लेन्स आय : वनसंवर्धनाची जाणीव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता कळमणकर

चिऊताईला आपल्या भावविश्वात महत्त्वाचं स्थान आहे. आपले बालपण रम्य करणारा हा चिमुकला पक्षी याच अस्तित्व धोक्यात आलं आहे. झाडाची कत्तल झाल्यामुळे त्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळेनाशी झाली, तसेच घरटे बांधण्यासाठी गवत काडय़ा-कुडय़ा इत्यादी नसल्यामुळे त्याची अंडी जास्त तापमानामुळे फुटून सुरक्षित राहिनाशी झाली, शेतात मारलेल्या कीटकनाशकांमुळे ते धान्य खाऊन हा पक्षी मरू लागला. सिमेंटच्या जंगलामुळे अधिवास नष्ट झाला व चिमण्याची संख्या झपाटय़ाने कमी झाली. याविषयी जागरुकता पसरावी व चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  घरात, बागेत, अंगणात, बिल्डिंगच्या सार्वजनिक बागेमध्ये मातीची पाण्याची भांडी ठेवणे, खाण्यासाठी धान्याची व्यवस्था करणे, तसेच बाभळीच्या झाडावर घरटे बांधण्याकडे या पक्ष्याचा कल असतो. त्यामुळे इतर झाडांच्या सोबत बाभळीच्या झाडाची आवर्जून लागवड करणे यामुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास मदत होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो

21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. अमेझॉनचे जंगल हे पृथ्वीचं फुप्फुस मानलं जातं. पृथ्वीचा एक तृतीयांश भाग व्यापणारी जंगले ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वोत्तम देणगी आहे. प्रत्येक जंगलाचं सौंदर्य वेगळं आहे.  उष्ण कटिबंधातील अरण्ये कायम हिरवीगार असतात. भरपूर पाऊस, भरपूर उष्णता यामुळे वनस्पतीची जोमाने वाढ होते. तसेच काटेरी झुडपांची अरण्ये यामध्ये वनस्पतीची पाने तकतकीत जाड असतात. पाणी आणि ओलावा टिकवून ठेवतात. बाभूळ, बोर, खजूर, पाम इत्यादी यात येतात. भरती-ओहोटीची म्हणजे मॅन्ग्रोव्हची जंगले त्रिभुज प्रदेशात, नदीच्या मुखाजवळ आढळतात. सुंदरबनचे जंगल हे याचे उदाहरण आहे. हिमालयात उंचावर हिरवेगार वृक्ष आढळतात. त्याचप्रमाणे आफ्रिकेत सवाना रिजन आहे. नजर जाईल तिकडे लांबवर पसरलेली गवताळ कुरणे दिसतात. तैगा फॉरेस्ट कॅनडा, अलास्का येथे आहेत. कोस्टारिका येथील रेनफॉरेस्ट म्हणजे विविधरंगी प्राणी पक्ष्यांचं निवासस्थान आहे. या सर्व प्रकारच्या जंगलांमध्ये विविध प्राणीपक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी, असे शेकडो जीव निवास करतात. आपल्या वाढत्या गरजांमुळे होणारी जंगलतोड या सर्व प्राणी जाती बेघर करते. पर्यावरणाचा तोल ढासळतो.

आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे 60 टक्के भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ 21 टक्के भागातच वने आहेत. ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. वातावरणात होणारे  बदल दरवर्षी आपल्या  लक्षात येत आहेत. ग्लोबल वार्ंमग  हा आता फक्त  वापरण्याचा शब्द राहिला नाही तर गंभीरपणे विचार करण्याची बाब आहे. स्वतः उन्हांत उभे राहून इतरांना सावली तर देतोच, पण त्याचबरोबर किती तरी औषधी, फळे, फुले देतो त्या उपकारकर्त्या वृक्षाचा ऱहास  थांबवणे गरजेचे आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनी नापित होत आहेत. दुष्काळाचे प्रमाण वाढत आहे. हजारो प्राणी बेघर होत आहेत. त्यामुळे जास्तच जास्त झाडाची लागवड करून हे नुकसान रोखले पाहिजे. या गोष्टींचा आठवण आणि जाणीव सतत असली पाहिजे.

 [email protected]