दखल – सहसंवेदनांचा आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>एकनाथ आव्हाड

सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री ज्योती कपिले यांचा नवीन, टवटवीत आणि प्रसन्न असा ‘मनभावन’ हा ललित लेखसंग्रह वाचला. मुखपृष्ठापासूनच हा संग्रह लक्ष वेधून घेतो. यातील सुरुवातीचे काही लेख आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. निसर्ग सहवास घडवतात.

‘तर कधी शिशिर…’ हा लेख आपल्याला उत्सुकतेने वसंत ऋतूची वाट पाहायला लावतो. सृष्टीच्या सौंदर्यात भर घालणारा वसंत ऋतू ‘वसंतगान’ लेखातून नकळत आपल्याला निसर्गाच्या आनंदोत्सवात सहभागी करून घेतो.

चंपक महिमा, चैतन्याचा खळाळ, गुलमोहर, टपटप पडती, अराई-जंगल सफारी…यांसारख्या लेखांतून निसर्गात घडणाऱया गोष्टींकडे लेखिका किती संवेदनशीलतेने पाहते ते वाचताना आपल्या लक्षात येते.

बालपणीच्या कुल्फीच्या आठवणीची गोडी आताची महागातली महाग कुल्फी खातानाही मिळू शकत नाही, असे सांगत आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाणारा ‘मिठास’ हा ललितबंधही वाचनाची गोडी वाढवणारा आहे. पत्ता शोधताना ओळखीची खूण कशी उपयोगी पडते हे सांगणारा ललित लेख मजेशीर आहे. तसेच एरवी साधा वाटणारा पंगवा वेळप्रसंगी अतिमहत्त्वाचा कसा होतो ते ‘पंगवा हवाच हवा’ या ललित लेखातून आपल्याला उमगते आणि वाचता वाचता गालावर हसूही फुलवते.

‘अंतरीचा दरवळ’ हा हृदयाला स्पर्शून जाणारा लेख तर उत्तमच. एकातून दुसरी गोष्ट कशी घडत जाते आणि मग तीच गोष्ट आपल्यालाही नकळत कशी घडवत जाते हेच ‘खुल जा…’ या ललित लेखातून सहज उमगते. शाळेच्या आठवणींशी आपल्यालाही जोडून घेणारा हा ललितबंध छान जमून आला आहे. ‘मैत्र’ हा लेख तर मला खूप आवडला. मैत्री म्हणजे माणसाच्या जीवनवेलीवर फुलणारं नाजूक फूल. किती सुंदर ही मैत्रीची व्याख्या..! जेवढी सुंदर, नितळ मैत्री, तेवढाच सुंदर हा लेख.

एकूण सर्वच ललित लेख अतिशय तरल, सहज आणि ओघवते आहेत. त्यामुळेच हे सर्वच लेख ललितरम्य झाले आहेत. आपल्या वाचनाची गोडी ते वाढवतात हेच या पुस्तकाचे खरे यश. सुचले तसे मनोभावे लिहिले… या उक्तीनुसार हे लेख कागदावर उतरले आहेत. ज्योती कपिले यांच्या लेखनातील हा प्रामाणिक भाव मनाला भावतो. ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा नेरुरकर यांची पुस्तकाला लाभलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाची उंची वाढवते. लेखिकेचे प्रांजळ मनोगतही पुस्तक निर्मितीमागची धडपड उलगडत जाते. निसर्ग, कुटुंब, समाज, कला, साहित्य, नातेसंबंध….यांसारख्या कितीतरी विषयांची लालित्यपूर्ण मांडणी करणाऱया या पुस्तकाचे वाचक सहर्ष स्वागत करतील.

मनभावन
लेखक : ज्योती कपिले
प्रकाशक : जे. के. मीडिया
पृष्ठे : ः 96, मूल्य ः रुपये 150/-