मंथन- धोकाग्रस्त प्रजातींची सद्यस्थिती

>> जयंत वडतकर

गेल्या काही दशकांतील प्रजातींचा नामशेष होण्याचा वेग हा खूपच जास्त आहे. यात नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्रजातींची यादी वाढत आहे. या यादीत दिवसेंदिवस नवीन प्रजातींची भर पडत आहे. याबाबत जागरूकता होण्याकfिरता मे महिन्याचा तिसरा पावार हा जगभरात धोकाग्रस्त प्रजाती दिवस म्हणून साजरा केला जातो. नुकतीच आपल्याकडे तनमोर, लेपर्ड कॅट अशा धोकाग्रस्त व दुर्मीळ प्राणीपक्ष्यांची नोंद करण्यात आली. त्यामुळे संरक्षित प्रदेशाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

 

मे महिन्याचा तिसरा पावार हा जगभरात धोकाग्रस्त प्रजाती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच मे महिन्यात विदर्भाच्या तप्त उन्हाळ्यात विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात 7 मे रोजी तनमोर हा अतिशय दुर्मीळ व धोकाग्रस्त श्रेणीतील पक्षी आढळून आला. याचदरम्यान याच ठिकाणी ट्रप

कॅमेरामध्ये लेपर्ड कॅट नावाचा मर्जार कुळातील प्राणीसुद्धा आढळून आला. दुर्मीळ तनमोराची नोंद ही व्याघ्र प्रकल्पातील पहिली नोंद ठरली, तर लेपर्ड कॅटची नोंद ही मध्य हिंदुस्थानातील पहिली नोंद ठरली. एखादा प्राणी किंवा पक्षी एखाद्या जंगलात आढळून आला तर एवढे काय त्यात? असेही कुणाला वाटू शकेल. मात्र वन्यजीव संशोधन व संवर्धनासाठी कार्यरत असणाऱयांसाठी या दोन्ही बातम्या महत्त्वाच्या घटना होत्या. यातील एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या दोन प्रजाती ज्या ठिकाणी आढळून आल्या आहेत तो भाग कायद्याने संवर्धनासाठी संरक्षित केलेला व विशेषत: वाघांच्या संवर्धनासाठी असलेल्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. आज हिंदुस्थानातील जे काही वन्यजीवन अबाधित ठेवले गेले ते या संरक्षित प्रदेशामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

गेल्या शतकात पृथ्वीवरून अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नामशेष झालेल्या असून नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्रजातींची यादीसुद्धा लांबलचक झालेली आहे.

प्राण्यांची किंवा पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर शिकारीमुळे कमी होत आहे असे उत्तर सर्वसामान्यपणे कुणीही देईल. मागील शतकात आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात शिकार झाली हे सत्य आहे. या शिकारीमुळे वाघ, सिंह, गेंडे किंवा हत्ती असे मोठे प्राणी मोठ्या प्रमाणात मारले गेलेत, तसेच खाण्यासाठी किंवा तथाकथित औषधी उपयोगासाठी लहान प्राणी व खाण्यासाठी आणि शिकारीसाठी सुंदर व मोठ्या आकाराचे पक्षी प्रचंड प्रमाणात मारले गेलेत. यामध्येच अनेक प्रजाती नामशेषसुद्धा झाल्यात. त्यामुळेच 60 तर 70 च्या दशकात वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित झाला. यासाठी काम करण्यासाठी अनेक देशांत संस्था व व्यक्ती उदयास आल्यात. त्यातून पुढे जगभरात विविध देशांत वन्यजीव संवर्धनाचे कायदे निर्माण केले गेलेत. आपल्या देशातसुद्धा 1972 साली वन्यजीव संवर्धन कायद्याची निर्मिती झाली. तसेच वाघ झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आल्यामुळे 1973 साली हिंदुस्थानात व्याघ्र प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. वन्यजीव संवर्धन कायद्यात, आपल्या देशात धोकाग्रस्त असलेल्या प्राणी, पक्षी, सरीसृप, जलचर, कीटक व वनस्पती अशा सर्वच प्रजातींना सूचीबद्ध करण्यात येऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार प्राथमिकता देण्यात आली. आपण त्यास `शेड्यूल’ असे संबोधतो. अशा धोकाग्रस्त प्रजाती ठरविण्याचे प्रत्येक देशाचे आपापले मापदंड आहेत, तसेच काही देशांत तशी काही व्यवस्था नाहीत म्हणूनच आय.यु.सी.एन. म्हणजेच निसर्ग संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय संघटन या संस्थेने जगभरातील प्रजातींची माहिती गोळा करून व त्यांची यादी तयार करीत असते. काही मापदंडाच्या आधारे धोकाग्रस्त असलेल्या प्रजातींची यादी `रेड डेटा बुक’ नावाने प्रकाशित करीत असते. या यादीनुसार आज जगभरातील 31 हजार प्रजाती या धोकाग्रस्त श्रेणीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. या प्रजातींच्या संवर्धनासाठी व त्यांना नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या सिनेटमध्ये 2006 साली `धोकाग्रस्त प्रजाती दिवस’ साजरा करण्याचा ठराव करण्यात आला. धोकाग्रस्त प्रजातींच्या संवर्धनासाठी जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी हा दिवस अलीकडे जगभरात साजरा केला जाऊ लागला आहे.

नामशेष झालेल्या प्राण्यांमध्ये लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीतळावरून नष्ट झालेले डायनोसॉर किंवा 17 व्या शतकात मॉरीशस बेटावरून संपलेला डोडो पक्षी माहिती आहेत. नामशेष होण्याचा धोका असलेल्या आय.यु.सी.एन.च्या यादीमध्ये प्राधान्पामानुसार चार श्रेणी केलेल्या असून त्यामध्ये नामशेष होण्याचा सर्वात जास्त धोका असलेली श्रेणी म्हणजे नष्टप्राय श्रेणी (ण्rग्tग्म्aत्त्ब् Rarा), त्याखालोखाल असलेली दुसरी श्रेणी म्हणजे धोकाग्रस्त श्रेणी (ह्हां्), संभाव्य संकटग्रस्त (न्ल्त्हींत) व शेवटची म्हणजे संकट समीप श्रेणी (र्ऱी ऊप्rाatाहा्).

आपल्या हिंदुस्थानचा विचार केल्यास एकूण पक्षी प्रजातींपैकी सुमारे 14 टक्के म्हणजेच 182 प्रजातींचा समावेश झाला आहे. यामध्ये नामशेष होण्याचा सर्वात जास्त धोका असलेल्या नष्टप्राय श्रेणीमध्ये सुमारे 17 प्रजातींचे पक्षी असून यामध्ये हिमालयन लावा, जेर्डनचा धाविक, गुलाबी डोक्याचा बदक, माळढोक, तनमोर, स्पूनबिल सँडपायपर, संघाचारी लँपविंग, पांढऱया पोटाचा हेरॉन अशा पक्ष्यांचा समावेश आहे. यातील हिमालयन लावा, जेर्डनचा धाविक, गुलाबी डोक्याचा बदक हे तीन पक्षी तर आज नामशेष झाले असल्याचे मानले जात आहे हे विशेष.

सस्तन प्राण्यांचा विचार केल्यास आज हिंदुस्थानातील चित्ता हा प्राणी हिंदुस्थानातून सुमारे 70 वर्षांपूर्वी नामशेष झाला आहे. याशिवाय जंगलात आढळणारे  वाघ, सिंह, हिम बिबट्या, गेंडा, लॉयन टेल्ड मकॅक, काश्मीर स्टॅग, निलगिरी थर हे प्राणी संकटग्रस्त प्राण्यांच्या नष्टप्राय श्रेणीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. असे  असले तरी या प्रमुख प्राण्यांशिवाय अनेक महत्त्वाचे व लहान आकाराचे सस्तन प्राणीसुद्धा संकटग्रस्त यादीतील इतर श्रेणीत समाविष्ट आहेत. हरीण प्रकारातील कस्तुरी मृग, पिसोरी हरीण, बारासिंगा, माकड प्रकारातील गिब्बनसारख्या प्रजाती, लहान आकाराचे झाड चीचुन्द्राrम लाल पांडा, खार, खवले मांजर हे प्राणीसुद्धा आज संकटग्रस्त झालेले आहेत.

प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवाची तस्करी आजसुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. हिमालयात आढळणारा कस्तुरी मृग, त्याच्या नाभीत असलेला सुगंधी पदार्थ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मारला गेला. हरणांच्या अनेक प्रजातींची पूर्वी छंदासाठी शिकार केली जात असे. आजसुद्धा अनेक भागांत खाण्यासाठी हरीण मारले जातात. खवले मांजराच्या खवल्यांच्या व्यापारासाठी त्याची आजसुद्धा मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात खवले मांजराची शिकार केल्याची अनेक प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. यावरून त्याच्या  तस्करीचा अंदाज करता येऊ शकतो.

प्रजाती नामशेष होण्यामागे किंवा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन त्यांचा समावेश संकटग्रस्त यादीत होण्यामागे फक्त शिकार हे एकमेव कारण नाही हेसुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागेल. शिकारीशिवाय वन्य प्राण्यांचे नष्ट होत असलेले अधिवास, म्हणजेच जंगलांचे कमी होणारे प्रमाण. त्यामुळे जंगली प्राण्यांचे अधिवास संकटात सापडलेले आहेत. तलाव व समुद्र अशा अधिवासामध्ये प्रदूषण तसेच मानवी हस्तक्षेपामुळे जलचर प्राणी व पक्षी यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अनियंत्रित अशा मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील छोटे प्राणी, पक्षी, सरीसृप, कीटक तसेच जलचर पक्षी व जलचर प्राणी हे आज संकटात सापडलेले आहेत. याशिवाय रोगराई, प्रांतातील प्रजातींची घुसखोरी, वृक्षतोड अशी अनेक कारणे अनेक प्रजातींना संकटात लोटण्यास कारणीभूत ठरत आहेत. जंगलतोडीमुळे जंगलातील अखंडता नष्ट पावल्याने व संचारमार्ग संपुष्टात आल्याने मोठ्या प्राण्यांमध्ये आंतरप्रजनन यांसारखे धोके निर्माण झालेले आहेत. सध्या क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरणीय बदलाचे संकट तर मानवासह सर्वच प्रजातींसमोर उभे ठाकलेले आहे. या संकटामुळे भविष्यात कुठल्या प्रजाती नामशेष होतील किंवा कुठल्या प्रजाती या संकटग्रस्त श्रेणीमध्ये येतील हे तर येणारा काळच ठरवेल.

[email protected]

(लेखक मानद वन्यजीव रक्षक व वन्यजीव अभ्यासक आहेत.)