परिपक्व गाभ्याच्या कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जनार्दन शिंदे

लोककवी प्रल्हाद मारुती शिंदे हे आपल्या काळय़ा आईच्या कुशीत घाम गाळताना लोकांची दुःखं, त्यांना होणाऱया यातना, सध्याची परिस्थिती यावर कविता करताना ते त्यात समरस होऊन आपल्या डोळय़ासमोर तो प्रसंग कवितांमधून सादर करतात. त्यांचा मुलगा सचिन हा चौदा-पंधरा वर्षांचा असताना शाळेतून गायब झाला. त्या दुःखाला कुरवाळत न बसता तो आज येईल उद्या येईल या आशेवर जगत तसेच लोककल्याणाच्या शोधात भटकत ‘पाखरू’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. पुणे जिह्यातील पापळवाडी या लहानशा गावचा हा लोककवी कधी एका जागेवर स्थिर राहात नाही. त्यामुळे ‘पाखरू’ हा त्या काव्यसंग्रहाला साजेसेच नाव दिले आहे. ‘मामा’ या नावाने ओळखले जाणारे कवी प्रल्हाद शिंदे हे आपल्या काव्यातून
जनतेला संदेश देतात,
‘सुख दुःखामध्येच असते,
लोणी दुधामध्येच असते।
असे जगा की कधी मेलेच नाही।
असे मरा की कीर्ती अमर राही।।’

शेतात राबणारा हा कवी हल्लीच्या फॅशन संस्कृतीवर, व्यसनावरही लिहितात तसेच आश्रमात लोटणाऱया आईवडिलांचेही दुःख तसेच त्या मुलांवरही कवी लिहितात, पुंडलिक नव्या युगाचे। मातापित्यास पुसेना कोणी। पडवीत मायबाप। बंगल्यात राजाराणी।। कवी प्रल्हाद शिंदे हे ‘भैरवी’ या आपल्या कवितेमधून जीवन कसे अनमोल आहे, हे सांगतात. तसेच प्रपंचामध्ये मती गुंग होऊन मौजमजा करण्याच्या नादात जीवनाकडे दुर्लक्ष कसे होते हे सांगतात.

प्रल्हाद शिंदे यांच्या सर्वच कविता अतिशय बांधीव आणि कसलेल्या कवीसारख्या वाटतात. कवितांमध्ये कुठेही बटबटीतपणा नसल्यामुळे कवितेचा आंतरिक गाभा अधिक परिपक्व वाटतो. कवी नवोदित असला तरी कवितांमधून कुठेही नवखेपणा जाणवत नाही. कवी शिंदे हा सर्वच क्षेत्रातून तावूनसुलाखून गेल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण क्षेत्राचा बाजही या कवितांमधून दिसून येतो.

पाखरू
लेखक – प्रल्हाद मारुती शिंदे
प्रकाशक – पृथ्वीराज प्रकाशन
पृष्ठs – 96 मूल्य 100 रुपये.