स्वत्व राखणारा मराठमोळा टेनिस पंच

>> द्वारकानाथ संझगिरी

आज बॉब महादेवकर असते तर ते शंभर वर्षाचे असते.

आजची पिढी मला पहिला प्रश्न करेल कोण हे?

जग इतक्या वेगात पळत असतं की काळाच्या ओघात कालची माणसंसुध्दा पटकन विस्मृतीच्या पडद्याआड जातात.ते टेनिस पंच होते. पंच म्हणून त्यांनी, विम्बल्डनमध्ये, यू एस ओपन मध्ये, डेव्हिस कप मध्ये पंचगिरी केलीय. थोडक्यात टेनिसच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पंच म्हणून गौरवपूर्ण कामगिरी केली. त्यात मराठी म्हटल्यावर आपली कॉलर जरा टाईट करायला काय हरकत आहे? त्यांचं नाव भास्कर. त्यांना बॉब केलं विम्बल्डन मधल्या एका अधिकाऱयाने. उत्तम कपडे, रुंद कपाळ, डोक्यावर हॉलिवूडच्या बॉब होप प्रमाणे टोपी, त्यामुळे त्यांना ’बॉब’ हे टोपण नाव त्याने बहाल केलं. त्यानंतर सर्व त्यांना बॉबच म्हणत. त्यांच्या वेस्टर्न व्यक्तिमत्वाला ते नाव शोभत असे.

1983 ला मी वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला जाणार होतो. मला विम्बल्डन पहायचं होत, त्यामुळे कुणीतरी मला सुचवलं, ’बॉबला भेट, तुझे काम होईल.’ ते आमच्या शिवाजीपार्क मध्ये राहणारे. जिमखाना परिसरात रोज दिसत. पण विम्बल्डन पंच म्हणून एक आदर होता आणि थोडी भीती सुध्दा. पण त्यांच्याशी दोन मिनिट बोलल्यावर मला वाटलं मी मित्राशी बोलतोय. पहिल्या भेटीत त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या. म्हणाले ’पहिल्यांदा जातोयस तर उत्तम स्कॉच व्हिस्की तब्येतीत घे आणि एक लक्षात ठेव इंग्लिश मुली आणि इंग्लिश हवामान बेभरवशाचे असतं’. तोपर्यंत असा मूलभूत सल्ला कुणी दिला नव्हता. पुढे अनेकदा इंग्लंडला गेलो, पण इंग्लिश मुलींचा बेभरवसेपणा अनुभवायची संधी माझ्या बावळटपणामुळे मिळाली नाही. इंग्लिश हवामान किती बेभरवशाच असतं तेवढं अनुभवलं.

विम्बल्डन येथे गेल्यावर मला त्यांची वट दिसली. त्यांना मिळणारा मान दिसला. एकदा दिलीप वेंगसरकर त्यांना तिथे भेटला. म्हणाला ’ माझं तिकिट फक्त हिरवळीवर मॅच पहायचं आहे. मला प्लेयर्सच्या लॉकर रूम्स पहायच्या होत्या, सेंटर कोर्ट फिरायच होते. बॉबने अख्ख विम्बल्डन फिरवलं. पम्मी गावस्कर हक्काने त्यांना तिकिटाबद्दल सांगायची. आर्थर ऐश, जिम्मी कॉनर्स, पॅट कॅश हे त्याकाळचे खेळाडू त्यांचे जवळचे मित्र होते. ते विम्बल्डन किंवा यूएसला जाताना मित्रा करता बॅग भरून ’भेटी’ घेऊन जात. ते मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सेशन न्यायाधीश होते. त्यामुळे घरातच टेनिस कोर्ट होते. ते क्लब स्तरावर क्रिकेट, टेनिस खेळत होते. पण लाईफ स्टाईल अशी राजेशाही होती की व्यायाम वगैरे करून मोठा खेळाडू होणे कठीण आहे हे त्यांना कळलं. त्यांनी टेनिस पंच व्हायचं ठरवलं.

ते नागपूरच्या वरच्या उच्च वर्तुळात वावरल्यामुळे वानखेडे, वसंत साठे वगैरे मंडळी त्यांच्या मित्रपरिवारातली. स्वभाव मोकळा आणि बोलका असल्याने यांनी मित्र जोडले. अमेरिका आणि ब्रिटिश कौन्सिल मधली मंडळी सुध्दा त्याला अपवाद नव्हती.त्यांच्यावर चीड येणे कठीण होते. एकदा ते वानखेडेवर वानखेडेंसोबत बसून मॅच पाहत होते. इतक्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आल्याचा निरोप आला. वानखेडे बॉबला म्हणाले, ’साहेबांना घेऊन या’ बॉब उठले. त्यावेळी गोलंदाज चेंडू सुनीलला टाकत होता. सुनीलची एकाग्रता भंग झाली. तो बाद झाला. सुनीलसाठी विकेट म्हणजे प्राण. पण संध्याकाळी तो बॉबला हसत म्हणाला, ’मला टोपी पाहून वाटलच तूच असणार’. दुसरा कुणी असता तर सुनीलच्या रागाचा पारा इतक्या लवकर उतरला नसता.
जॉन मॅकेनरो, इली नास्तासेसारखे शिवराळ खेळाडू पंचांची पितर काढत, त्या काळात बॉबने स्वतःचे स्वत्व राखत पंचगिरी केली. तसे मध्यमवर्गीय असून त्यांच्या लाईफस्टाईलचे मला कौतुक वाटे. ते चांदीच्या ताटात जेवत. चांदीचा प्याला पाण्यासाठी वापरत, स्कॉच शिवाय त्यांनी व्हिस्की घेतली नाही, स्टेट एक्स्प्रेस शिवाय सिगरेट ओढली नाही. आणि मध्यम वर्गीय समाजात न आढळणारा धीटपणा त्यांच्यात होता. एकदा ते मला म्हणाले ’तू कुठे राहतोस’? मी पत्ता सांगितला. ’अरे त्या गल्लीत मी फिल्डिंग लावायला येतो’ मला कळेना. मी म्हटलं’ फिल्डिंग? ’ते हसत म्हणाले’ अरे माझी गर्ल फ्रेंड राहते तिथे’ माझेही गर्लफ्रेंड बद्दल बोलायचे दिवस संपले होते. तिथे हा माझ्या पेक्षा 30-35 वर्षाने मोठा मित्र चक्क गर्लफ्रेंडची गोष्ट करतोय! मी घरी गेल्यावर नुसत्या विचाराने आमच्या घराच्या सांस्कृतिक भिंती थरथरायला लागल्या. त्यांची पहिली बायको गेल्यावर त्यांनी ज्या डॉक्टर बाईशी लग्न केलं त्या आमच्या गल्लीत राहत असत. मस्त आयुष्य जगून शेवटपर्यंत स्कॉच घेत त्यांनी जगाचा निरोप घेतला. आमदार सदा सरवणकर यांनी या महान पंचांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून प्रयत्न केले. चर्चगेटला एका चौकाच्या रुपात त्यांची स्मृती महाराष्ट्र टेनिस असोसिएशनने जिवंत ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या