लेख – साद माणुसकीची, समग्र ग्रामविकासाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हरिश बुटले

आज ज्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने संपूर्ण देशाने एकजूट दाखवत जनता कर्फ्यु यशस्वी पार पाडला, ‘लॉक डाऊन’ला मनापासून साथ दिली तसाच ग्रामविकास मनावर घेतला आणि गावांचे सक्षमीकरण करण्याचे धाडस दाखवले तर आपण भविष्यात आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या समस्यांना सक्षमपणे तोंड देवू शकू. कोरोनाच्या सद्यपरिस्थितीत शक्यतो गावात जास्त जण एकत्र जमू नये. पण कोरोनाच्या या संकटाचा संधी म्हणून उपयोग करून ग्रामीण विकासाचा संकल्प शहरांतील सर्वच ग्रामवासींनी केला पाहिजे. सरकारच्या, प्रशासनाच्या बरोबरीने आपापल्या गावांचा विकास करूया.

आपण सर्व आज जीवनाच्या अशा वळणावर आहोत की उद्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याची कल्पना आपण करू शकत नाही. इतर देशांत विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या जे काही घडत आहे त्यावरून काळजाचे ठोके चुकावे अशी स्थिती आहे. मात्र कोरोनाच्या या महाभयंकर विळख्यातून सहीसलामत सुटल्यावर आपणास प्रतिबंधात्मक (झ्rानहूग्न) अशी जर सर्वात महत्वाची कोणती गोष्ट करावी लागेल ती आहे ‘समग्र ग्रामविकास’. ज्यामुळे महानगरे आणि शहरांचा बोजा न वाढू देता चंगळवादी, संस्कृतीला आवर घालत, पर्यावरणाला हानी न पोहोचवता आपण जगू शकू. तसेच अचानक उद्भवणाऱया अशा संकटांनाही निमंत्रण देणे बंद करू. आपल्या आयुष्यात प्रथमच संपूर्ण हिंदुस्थान आपापल्या कुटुंबियांसोबत घरात थांबून अनेक धडे गिरवत आहे.

महानगरांमध्ये स्थायिक झालेले बहुतांश लोक हे ठामीण भागांतून आलेले असतात. अनेकजण खेडय़ांतून शिक्षण,नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने महानगरात आलेले आहेत. गावखेडय़ांतून महानगरात येऊन ते समृद्ध झाले, मात्र त्यांनी आपल्या समृद्धीचा वापर आपल्या मूळ गावासाठी क्वचितच केला. अशा अनेकांनी आपल्या मूळ गावी सध्या कोरोनाच्या भीतीमुळै धाव घेतली आहे. कारण गावं अजूनही या प्रादुर्भावापासून तसे दूर आहेत आणि सहवासात आल्याशिवाय हा संसर्ग होऊ शकणार नसल्याने गावाकडे तुलनेने धोका कमी आहे.

शहरात स्थायिक झालेला आणि गावाविषयी प्रेम असणारा माणूस गावाकडे भरणाऱया उरूस, जत्रा, लग्न, जन्म आणि मयतासाठी प्रसंगानुरूप येत असतो. कारण त्याची नाळ त्या गावाशी जोडलेली असते. एरवी तो फारतर गावातील देवळासाठी किंवा धार्मिक कामासाठी थोडंफार योगदान देत असतो. मात्र गावाच्या शेती, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, कौशल्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक समस्या, जनजागरणासाठी फारसा उत्सुक नसतो. एखाददुसरा पुढे येत असला तरी गावातील बारा भानगडींमुळे त्याला त्यात फारसा रस उरत नाही.

स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे तरी खेडी समृद्ध होण्याऐवजी ती ओस पडली आहे आणि शहरं अतिप्रचंड फुगल्यामुळे बकाल झाली आहेत. गावात राहायला आता म्हातारी माणसं आहेत आणि जे तरुण आहेत त्यांच्या हाताला कौशल्य नाही आणि पर्यायाने काम नाही. थोडेबहुत जे शिकलेले आहेत त्यांना शेती करायला कमीपणा वाटतो. त्यांचा रिकामा वेळ मोबाईल, इंटरनेटचा दीड जीबी डाटा संपवण्यात वाया जात आहे. अशा स्थितीत गावाकडील पायाभूत सुविधा आणि उपजीविकेची साधनं वाढली नाहीत तर शहारांवरचा ताण आणखी वाढेल आणि आणखी कोणत्यातरी नव्या मानवनिर्मित आपत्तीला सामोरे जावे लागेल.

चांगली उपजीविका आणि जीवनमानाचा दर्जा शहरातच मिळणार आहे असे चुकीचे गृहीतक झाल्याने व त्याला पोषक असे सरकारी धोरण असल्याने तरुणांचा शहराकडे लोंढा वाढतो आहे. निवृत्तीनंतर अनिवासीं ग्रामवासींना आपल्या गावाची ओढ असते, त्यांना उर्वरित आयुष्य गावी जाऊन राहवेसे वाटते, मात्र सोयीसुविधांच्या अभावी तसेच मूलं शहरात किंवा परदेशात राहात असल्याने ते आपल्या गावी जाण्याऐवजी शहरातच राहणे पसंत करतात. ज्ये…,निवृत्ती घेतलेल्या अनिवासी ग्रामवासी लोकांना आपापल्या गावात परतण्यासाठी (रिव्हर्स मायग्रेशन) गावाकडील सोयीसुविधांकडे लक्ष देणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. अनिवासींचा शहरांवरचा हा ताण कमी झाला तरच उपजीविकेसाठी गावातील तरुणांना शहराची वाट धरता येईल. मात्र सध्या केवळ ‘वन वे’ ट्रफिक झाले आहे. वाढते नागरीकरण हेच भविष्यात वाढून ठेवलेल्या सर्व समस्यांचे मूळ आहे आणि म्हणूनच समग्र ग्रामविकास होणे ही काळाची गरज आहे.

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरकार योजना आखत नाही असे नाही, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. राजकारणी तसेच नोकरशाहीच्या वरदहस्ताने आणि जनजागरणाच्या अभावी अनेक योजना गावांपर्यंत पोहोचतच नाहीत., मध्यस्थच कागदोपत्री लाभ घेतात हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र अशाही स्थितीत काही ठिकाणी चांगले काम होत आहे. तिथे त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. मात्र त्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. आमच्या ‘साद माणुसकीची फाऊंडेशन’तर्फे मागील वर्षी चंद्रपूर जिह्यातील कोठारी या माझ्या मूळ गावापासून ‘सादग्राम’ निर्मिती प्रशिक्षणाला सुरुवात करून काही गावात काम केले. तेथील चांगल्या-वाईट अनुभवांच्या आधारे परभणी जिह्यातील 9 तालुक्यातील 9 गावात आम्ही प्रयोग सुरू केला आहे. अल्पावधीतच त्याला ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या भक्कम पाठिंब्याने खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अशा स्थितीत ग्रामविकासाच्या संबंधित सर्व घटकांना एकत्रित साद घालून त्यांच्या प्रतिसादातून गावांचा विकास साधण्याची प्रकिया म्हणजे ”सादग्राम’ निर्मिती. अर्थातच ही प्रक्रिया जेवढी समजायला सोपी तेवढीच तिची अंमलबजावणी कठीण आहे. म्हणूनच एवढे वर्ष ग्रामविकास रखडलेला आहे. मात्र संबंधित सर्व घटकांनी एकत्रित विचार करून ठरविले तर ग्रामविकास अगदी सहज होऊ शकतो. सादग्राम निर्मिती प्रक्रियेतून आम्ही तेच मांडतो आहोत. समग्र आणि शाश्वत ग्रामविकास झाला नाही तर नागरी आणि ग्रामीण जनतेच्या मुळावर येईल.

आज ज्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने संपूर्ण देशाने एकजूट दाखवत जनता कर्फ्यु यशस्वी पार पाडला, ‘लॉक डाऊन’ला मनापासून साथ दिली तसाच ग्रामविकास मनावर घेतला आणि गावांचे सक्षमीकरण करण्याचे धाडस दाखवले तर आपण भविष्यात आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या समस्यांना सक्षमपणे तोंड देवू शकू. कोरोनाच्या सद्यपरिस्थितीत शक्यतो गावात जास्त जण एकत्र जमू नये. महानगरातून आलेल्या आपल्या प्रियजनांपासून साधारणपणे पुढील काही दिवस सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्याशी नित्याचे व्यवहार करावे. पण कोरोनाच्या या संकटाचा संधी म्हणून उपयोग करून ग्रामीण विकासाचा संकल्प शहरांतील सर्वच ग्रामवासींनी केला पाहिजे. सरकारच्या, प्रशासनाच्या बरोबरीने आपापल्या गावांचा विकास करूया.

ज्यांना आपल्या गावाला सादग्रामच्या वाटेवर न्यायचे आहे त्यांनी संपर्क करावा. त्या-त्या जिह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान एक गाव या प्रक्रियेत सामील झाले की, त्या जिह्याचा सादग्राम निर्मितीसाठी विचार करता येईल. सादग्राम निर्मिती म्हणजे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळाचे सदस्य, अनिवासी ग्रामवासी, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, विषयतज्ञ, मार्गदर्शक, हितचिंतक, दाते यांना एकत्रित साद घालून त्यांच्या प्रतिसादातून सामाजिक दायित्व निधी (ण्एR), देणग्या, लोकवर्गणी गोळा करणे तसेच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने समर्पक जागरण करून व्यापक लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर आधारित, ‘एक गाव बारा उपक्रम’ राबवणे, गावाची सर्वांगीण वाटचाल करणे. प्रशासनाच्या माध्यमातून सर्व घटकांच्या सहयोग आणि सहकार्याने सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

अशारीतीने प्रत्येक समृद्ध माणसाने आपले मूळ गाव आणि ज्यांची मूळ खेडी नाहीत अशा सर्वांनी आपल्या आवडीचे एखादे खेडे निवडून त्यासाठी योगदान द्यावे.तरच आपण समग्र ग्रामविकास साधू शकू आणि भविष्यात येणाया अनेक संकटांपासून स्वत:चा आणि येणाऱया पिढय़ांचा बचाव करू शकू.

(लेखक ‘साद माणुसकीची फाउंडेशन’चे संस्थापक-संचालक आहेत. )