
>> एकनाथ आव्हाड
डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितांची नेहमीच बाल जगत आतुरतेने वाट पाहत असते. सावंत सरांची बाल कविता बालसाहित्यातलं कवितेचं दालन नेहमीच अधिक समृद्ध करत आली आहे. सरांचा बालकुमारांसाठी असलेला ‘नदी रुसली नदी हसली’ हा नवीन बाल कवितासंग्रहसुद्धा बालसाहित्यात मोलाची भर घालणाराच आहे. खरं तर बाल कविता ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट, तशी भलतीच अवघड आहे. कारण त्या बाल कवितांचा बालकांशी खराखुरा संवाद व्हायला हवा. मला वाटतं, जी कविता बालमनाला भुरळ घालते, मुलांना पुनः पुन्हा वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता होय. अशाच उत्तमोत्तम बाल कविता आपल्याला ‘नदी रुसली, नदी हसली’मध्ये वाचायला मिळतात.
नदीला आपण रुसवले की, मग नदीला हसवायची जबाबदारीही आपलीच.नदीचं रुसणं आपलं जीवन रुसवतं. कवी म्हणतात…
‘नदी आटली म्हणजे जीवन आटले
घशाला कोरड आणि डोळा अश्रू दाटले’
मुलांना त्यांच्या शाळेतल्या वर्गाबाबतच्या खूप साऱया आठवणी अनेकदा आठवत असतात. ‘स्वर्गासारखा वर्ग’ या कवितेत या आठवणींचा सुंदर गोफ विणलेला दिसतो. कवी म्हणतात…
‘माझा वर्ग स्वर्ग होता, माझी शाळा होती बाग
भरकटलेल्या मनालाही, यांनीच आणली जाग’.
‘कागदाची कमाल’ या कवितेत तर मस्तच धमाल घडली आहे.
‘ज्ञान आणि विज्ञानाचे, सक्षम सारसूत्र आहे
राजर्षी शाहू विद्यालय, आमुचे तीर्थक्षेत्र आहे’.
‘अक्षरांच्या गमती जमती’ ही कविताही खूप सहजसुंदर आहे.
प्रत्येकाचे अक्षर कसे वेगवेगळे आणि माझे अक्षर जणू मोत्यांच्या माळा हा कवितेचा शेवट भन्नाटच.
‘पुस्तक माझा मित्र’ ही कविता पुस्तकांशी जुळलेले मैत्र आपल्याला कसे श्रीमंत करते, हे सहजगत्या सांगून जाते.
‘आमच्या गल्लीतली पोरं’ ही कविता वाचताना गल्लीतली पोरं आणि त्यांचे खेळ अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर येतात. कवी म्हणतात,
‘आमच्या गल्लीतली पोरं
आहेत भलतीच भारी
एकालाच हाक मारा
जमतील सारीच्या सारी’
श्रावणाचे, शाळेचे, शेकरूचे, कास पठाराचे यथार्थ वर्णन करणाऱया कविताही पुस्तकाची आणखी गोडी वाढवतात.
‘पर्यावरणपूरक गणपती’ ही कविता उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान जपले पाहिजे असा महत्त्वाचा विचार देते. ‘पावसा पावसा धाव रे’ ही कविता पावसाचा धावा करताना शेवटी म्हणते…
‘भुकेने व्याकूळ पाहून गाय
रानात उतरले पावसाचे पाय’
हे वाचताना कविता चक्क आभाळाला भिडते.
एकूणच ‘नदी रुसली, नदी हसली’ या पुस्तकातील सर्वच बालकविता मुलांचे रंजन करता करता आनंदाने जगण्याचा मंत्र सहज सांगून जातात. हे सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही की उपदेश नाही. अगदी सहजसोप्या काव्यमय शब्दांत मांडलेले हे मुलांचे मनोगतच आहे असे वाटत राहते. मुलांचे भावजीवनच कवितेत सहजपणे उतरले आहे. म्हणूनच या कविता मुलांच्या राज्यात आनंदाचे कारंजे फुलवतात.
‘नदी रुसली, नदी हसली’
कवी – डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठ – 64, मूल्य – रुपये 120/-





























































