काव्यधारा – नास्ति मातृसमा छाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गुरुनाथ तेंडुलकर

आईचा पदर ही जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि उबदार जागा असते, पण आईची कूस किंवा तिच्या पदरापेक्षाही अधिक सुरक्षित जागा म्हणजे आईच्या पोटातला उबदार अंधार…

‘तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा कालखंड कोणता होता?’ या प्रश्नाचे उत्तर देताना बहुतेक लोक ‘बालपणीचा’ असेच उत्तर देतील आणि ते खरंही आहे.

मूल लहान असताना त्याला कोणत्याही प्रापंचिक जबाबदाऱ्या नसतात. कोणत्याही प्रकारच्या चिंता, विवंचना नसतात. शालेय जीवनापासूनच सुरू होणाऱ्या सत्ता स्पर्धेत उतरून जिंकण्याची काळजी नसते. कोणत्याही प्रकारचे व्याप-ताप नसतात. भीती नसते.

आईवडिलांचे कृपाछत्र डोक्यावर असते, मुख्यत्वे करून आईचे.
कविश्रेष्ठ विंदा करंदीकर त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे…

‘पुन्हा वाटते तसेच इवले बाळ
होऊनी कुशीत यावे,
अन् पदराच्या अभयाखाली
डोळय़ांनी हे पंख मिटावे’

आईच्या उबदार कुशीत शिरले की, बाळाला कसलीच चिंता उरत नाही. आईचा पदर ही जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि उबदार जागा असते, यावर कुणाचेही दुमत होणार नाही, पण काही अभागी बालकांना विशेष करून बालिकांना आईच्या कुशीत शिरण्याचे किंवा तिच्या पदराआड दडण्याचेदेखील भाग्य लाभत नाही. मुलगी जन्माला आली म्हणून तिला जन्मतःच मारून टाकण्याच्या घटना अगदी एकविसाव्या शतकात आजही घडतात. काही ठिकाणी तर मुलगी जन्माला येताच खडय़ात टाकून त्यावर माती लोटली जाते. तर काही ठिकाणी तिला पाण्यात बुडवून मारली जाते.

एकंदरीत काय तर केवळ मुलगी म्हणून जन्माला आली या एकमेव अक्षम्य अपराधाची शिक्षा म्हणजे मृत्युदंड. अशा वेळी तिची जन्मदात्री आईदेखील याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. तिने आवाज उठवला तर तिची घराबाहेर हकालपट्टी होण्याची किंवा पुनः पुन्हा मुलीला जन्म दिला म्हणून तिलादेखील मारून टाकण्याची शक्यता असते. अशा दारुण अवस्थेत ती माऊली बिचारी हुंदका ओठातच दाबून मुकाट बसून राहाते. आतल्या आत रडते आणि पराभूत अवस्थेत स्वतःच्या नशिबाला दोष देत पुन्हा दुसरा जीव जन्माला घालण्याच्या तयारीला लागते.

या सगळय़ाचा साकल्याने विचार करताना कवयित्री जयश्री संगीतराव यांना एक कविता स्फुरली. त्यांना वाटते की, आईची कूस किंवा तिच्या पदरापेक्षाही अधिक सुरक्षित जागा म्हणजे आईच्या पोटातला उबदार अंधार.

तसे पाहिले तर ही फार मोठी कविता नाही, पण या कवितेचे वैशिष्टय़ म्हणजे अगदी कमी शब्दात ही कविता बराच मोठा आशय मांडते.

आईच्या गर्भातील बालक हे सर्वाधिक सुरक्षित असते, कारण त्याच्या सगळय़ा जबाबदाऱया आईने स्वीकारलेल्या असतात.
गर्भातल्या अर्भकाला अगदी श्वास घेण्याचेदेखील कष्ट करावे लागत नाहीत की, अन्नपाणी गिळण्यासाठी तोंड उघडावे लागत नाही. सगळे काही आईच्या नाळेमार्फत त्या अर्भकाला आयते मिळत असते, पण पोटातल्या बाळाची काळजी वाहताना आईला मात्र अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. चालताना, बसताना, उठताना एवढेच काय तर अगदी झोपतानाही तिच्या मनात एकच विचार असतो, तो म्हणजे पोटातल्या बाळाचा. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये.

हे मूल माझे आहे. या एकाच भावनेने त्या बाळाला जगात आणण्यासाठी ती जे जे काही सहन करते, त्याची कल्पना करणेदेखील पुरुषांना शक्य नसते. तो सृजनाचा जिवंत जिताजागता अनुभव असतो. त्या अनुभवाचे वर्णन शब्दात करणे अशक्यच आहे. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत आईला देवाच्या बरोबरीने स्थान दिले गेले आहे. सहज आठवला म्हणून एक संस्कृत श्लोक सांगतो.

नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमा त्राणं, नास्ति मातृसमा प्रपा।।

अर्थ : ः आईसारखी दुसरी सावली नाही. आईसारखे दुसरे आश्रयस्थान नाही. आईसारखी दुसरी सुरक्षित जागा नाही आणि आईसारखा दुसरा जीवनदाता नाही.

कवी मोरोपंतदेखील त्यांच्या एका केकावलीत म्हणतात की, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’
आईचे ऋण कदापिही फेडता येणार नाही. आईने आपल्याला जन्म देताना आणि जन्मानंतर वाढवताना सहन केलेल्या कष्टांची जाणीव प्रत्येकाने ठेवायलाच हवी. तिला कोणत्याही प्रकारचे क्लेश होणार नाहीत असेच वागायला हवे.
म्हणूनच तर कवियत्री जयश्री संगीतराव या कवितेच्या शेवटच्या दोन ओळीत लिहितात…

तुझ्या थकत्या काळात मात्र,
तुझी आई होऊ दे
गर्भात भोगलेल्या स्वर्गसुखाची,
जाणीव सतत राहू दे

ही जाणीव प्रत्येकाने मनात कायम कोरून ठेवावी एवढीच अपेक्षा.

‘क्षण सौख्याचे’

‘तुझ्या गर्भातला प्रत्येक क्षण,
स्वर्गसुखाचा भास होता
सार्वभौम राजाच जणू,
ना कुणाचा वास होता
रक्त तुझेच तुझाच धास,
सगळंच कसं सुकर होतं
तुझ्याच अन्नावर माझंही,
सहज पोषण होत होतं
पोटात तुझ्या फिरताना,
असेलही लाथ लागलेली
कधीतरी अवघडण्याची,
असेल जाणीव झालेली
तरीही तू माझ्या लीला,
उदरात निमूट सहन केल्या
कमी की काय म्हणून,
जन्मतानाही वेदना दिल्या
तुझ्या थकत्या काळात मात्र,
तुझी आई होऊ दे
गर्भात भोगलेल्या स्वर्गसुखाची,
जाणीव सतत राहू दे
जाणीव सतत राहू दे…
कवितासंग्रह ‘अलगुज’

कवयित्री : जयश्री संगीतराव