उमेद – हिंदुस्थानचा मॅचविनर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ऍक्शन अनऑर्थोडॉक्स म्हणजे पारंपरिक गोलंदाजी ऍक्शनशी न जुळणारी. त्यामुळे त्याला कारकिर्दीत दुखापतीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येऊ लागली. मात्र याच गोलंदाजी ऍक्शनने त्याने नंतर जग जिंकायला सुरुवात केली.

वीरेंद्र सेहवाग, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल यांची फलंदाजी शैली झटपट क्रिकेटला साजेशी असल्यामुळे कसोटीसारख्या पारंपरिक क्रिकेटमध्ये त्यांचा निभाव लागणार नाही, अशी टीका करणाऱयांना या तिघांनीही कसोटीत त्रिशतकासह धावाच धावा उभारून सणसणीत उत्तर दिले. लेगस्पिनर म्हणून पुढे येत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिवन स्मिथने सध्याच्या जनरेशनमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवतानाचा केलेला प्रवास थक्क करणारा ठरलाय. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली ऍशेस मालिका त्याने स्वबळावर कांगारूंना जिंकून दिली. अशा उदाहरणांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावेसे वाटत आहे. हा पठ्ठय़ा म्हणजे, हिंदुस्थानचा खराखुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. याची गोलंदाजी शैली फक्त ट्वेण्टी-20 व वन डे या क्रिकेटच्या प्रकारासाठी बनलेली आहे. असा सूर उमटू लागला. मात्र पदार्पणानंतर पहिल्याच वर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या तीन बलाढय़ देशांत प्रतिस्पर्धी संघांतील स्टार फलंदाजांना त्याने आपल्या तालावर नाचवले. आतापर्यंतच्या 12 कसोटींमध्ये 62 फलंदाजांना बाद करून त्याने हिंदुस्थानच्या घवघवीत यशात सिंहाचा वाटा उचललाय. झटपट क्रिकेटमधला स्टार ते प्रदीर्घ क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांची ‘कसोटी’ पाहणाऱया प्रवासाने त्याने टीकाकारांची बोलती बंद केलीय. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकल्यास एका हाती सामना फिरवून देणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज ठरलाय याची प्रचीती येईल.

जसप्रीत बुमराहच्या जडजणघडणीत गुजरातचा संघ व आयपीएलचा मुंबई इंडियन्सचा संघ यांचा मोलाचा वाटा आहे. अनुभवी पार्थिव पटेल ऍण्ड कंपनीने या दरम्यान रणजी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची करामत करून दाखवली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच वर्षी गुजरातला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. पंजाबविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने तीन गडी बाद करून सामनावीराचा मान संपादन केला. पार्थिव पटेलने गुजरातचा कायापालट केला. याप्रसंगी जसप्रीत बुमराहचे योगदानही न विसरता येण्याजोगेच. गुजरातला हिंदुस्थानातील क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतर जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये घवघवीत यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्सने 2013 सालापासून आयपीएलचे चार वेळा जेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सच्या उत्तुंग झेपीत जसप्रीत बुमराहची कामगिरी लक्षवेधक ठरलीय हे विशेष.

जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ऍक्शन अनऑर्थोडॉक्स म्हणजे पारंपरिक गोलंदाजी ऍक्शनशी न जुळणारी. त्यामुळे त्याला कारकिर्दीत दुखापतीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येऊ लागली. मात्र याच गोलंदाजी ऍक्शनने त्याने नंतर जग जिंकायला सुरुवात केली. त्याची चेंडू सोडण्याची पद्धतही फलंदाजांना चक्रावून सोडते. टीम इंडियाच्या या गोलंदाजाचे मुख्य अस्त्र्ा म्हणजे सातत्याने तो 140 ते 145 कि.मी. वेगाने चेंडू टाकू शकतो. एवढेच नव्हे तर, मनाला येईल तेव्हा तो आपल्या भन्नाट यॉर्करने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखू शकतो. या सर्व कारणांमुळे तो सध्याच्या पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रेण्ट बोल्ट, कॅगिसो रबाडा, ख्रिस वोक्स या वेगवान गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरतोय.

मायकेल होल्ंिडग, ऍण्डी रॉबर्टस्, माल्कम मार्शल, जोएल गार्नर या वेस्ट इंडीज वेगवान गोलंदाजांनी एक काळ गाजवला. डेनिल लिली, जेफ थॉमसन, बॉब विलीस, रिचर्ड हॅडली यांनी आपल्या कारकिर्दीत प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांची भंबेरी उडवलीय. इम्रान खान, वासीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर या पाकिस्तानी गोलंदाजांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. ग्लेन मॅग्रा, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली या त्रिकुटाने कांगारूंना सोन्याचे दिवस दाखवले. डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेसाठी त्याचीच पुनरावृत्ती केलीय. ही सर्व परदेशी क्रिकेटपटूंची नावे. हिंदुस्थानचा आजवरचा सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज म्हणजे कपिलदेव (अर्थात सर्व बाबींचा विचार करता). कपिलदेव याने फिटनेसमध्येही बाजी मारली हेही विसरता कामा नये. पण त्याच्या पलीकडे हिंदुस्थानकडे हाताच्या बोटावर मोजावी अशी मंडळी दिसतेय. जवागल श्रीनाथ, झहीर खान, आशीष नेहरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी हे जास्तीतजास्त बळी मिळवणारे हिंदुस्थानचे वेगवान गोलंदाज. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या एण्ट्रीने हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीचा चेहरामोहरा बदललाय हे मान्य करायला हवे.
महान फलंदाज जन्माला घालणाऱया हिंदुस्थानात जसप्रीत बुमराहच्या रूपात दिग्गज गोलंदाज तयार झालाय. त्याच्या यॉर्करला, शॉर्ट चेंडूला प्रतिस्पर्धी फलंदाज घाबरतात. त्याची षटके निर्धाव खेळून काढण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचे चेंडू कोणत्या दिशेने जात आहेत हेदेखील बहुतांशी वेळा समजत नाही. प्रतिस्पर्ध्यांना त्याच्याबद्दल कमालीचा आदर आहे. आणखी काय हवं! येथेच जसप्रीत बुमराहसह हिंदुस्थान जिंकलाय.

पण येथेच सर्व काही संपत नाहीए. सध्या क्रिकेट तीन प्रकारांत खेळले जात आहे. कसोटी, वन डे व ट्वेण्टी-20. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर 1989 सालापासून थेट 2013 सालापर्यंत क्रिकेट खेळू शकला. त्याने आपल्या कामगिरीसह फिटनेसवरही लक्ष दिले. मात्र या वेळी हिंदुस्थानातील प्रत्येक क्रिकेटपटूला फिटनेससह आणखी बाबींवर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. टेनिसमधील ग्रेट खेळाडू रॉजर फेडरर याने कारकीर्द लांबावी यासाठी लाल मातीवरील हंगामापासून दूर राहणे पसंत केले होते. जसप्रीत बुमराहनेही आपल्या कारकिर्दीकडे आत्तापासूनच लक्ष देणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या मालिकांमध्येच त्याने खेळायला हवे. बीसीसीआयसह संघ व्यवस्थापनानेही त्याला अधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. यानंतर आपला ‘मॅचविनर’ देशासाठी प्रदीर्घ काळ खेळू शकेल.

– [email protected]