ठसा – कर्नल आर. डी. निकम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन चेणगे

सैनिकी परंपरा असलेल्या मिलिटरी अपशिंगे (जि. सातारा) गावचे सुपुत्र व महाराष्ट्रातील तमाम आजी-माजी सैनिकांचे श्रद्धास्थान कर्नल आर. डी. निकम यांची आज 101 वी जयंती. महाराष्ट्रामध्ये ‘सातारा’ हा एक असा जिल्हा आहे, त्याला जसा इतिहास तसा भूगोलही आहे. शिवछत्रपतींचे घराणे, अजिंक्यतारा, सज्जनगड, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था अशा अनेकविध गोष्टी सातारचे वैभव अधोरेखित करतात. त्याच सातारा जिल्ह्यात सैनिकांचे गाव म्हणून मिलिटरी अपशिंगे प्रसिद्ध आहे. या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे. चार सलग पिढय़ा सैन्यात असलेले कर्नल आर. डी. निकम यांच्या घराण्याने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामध्ये आपला लौकिक दाखवला.

कर्नल रामराव निकम यांनी सेवानिवृत्तीनंतर पत्नीचे सहकार्य घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक खेडय़ात जाऊन तेथील सेवानिवृत्त सैनिकांशी संपर्क साधला व त्यांची संघटना बांधून त्या संघटनेच्या बळावर जगातील पहिली सैनिक सहकारी बँक सुरू केली. संघटनेचे सभासद वाढवून त्यांचे सार्वजनिक प्रश्न सोडविण्यात अभूतपूर्व यश मिळवले. सैनिकांच्या विधवा पत्नींचे रखडलेले निवृत्तीवेतन त्यांना मिळवून देऊन त्यांच्याशी भावाचे नाते निर्माण केले. याच संघटनेच्या बळावर राजधानी नवी दिल्ली येथे उपोषण अभियान करून ‘वन रँक वन पेन्शन’चा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला. आज या देशातील प्रत्येक निवृत्त सैनिक त्याचा लाभ घेत असून अशा प्रकारची आर्थिक समस्या सोडवून ते सैनिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. आपली संघटना व आपली बँक ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न न ठेवता त्यांनी सैनिक व्यासपीठ उभे केले. त्यामुळे देशात आज निवृत्त सैनिक सन्मानाने जगत आहेत. आज सातारा येथे सैनिक शाळा आहे. खेडय़ातील सामान्य कष्टकरी व शेतकऱ्यांची मुले तेथे शिक्षण घेत आहेत. उद्याचे कर्नल आज या शाळेत शिकत आहेत. कर्नल रामराव निकम यांची तिन्ही मुले सैन्यात अधिकारी या नात्याने वावरली. ‘सैनिकांचा देव’ अशी स्वतःची ओळख तयार करून देशात एक सैनिक सैनिकासाठी अलौकिक व कायम लक्षात राहील असे काम करतो. खरं तर शासनाने त्यांना पद्म पुरस्काराने गौरविणे ही काळाची गरज होती. सैन्य सेवेव्यतिरिक्त निवृत्त सैनिकांसाठी केलेले कामकाज हा ग्रंथाचा विषय आहे.