
> ऋता कळमणकर
आपल्या मनामध्ये आदरयुक्त भीतीचं स्थान असणारा डौलदार वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. त्याचा डोळ्यात भरणारा रंग, शरीरावरची अप्रतिम पट्टय़ांची नक्षी, भीती वाटावी अशी शक्ती आणि संमोहित करणारी करारी नजर. वर्णन करावं तेवढं कमी असा हा शक्तिशाली प्राणी. अन्नसाखळीतील सर्वोच स्थानावर असणारा वाघ. अतिशय हातोटीने भक्ष्यावर झडप घालणारा वाघ, भक्ष्य हेरताच लपत छपत आवाज न करता भक्ष्याच्या जवळ पोहोचतो, जमिनीलगत बसून फक्त कानाची हालचाल करून कानोसा घेतो. योग्य अंतरावर आलं की भक्ष्यावर झेप घेतो.
वाघ भारतात सर्वत्र आढळून येतो. म्हणजे पानगळीची जंगले उदा. बांधवगढ, ताडोबा, दलदलीचे प्रदेश अर्थात सुंदरबन, गवताळ कुरणे म्हणजे काझीरंगा उष्ण कटिबंधीय जंगले अर्थात रणथंभोर, सारिस्का. उत्कृष्टपणे पाण्यात पोहू शकणारा. मार्जारकुलातील सर्वात आकाराने मोठा असा प्राणी. पिवळ्या अंगावर काळे तुटक, वेगवेगळ्या लांबी -रुंदीचे पट्टे व शेपटीवर काळी वर्तुळे. तीक्ष्ण दृष्टी आणि त्याहीपेक्षा तीक्ष्ण श्रवणशक्ती. पँथेरा टायग्रीस असं सायंटिफिक नाव धारण करणारा. भारताची शान असणारा रॉयल बेंगॉल टायगर.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साधारण एक लाख वाघ भारतात होते. परंतु राजे-महाराजांचा आणि इंग्रजांचा शिकारीचा खेळ या जनावराच्या जिवावर उठला. वाघ मारून पेंढा भरून दिवाणखान्यात सजवणे हे रुबाबाचे समजले जाऊ लागले. तसेच वाघाची कातडी, नखे यांच्यासाठी त्यांची हत्या होऊ लागली. हळूहळू या देखण्या जनावराची संख्या अतिशय रोडावली. 1970 मध्ये फक्त 1900 वाघ शिल्लक असल्याची माहिती प्रसिद्ध झाली आणि आपल्या सर्वाना खडबडून जाग आली. 1972 साली तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वन्यजीव संरक्षण कायद्याची तरतूद करून देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरवात केली.
सिंह जसा कळपाने राहतो तसा वाघ हा एकटाच राहणं पसंद करतो. नर वाघ साधारण 50 ते 60 किलोमीटरच्या परिसरात स्वतःचे साम्राज्य स्थापन करतो. या नराच्या साम्राज्यात 15 ते 20 किलोमीटरमध्ये एक मादी अशा कधी तीन, कधी दोन वाघिणी वस्ती करून राहतात. नर वाघ नियमित फेरफटका मारून आपल्या जागेची पाहाणी व रखवाली करतो. तसेच वाघिणीही नियमित फेरफटका मारून आपल्या साम्राज्याची पाहणी करतात. जो जिंकेल तो साम्राज्य काबीज करतो.
वाघाची दहशत जंगलात जाणवतेच. तो तिथे हजर असो व नसो त्याची भीती इतर प्राण्यांना नेहमी असते. शांत जंगलात याला दुरून पाहून माकडे कॉल देतात. हरणांना हा दिसला की ते एकमेकांना सावध करतात. सारखे कॉल ऐकू येऊ लागले की भयाण शांतता पसरते. परिसरातील याची दहशत समजते. मग हा दमदार पावले टाकीत येतो. अक्षरशः आपण भारावून जातो. हातातल्या कॅमेऱयाला कंप सुटतो. फोटो काढावेत की पाहावं सुचत नाही. आपण त्याच्या सौंदर्याने संमोहित होतो. वाघाची जगभरात एकच प्रजाती आहे व नऊ उपप्रजाती आहेत.



























































