गीताबोध – श्रीकृष्णाची भाषा…

गुरुनाथ तेंडुलकर << [email protected] >>

मागच्या लेखात मी ‘भगवद्गीता म्हणजे काय’ याचा थोडक्यात उल्लेख केला होता. ‘कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याआधी नातेवाईक, आप्तेष्ट आणि गुरुजनांना आपल्याविरुद्ध युद्धास उभे ठाकलेले पाहून संभ्रमित झालेल्या अर्जुनाने विचारलेल्या शंका आणि त्यावर भगवान श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरं म्हणजे भगवद्गीता.

यावर अनेक जणांनी प्रश्न विचारले की, रणांगणाच्या मैदानात सातशे श्लोकांचा एवढा मोठा उपदेश करायला श्रीकृष्णाला वेळ होता का? कधी सांगितले त्याने ते सातशे श्लोक? कधी झाला हा कृष्ण-अर्जुनाचा संवाद? कसं शक्य आहे हे?  तर आज आपण श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाची नेमकी भाषा कोणती याचा थोडा ऊहापोह करू या.

भाषा हे मुख्यत्वे विचारांचं आदानप्रदान करण्याचं माध्यम आहे. आपण सर्वसामान्य माणसं आपल्या मनातील विचार दुसऱयाला सांगण्यासाठी जी भाषा वापरतो ती प्रामुख्याने शब्दांची असते, पण शब्दांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक भाषा असतात. नजरेची भाषा, स्पर्शाची भाषा, हावभावांची भाषा, कृतीतून प्रकट होणारी भाषा, चेहऱयावरच्या रेषांतून जाणवणारी भाषा, आवाजातील चढ-उतारातून प्रकट होणारी भाषा… असे भाषेचे विविध प्रकार असतात.

अगदी मौनाचीदेखील एक भाषा असतेच. पण कुरुक्षेत्रावर विचारांनी भरकटलेला अर्जुन आणि त्याच्या केवळ रथाचंच नव्हे, तर संपूर्ण जीवनाचं सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद हा एका अगम्य भाषेत झाला. ती अगम्य भाषा आपल्याला अवगत नसली तरी तिचं अस्तित्व अमान्य करता येणार नाही.

उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडच्या काळात आपण सर्वजण कॉम्प्युटर वापरतो. त्या कॉम्प्युटरकडून अनेक कामं करून घेतो. पत्र लिहितो, गणितं सोडवतो, हिशेब करतो, चित्रं काढतो… हे सगळं करण्यासाठी वर्ड, एक्सेल,

पॉवर पॉइंटसारखी अनेक अॅप्लिकेशन वापरतो, पण कॉम्प्युटरला आज्ञा देणारी जी भाषा असते ती भाषा म्हणजे सॉफ्टवेअर्स… आणि पुन्हा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांतील समन्वयासाठी लागणारी बायनरी लँग्वेज. ही बायनरी लँग्वेज आपल्या नेहमीच्या इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा अन्य कोणत्याही भाषांहून फारच वेगळी असते.

तसंच कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष युद्धाच्या आधी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील झालेला संवाद हा काही क्षणांतच झाला. किंबहुना क्षणाच्याही सूक्ष्म कणाच्या, अगदी निमिषार्धातच पूर्ण झाला. इंग्रजीत ज्याला मापोसेकंद, नॅनोसेकंद म्हणतात तशा प्रकारच्या अत्यल्प काळात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचं निरसन केलं आणि स्वतचे विचार त्याच्या मनात पांमित केले (ब्लू टूथ किंवा वाय-फायच्या माध्यमातून आपण जसा एका मोबाइलमधून दुसऱया मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करतो किंवा कॉम्प्युटरमधला डेटा पेन ड्राईव्हमध्ये घेऊन दुसऱया कॉम्प्युटरमध्ये घालतो तसाच काहीसा तो प्रकार होता).

पुढे वेदव्यास मुनींनी कुरुकुलाचा इतिहास म्हणजेच महाभारताची रचना करताना त्यातील भीष्मपर्वातील तेवीस ते चाळीस या अठरा अध्यायांत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात रणांगणावर झालेल्या त्या अगम्य भाषेतील संवादाला विस्ताराने शब्दरूप दिलं. व्यासांनी शब्दरूप दिलं म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तो दैवी संवाद काय झाला असेल त्याची किंचितशी झलक समजली.

यासंबंधी श्री ज्ञानेश्वर महाराज ‘ज्ञानेश्वरी’च्या अठराव्या अध्यायात श्री व्यासमुनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात…

आणि कृष्णार्जुनि मोकळी । गोठी चाळविली जै निराळी ।

ते श्रीव्यासे केली । करतळी घेवो ये ऐसी ।।

भावार्थ : कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो मनमोकळा वार्तालाप झाला ( गोठी चाळविली ) तो काही वेगळ्याच भाषेत होता (जै निराळी). तो संवाद श्री व्यासांनी आपल्याला अगदी तळहातावर घेता येईल अशा स्वरूपात मांडला ( करतळी घवो ये ऐसी ).

बाळकाते वोरसे । माय जै जेववू बैसे ।

ते तया ठाकती । तैसे ग्रासू करी ।।

भावार्थ : आई जेव्हा बालकाला अन्नाचे घास भरवते त्या वेळी ती त्याला झेपतील (तया ठाकती तैसे) तेवढय़ाच आकाराचे घास करते ( ग्रासू करी ).

म्हणोनि श्रीव्यासांचा थोरू । विश्वासी झाला उपकारु ।

श्रीकृष्ण उक्तिचा । ग्रंथाकारु केला ।।

भावार्थ : अशा प्रकारे श्रीकृष्णाने सांगितलेल्या वचनांना ग्रंथरूप दिलं (उक्तीचा ग्रंथाकारू केला) हा श्रीव्यासांचा विश्वावर मोठा उपकारच झाला आहे.

असो, तर एकंदरीत काय, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी वापरलेली भाषा ही अगम्य आणि दैवी भाषा होती. सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडची होती. त्या शब्दांच्या पलीकडच्या भाषेत झालेल्या संवादाला शब्दरूप देऊन श्रीव्यास महर्षींनी सातशे श्लोकांत सूत्रबद्ध करून आपल्या समोर ठेवलं. ते सातशे श्लोक म्हणजे भगवद्गीता.

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।