात. फक्त इमारती खूप मोठय़ा आहेत.

गोव्याची आणखी एक गोष्ट तिथे पाहता आली. तुम्ही दक्षिण गोव्यातले पोर्तुगीज बंगले पाहिले आहेत? अजूनही अप्रतिम दिसतात. तरुण, चकचकीत आणि देखणे! लिस्बनपासून फक्त 28 किलोमीटरवर एक सिंत्री नावाचं गाव आहे. पोर्तुगालमधलं ते सर्वात रम्य ठिकाण मानलं जातं. युनेस्कोने कल्चरल लॅण्डस्केप म्हणून त्या गावाची निवड केलीय. तिथे जाताना आणि गावात जे जुने बंगले दिसले ते या दक्षिण गोव्यातल्या बंगल्यांचे पूर्वज असावेत.

एकंदरीत लिस्बन फिरताना पणजी, दक्षिण गोवा, ओल्ड गोवा यांचा भास होत राहतो. लिस्बन फिरताना पणजीच्या युरोपात राहणाऱया थोरल्या भावाकडे आलोय ही जाणीव सुखावत असते.

[email protected]