अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यातील सुरक्षा आव्हाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

आपल्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2022 ला 75 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने देशभर स्वर्णिम जयंती हा उत्सव साजरा केला जात आहे. याशिवाय 16 डिसेंबर 2021 ला पाकिस्तानवरती सर्वात मोठा विजय मिळवल्याचा ‘विजय दिवस’ पण साजरा केला. यानिमित्ताने देशाच्या समोर सुरक्षेची आव्हाने याआधी कशी होती, सध्या कशा प्रकारची आहेत आणि त्याला सामोरे जाण्याकरिता देशाच्या सुरक्षा दलांनी आणि देशभक्त नागरिकांनी काय करावे याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.

हिंदुस्थान 1947 साली स्वतंत्र झाला आणि पुढची 24 वर्षं म्हणजे 1971 पर्यंत आपण चार पारंपरिक युध्दे लढलो. 1947 चे पाकिस्तानशी युध्द एक वर्ष चालले. दुसरे पारंपरिक युध्द चार आठवडे, चीनशी 1962 साली झाले. तिसरे युद्ध 1965 साली चार आठवडे पाकिस्तानशी झाले. शेवटचे पारंपरिक युद्ध तीन आठवडे 1971 साली झाले. या पारंपरिक युद्धामध्ये हिंदुस्थानचे सैन्य हे चीन, पाकिस्तानच्या सैन्याशी लढत होते. या युद्धांशी देशातील जनतेचा फारसा संबंध नव्हता. पारंपरिक युद्धामध्ये सैन्याने पाकिस्तानचा नेहमीच पराभव केला.

1971चे युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळले की, पारंपरिक युद्धात हिंदुस्थानशी लढून जिंकणे शक्य नाही. म्हणून त्यांनी एक नवीन युद्ध नंतर सुरू केले. ज्याचे नाव होते ‘ऑपरेशन काराकोरम.’ काराकोरम युद्धाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खलिस्तानी दहशतवाद, काराकोरम दोन म्हणजे कश्मीरमधे छुपे युध्द किंवा दहशतवाद आणि काराकोरम तीन म्हणजे देशाच्या इतर भागांत दहशतवाद. हिंदुस्थानी सैन्याने ऑपरेशन काराकोरममध्ये सुद्धा पाकिस्तानचा जवळजवळ पराभव केलेला आहे. सध्या दहशतवाद हा फक्त कश्मीर खोऱयात चालू आहे. खलिस्तानी दहशतवादाचे पंबरडे मोडले गेले आहे. मात्र त्यापेक्षा भयानक नाकाx टेररिझम पंजाब आणि सीमावर्ती भागात सुरू आहे. आज पंजाब आणि सीमावर्ती भागातील जवळपास 50 टक्के युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत. या युवकांना जर वाचवायचे असेल तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सीमा सील कराव्या लागतील. राजकीय पक्ष, पोलीस, सामाजिक संस्था आणि समाज यांना एकत्रित लढावे लागेल.

कश्मीरमध्ये दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले आहे. लढाखमध्ये ,जम्मू, उधमपूरमध्ये दहशतवाद नाही. परंतु कश्मीरच्या खोऱयामध्ये आजही दोनशे दहशतवादी आहेत. हिंदुस्थानी सैन्य अवीरत ऑपरेशन्स लाँच करून त्यांना मारत असते. मात्र सध्या अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याच्या वापसीमुळे तालिबान सत्तेमध्ये आले आहे. तालिबानला पाकिस्तान, चीन मदत करत आहे. तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने हिंदुस्थानात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून दहशतवादाच्या लढाईकरिता हिंदुस्थानी सैन्याला अजून रक्त सांडण्याकरिता तयार राहावे लागेल.

2014 नंतर नवीन युद्ध सुरू झाले ज्याला अनरिस्टिक्टेड वॉर- हायब्रीड वॉर किंवा नियम नसलेले युध्द असे म्हटले जाते. या युध्दाद्वारे चीन वेगवेगळ्या पध्दतीने हिंदुस्थानची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. व्यापार युध्द, मानसिक युध्द, प्रोपोगंडा वॉर, सायबर युध्द, सोशल मीडियात घुसखोरी आणि अनेक पैलू. ‘हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, जे पारंपरिक युद्ध, राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध, मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे.

चीनने हिंदुस्थानात केलेली आर्थिक घुसखोरी, हिंदुस्थानशी चाललेले आर्थिक युध्द किंवा व्यापार युध्द हा एक महत्त्वाचा आयाम आहे. आर्थिक युध्द लढण्याकरिता आपण आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या कार्यक्रमाने चीनची आपल्या आर्थिक व्यवस्थेमधे झालेली घुसखोरी कमी करत आहोत. मेक इन इंडियाला महत्त्व देऊन चीनमधून येणाऱया गोष्टी हिंदुस्थानात बनवत आहोत. मात्र ही लढाई अनेक वर्षे चालणार आहे, ज्याकरता हिंदुस्थानी उद्योग क्षेत्राला जागतिक दर्जाचे बनण्यासाठी मेहनत करावी लागेल.

मानसिक युध्द, प्रपोगंडा वॉर, दुष्प्रचार युध्दाकरिता चीनने हिंदुस्थानात अनेकांना विकत घेतले आहे. त्यांचे हस्तक हिंदुस्थानच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर चीनच्या बाजूने प्रचार करतात. हे युध्द, सामान्य माणसाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहे. हे युध्द कसे जिंकायचे? त्यासाठी प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामधे देशभक्ती, देशप्रेमाची भावना जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी चीनच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये. प्रत्येक हिंदुस्थानीने आपल्या देशाचे कान आणि डोळे बनलं पाहिजे. हिंदुस्थानचे शत्रू कुठलाही दुष्प्रचार करत असतील, मानसिक युध्द करीत असतील अशांना शोधून त्यांची माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे. ज्यामुळे हे युध्द जिंकण्यात मदत मिळेल.

चीन आपल्यासोबत सायबर युध्द लढत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे मुंबईतील इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती झालेला हल्ला. सायबर युध्द जिंकण्याकरिता आपल्याला देशाची सायबर यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल आणि हे काम सतत सुरू राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या काँप्युटरमधील अँटी व्हायरस अपडेट करत असतो त्याच प्रमाणे सायबर वॉरपासून वाचण्याकरिता आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे.

चीनने आपल्या सोशल मीडियात घुसखोरी केली आहे, पण आपण मात्र चीनच्या सोशल मीडियात घुसखोरी करू शकत नाही. कारण सोशल मीडिया चिनी पंट्रोल आहे. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्या दुष्प्रचाराला कसे प्रत्युत्तर द्यायचे? चिनी सोशल मीडियामध्ये घुसखोरी करण्याकरिता आपण हिंदुस्थानातील आणि तिबेटमधील तिबेटी नागरिकांचा वापर करू शकतो का? याशिवाय चीनच्या बाहेर असलेले अनिवासी चिनी नागरिक यांचा वापर आपण करू शकतो का?

[email protected]