प्लेलिस्ट- लयकारीतील सतार

>>हर्षवर्धन दातार

गेल्या भागात आपण सतार या तारवाद्याचा उगम आणि हिंदुस्थानी शास्त्राrय तसेच सुगम संगीतातली त्याची व्याप्ती व स्थान याबाबत आढावा घेतला. या भागात नामवंत संगीतकारांनी हिंदी चित्रपटांत सतारीचा उपयोग किती वेगवेगळ्या प्रकारे केला आहे हे जाणून घेऊ या.

 

रागांच्या स्वराप्रमाणे तारा लावल्या जातात.  प्रत्येक वादकाच्या संगीत प्रकृती, टोनल दर्जा, आस (rाsदहहम) किंवा मिंड काढण्याची क्षमता, सरगमचे सूर आणि वाजवण्याच्या शैलीप्रमाणे त्यात तारांचं प्रमाण असतं. इतकंच नव्हे, तर बीटल्स प्रसिद्ध जॉर्ज हॅरिसननी `नॉर्वेजन वूड’सारख्या (1965) आपल्या अनेक रचनांमध्ये सतारचा उपयोग केला. काही कलाकारांनी सतारीच्या मूळ टोन कायम ठेवून इलेक्ट्रिक सतार ही सुधारित आवृत्तीसुद्धा आणली. बघूया नामवंत संगीतकारांनी हिंदी चित्रपटांत सतारीचा उपयोग किती वेगवेगळ्या प्रकारे केला आहे.

`सावन की घटा’मध्ये (1966)  कलंदर, पण गुणी संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर यांनी `आज कोई प्यार से’ या एकाच गाण्यात सतार, संतूर आणि सारंगी या तीन तारवाद्यांचा वापर करून गाण्यात वेगळीच रंगत आणली. रूपक तालावर आधारित मुमताज आणि सख्यांवर चित्रित हे गाणे नय्यर विशेष आहे. मोठी स्टारकास्ट असलेल्या डिझास्टर चित्रपट `द बर्निंग ट्रेन’मध्ये (1980) आर.डी. बर्मनने पाश्चात्त्य आणि हिंदुस्थानी शास्त्राrय नृत्यावर आधारित एक फ्यूजन स्टेज शो गाणे को. `तेरी नजर है मुझ पे’… परवीन बाबी आणि हेमा मालिनीवर चित्रित या गाण्यात एक बाजूला ड्रम्स आणि गिटार, तर दुसऱया बाजूला सतार आणि तबला यांची आगळीवेगळी जुगलबंदी ऐकण्यासारखी आणि बघण्यासारखी आहे. मदन मोहनने `हसते जख्म’मध्ये (1973)  `आज सोचा तो आंसू भर आये’मध्ये गिटार आणि सतारीतून दर्दभरा परिणाम साधला. रईस खान यांच्या `दैवी’ सतार वादनाने गाण्याला अथांग उंचीवर नेऊन ठेवले आहे. `शर्मिली’मध्ये (1971) असाच प्रयोग सचिन देव बर्मनने केला लताने गायलेल्या `मेघा छाये आधी रात’ या गाण्यात. नायिका राखीच्या दुहेरी भूमिकाला साजेशी या गाण्यात पाश्चात्त्य तसेच हिंदुस्थानी अशी दुहेरी संगीत रचना आहे. सतारीचे सूर राखीची मनोवस्था दर्शवतात. `नैन बहे रे गंगा मोरे, फिर भी मन है प्यासा’. याच चित्रपटात `खिलते है गुल यहाँ’ या लताने गायलेल्या टँडम गाण्यातसुद्धा सतारचे मधुर पीसेस आहेत. राजेश रोशनने आपल्या अनेक संगीत रचनांमध्ये अशा प्रकारचे फ्यूजन वापरले आहे. `खुद्दार’मध्ये (1982)  `डिस्को 82′ या त्या काळात लोकप्रिय झालेल्या पाश्चात्त्य नृत्य-गाण्याच्या प्रकारात इंटरल्यूडमध्ये सतारीच्या सुरांचे छोटे छोटे तुकडे आणले आहेत. `याराना’मधा (1981) `छू कर मेरे मन को’ या रवींद्र संगीतावर आधारित गाण्यात सतार सुरांची गुंफण पेरली आहे.

साधीसोपी संगीत रचना आणि जनमानसाला रुचणारी गाणी देणाऱया कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या दोन्ही संगीतकार जोडींनी आपल्या संगीतात हिंदुस्थानी वाद्यांचा सढळ वापर केला. या दोघांच्या `आन मिलो सजना’ चित्रपटाच्या शीर्षक गीताची सुरुवातच सतारीच्या सुरांनी होते. `बदलते रिश्ते’ (1978) यात पुरिया धनाश्री रागावर आधारित `मेरी सांसो को जे मेहेका रही है’ हे लता आणि महेंद्र कपूर यांचं सदाबहार शास्त्राrय बाजाचं गाणं. `पहेले प्यार की खुशबू’… संपूर्ण गाण्यात सतार पहिल्या प्रेमाची बहार दरवळते. `सरस्वतीचंद्र’ (1968) या गुजराती कथेवर आणि सरंजामशाही व्यवस्थेवर आधारित चित्रपटात `चंदन सा बदन’ या लताबाईंनी गायलेल्या गाण्यात प्रत्येक अंतऱयाच्या आधी वाजलेली सतार नूतनच्या प्रेम आराधनेला पूरक साज प्रदान करते. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.

सत्तरच्या दशकात आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गीयांचे प्रश्न, स्वप्न यावर भाष्य केले दिग्दर्शक बासू चॅटर्जींनी. `रजनीगंधा’मध्ये (1974)   `ये दिन क्या आये’ आणि `रजनीगंधा फूल तुम्हारे’ या गाण्यातून अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांचे प्रेम फुलत होते. त्याला जोड होती सतारीच्या सप्तसुरांची. `घर’ (1978) चित्रपटात आरडीने (पंचम)  एकापेक्षा एक सुंदर गाणी दिली आहेत. `आज कल पांव जमी पर नही पडते मेरे’ या गाण्यात रेखा-विनोद मेहराच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे आणि तिचा इशारा अक्षरश हवेत तरंगण्यासारखा आहे. तो नेमका व्यक्त झाला आहे सतारीच्या सुरांतून. `बंटी और बबली’मध्ये (2005)  `चूप चूप के चूप चूप के चोरी से चोरी’ या गाण्यात सतार काही वेगळीच वातावरण निर्मिती करते. त्याच पद्धतीची सतार वाजली आहे शेक्सपियरच्या `आाथेल्लो’वर बेतलेल्या `ओंकारा’मधल्या (2006) `नैनो की मत सुनियो’ या गाण्यात. `क्वीन’ (2013) या चित्रपटात `किनारे’ गाण्यात सतार आणि ट्रम्पेटची जुगलबंदी आहे. संगीत आजचे लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी याचे. सतार या कर्णप्रिय तारवाद्याचे हिंदुस्थानी संगीतातील स्थान आणि त्याचे सर्वसमावेशक प्रमाण आपल्याला रिचर्ड अॅटेनबरो यांच्या जगविख्यात `गांधी’ (1982) चित्रपटात दिसते. महात्मा गांधी देशाचा आत्मा शोधण्याकरिता, देश जाणून घेण्याकरिता रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून हिंदुस्थान भ्रमण करतात तो प्रसंग रविशंकर यांच्या सतार वादनामुळे हृद्य होतो, प्रेक्षकांच्या मनावर कोरला जातो. विशेष म्हणजे सतारीची लय ही आगगाडीच्या लयींशी जुगलबंदी करते. गायकीच्या अंगाने आणि लयकारीने वाजवणे हे सतार या तारवाद्याचे वैशिष्ट्य आणि सर्व नामांकित वादकांनी त्याला योग्य न्याय दिला. जाणते आणि प्रयोगशील संगीतकार एखाद्या वाद्याचा उपयोग प्रसंगाला साजेसा आणि नेमका प्रभाव कसा पडेल, या विचारातून करतात. कधी सोलो, तर कधी इतर वाद्यांची साथ घेऊनसुद्धा!

[email protected]

(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)