
>> ऋता कळमणकर
किंगफिशर (खंड्या) धीवर हा आकाराने छोटा, अतिशय समृद्ध रंगसंगती लाभलेला सुंदर पक्षी. जगभरात किंगफिशरच्या 86-90 प्रजाती आढळतात. त्यातील 12 आपल्या हिंदुस्थानात आहेत. हिंदुस्थानातील 12 पैकी 11 प्रजाती या उपजीविकेसाठी पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणजे त्याचे खाद्य मासे, कीटक, उभयचर इत्यादी
आकाराने सर्वात मोठा किंगफिशर कोकाबोरा हा ऑस्ट्रेलियात दिसून येतो. हा साधारण 500 ग्रॅम इतका वजनाचा पक्षी. त्याचप्रमाणे सर्वात लहान किंगफिशर हा आफ्रिकन पिग्मी किंगफिशर हा 9-12 ग्रॅम वजनाचा, 10 सेंमी.चा आहे.
सर्वच किंगफिशर हे ‘हायली टेरिटोरिअल’ म्हणजे स्वतःचे घरटे व आजूबाजूचा परिसर यासाठी अतिशय जागरुक असतात. स्वतःचे मासे पकडण्यासाठी बसण्याचे ठिकाण, घर व पिले यांच्या बाबतीत सतत जागरूक असून आपले छोटेसे का होईना राज्य बनवतात. नदीच्या काठावरील जमिनीत डोहाजवळ बांधावर, दरडीत आठ ते दहा इंचाचे बिळ बनवून त्यात मादी 3-6 अंडी घालते. दोघे मिळून काळजी घेतात. यांची पिले तीन-साडेतीन महिन्यांपर्यंत जवळ राहतात. इतर पक्ष्यांप्रमाणे याचेही वेगवेगळे कॉल असतात. काही स्वतःचे राज्य आहे हे इतरांना वॉर्न करण्यासाठी, काही संवादासाठी कम्युनिकेशनसाठी तर काही वेळा मेटिंगसाठी हे वेगवेगळे कॉल देतात.
हा पक्षी एकटं राहणं पसंत करतो. फक्त विणीच्या हंगामात जोडीदाराबरोबर राहतो. सकाळी लवकर आणि सायंकाळी जास्त ऑक्टिव्ह असतो. हा जसा नदीच्या पाणवठय़ाच्या काठावर आढळतो तसाच हा दाट जंगलात, वाळवंटात, कोरडय़ा प्रदेशातही दिसतो. माश्यांप्रमाणेच तो गोगलगाई, खेकडे, सरडे, बेडूक, कोळी, किडे हेही खातो. अतिशय तीक्ष्ण नजरेमुळे पाण्याच्या आतील भागात शिकार शोधून सूर मारून पटकन पकडतो. आकाशात पंख फडफडवीत तीर मारून भक्ष्याचा अचूक वेध घेणारा काळा पांढरा पक्षी म्हणजे ‘पाईड किंगफिशर’ मराठीत ‘कवडय़ा धीवर’, हिमालयात साधारण 800 मीटर उंचीपर्यंत कवडय़ा धीवरचा त्याच्याच रंगाचा, पण आकाराने मोठा व माथ्यावर तुरा मिरवणारा जातभाई म्हणजे ‘क्रीस्टेड किंगफिशर’ (तुरेवाला धीवर) दिसतो. यांचे पाण्यात बसण्याचे खडक ठरलेले असतात.
‘व्हाईट ब्रेस्टेड’ म्हणजे पांढऱया छातीचा किंगफिशर मोठे ब्राऊन डोके, छाती पांढरी आणि सुंदर निळ्या रंगाचा, तर storkbilled हा लालभडक चोचीचा, ‘कॉमन किंगफिशर’ हा अतिशय सुंदर, विटकरी आणि निळ्या रंगाचा असतो. त्याचप्रमाणे आफ्रिकेत नेवाशा लेकजवळ जायंट किंगफिशर पहिला. याचा काळ्या-तपकिरी अंगावर छोटे छोटे पांढरे ठिपके असतात.
आफ्रिकन ‘ग्रे हेडेड किंगफिशर’ हा कोरडय़ा प्रदेशात आढळणारा सरडे, कीटक गटावरील किडे खाणारा करडय़ा रंगाचे डोके असलेला सुंदर पक्षी आहे.
किंगफिशर हा पक्षी अंटार्क्टिका वगळता सर्वत्र दिसतो. यातील काही वातावरणातील बदलामुळे स्थलांतर करतात.





























































