
>> द्वारकानाथ संझगिरी
काही वेळा परमेश्वर एक उजाड माळरान देतो. माणूस त्याच्यावर त्याच्या कल्पनेतून सुंदर नगरी उभी करतो. उदा. लासवेगास.
काही वेळा परमेश्वरच सुंदर स्थळ देतो. त्यात डोंगर असतात, विविध रंगांची फुलं असतात, हिरव्या रंगाच्या विविध शेडस्चं प्रदर्शन असतं. क्लिओपात्राच्या डोळय़ासारखं निळंभोर तळं असतं आणि शुद्ध हवा असते. काही महिन्यांनी हे हळूहळू नाहीसं होतं आणि एखाद्या श्वेतांबरीप्रमाणे ती जागा पूर्ण सफेत होऊ जाते. त्या जागेत जेव्हा कल्पक माणूस एखादं शहर किंवा गाव वसवतो तेव्हा ते शहर स्वप्नातलं शहर वाटतं. इनव्हरनेस तसं आहे.
खरं तर गाडीने फिरणं हा तिथल्या निसर्गाचा अपमान आहे. एक तर चालावं किंवा मैलोन्मैल पसरलेला लॉकनेसच्या काठावरून? सफर करावी. मग तुम्ही खऱया अर्थाने निसर्गाच्या मांडीवर असता. शहर म्हणाल तर टिपिकल ब्रिटिश शहराप्रमाणे इथे चर्चेस आहेत, म्युझियम आहेत. वॉटर फ्रंटला लागून पब्ज आहेत. वॉटरफ्रंट ही संकल्पना पाश्चात्य देशात फार सुंदर रितीने राबवली जाते. नदी असो, कालवा असो, तळं असो, समुद्र असो. त्याकडे पाहत ड्रिंक घेणं, जेवणं हा वेगळा आनंद आहे. ‘ऑम्बियन्स’ हा शब्द अलीकडे रेस्टॉरंटसाठी नेहमी वापरला जातो. निसर्गाच्या ऑम्बियन्ससमोर मानवनिर्मित ऑम्बियन्स फिकं पडतं हे साध्या वॉटरफ्रंटच्या पबमध्ये बसल्यावर जाणवतं. तिथं बीयर, तिथं विस्की, वाईन किंवा कॉकटेल असतं. पण हा नैसर्गिक ऑम्बियन्स त्याची नशा वाढवतो. इनव्हरनेसला गेलात तर अशा पबमध्ये जाऊन मी सांगतो तो अनुभव घ्याच. विशेषतः रात्रीच्या वेळी. दिव्यांचे प्रतिबिंब नेस नदीच्या पाण्यात पडतं. त्यामुळे पाणी दिवाळी साजरी करतेय असं वाटतं. बरं पब्ज जवळजवळ असल्यामुळे ‘पबशॉपिंग’ सोपं होतं. स्कॉटलंडचं सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट म्हणजे तिथली स्कॉच व्हिस्की. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक डिस्टीलिरीची चव, गंध, नशा वेगवेगळी असते. तिथली प्रत्येक स्कॉच व्हिस्की इंग्लंडच काय स्कॉटलंडबाहेर विकली जात नाही. त्यामुळे तिथली स्कॉच तुम्हाला लंडनमध्ये मिळेलच असं नाही. मुंबई तर दूर राहिली. त्यामुळे वाईन, बीयर, नेहमीची ब्लॅक लेबल वगेरे कुठल्याही मोहात न पडता तिथली स्थानिक व्हिस्की घ्या. मला व्हिस्की फारशी आवडत नाही. मी हिंदुस्थानात व्हिस्की फार क्वचित घेतो. अगदी सिंगल माल्ट एकवीस वर्षं जुनी वगैरे असेल तरच! शँपेन हे माझं सर्वात लाडकं ड्रिंक. पण स्कॉटलंडमध्ये मी फक्त वेगवेगळय़ा स्कॉचची चव घेतली. कितीही आवडली तरी पंजाबमध्ये जाऊन इडली सांबार खाण्यात अर्थ नसतो. ती व्हिस्की घ्यायचीही एक पद्धत आहे. त्यात एक थेंब पाणी टाकायचं आणि घ्यायची. ही दीक्षा मला तिथल्या व्हिस्कीच्या डिस्टीलरीतल्या तज्ञाने दिली. त्या एका थेंबाचं महत्त्व ना मला नीट समजलं, ना तो तज्ञ मला सांगू शकला. अगदी थेंबाने जमत नसेल तर दोन बर्फाचे तुकडे टाका, पण दोनच पाण्याचे थेंब टाकून घेतलेली स्कॉच आणि दोन बर्फाचे तुकडे टाकून घेतलेली स्कॉच यात लग्नाच्या पहिल्या पंक्तीतला मठ्ठा आणि तिसऱया पंक्तीतला मठ्ठा एवढा फरक आहे. मी यावेळी हायलॅन्डस्मधल्या बेन नेव्हासल डिस्टीलरीत डोकावलो. तिथे मला टूर घ्यायची होती. पण ती टूर भरलेली होती. मी चक्क मधल्या वारी गेलो होतो. तरी टूर भरलेली होती. याचा अर्थ अशा टूर्स किती लोकप्रिय आहेत याचा प्रत्यय तुम्हाला येईल. नंतर ग्लॅनमॉरेंजीला गेलो. हा अनुभव घेण्यासारखा असतो. ‘कुदरतने जो हमको बक्शा है वो सबसे हंसी जाम है ये’ असं साहिर लुधियानवी का म्हणतो ते कळेल. इतरत्र जगात स्कॉच विस्की तयार करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही, कारण स्कॉटलंडचं पाणीच वेगळं आहे. तुम्ही हायलँडमधून फिरलात की डिस्टीलरीज्च्या डोंगरावरून गेलेले पाण्याचे मोठे पाइप दिसतील. डोंगरात पाणी त्या पाइपातून आणलं जातं. डिस्टेलरी पाहिल्यावर पाण्याला ‘जीवन’ का म्हणतात ते पटतं.
असो. तुम्हाला शॉपिंग आवडो न आवडो (न आवडोपेक्षा न परवडो म्हणणं जास्त योग्य. कुणाला शॉपिंग आवडत नाही? आमचं दुःख हे असतं की आम्हाला ते परवडत नाही.) पण व्हिक्टोरियन मार्केटला एक चक्कर मारा. 1870च्या आसपास ते बांधलं. त्यावेळी त्याला छप्पर नव्हतं. निळं आकाश हेच छप्पर. नंतर कधीतरी ते आगीत जळालं. तिथल्या वास्तूत लाकडाचा वापर जास्त असल्यामुळे पूर्वी तिथे आगी जास्त लागत.
1890-91 च्या सुमारास ते नव्याने उभारलं तेव्हा त्याला छप्पर आलं. त्या छपराच्या जवळ खिडक्या आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्याची चक्कर स्कॉटलंडला असते तेव्हा नैसर्गिक प्रकाश त्या मार्केटला मिळतो. तिथल्या ऍकॅडमी स्ट्रीट क्लब जिथे मार्केटमध्ये शिरता येते तिथल्या कमानी 1870च्या आहेत. आगीत त्याचं नुकसान झालं नव्हतं. त्यातल्या मधल्या कमानीवर चक्क बैलाचं डोकं आहे. मधल्या दोन कमानीवर मेंढय़ाचं डोकं आहे. स्कॉटलंडच्या दृष्टीने ही दोन्ही जनावरं फार महत्त्वाची आहेत. एक व्हिक्टोरियन काळातलं, मार्केट त्यावेळचं आर्किटेक्चर म्हणून पाहायला ते चांगलं आहे. आठवणीसाठी काही गोष्टी घेऊन जायच्या असतील तर त्या तिथे मिळतील. एरवी तुमचा भ्रमनिरास होईल.
स्कॉटलंडला जाल तर किल्टचा (Kilt) अनुभव घ्या. किल्ट म्हणजे कमरे एवढा स्कर्ट. ज्याला पाठी प्लीट्स (निऱया म्हणूया का?) असतात. हे स्कर्ट पुरुष घालतात. आपण जसे समारंभाला, घरच्या लग्नाला धोतर घालतो, बायका नऊवारी साडी घालतात तसा तिथे घातला जातो. तो स्कॉटलंडचा राष्ट्रीय पोशाख आहे. तिथे तो लोकरीपासून बनवला जातो. तो टार्टन पॅटर्नचा असतो. टार्टन म्हणजे रंगीत चौकटीचं आणि नक्षीकाम असलेलं लोकरी कापड. त्यातला लाल रंग डोळय़ांत भरतो. एखाद्या फोटोसाठी तो परकर भाडय़ाने मिळतो. तुम्ही सूट किंवा कोट घालत असाल तर ‘टबीड’चा कोट किंवा सूट घ्या. महाग असतो, पण आयुष्यभर टिकेल आणि स्कॉटलंडची आठवण देत राहील. आयुष्यभर स्कॉटलंडच्या आठवणींचा सुगंधदेखील ठेवण्याची कुवत या टबीड कोटात आहे. मला परवडला नाही. म्हणून शब्दरूपात मी आठवणी जपतोय, पण तुम्हाला जमलं तर तुमच्या वॉर्डरोबचा ‘रोब’ नक्की वाढेल.





























































