जाळय़ातला चंद्र…!

>> जोसेफ तुस्कानो

खरी कविता कवी आणि रसिकांना आनंद देणारी असते. कवीची कविता लिहून झाली की, ती त्याची राहत नाही. ती रसिकांची होते. कवीने कवितेत मांडलेला विचार व अनुभव रसिकांच्या विचारांशी, अनुभवाशी मिळताजुळता असतो, तेव्हा तो सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतो व रसिक दाद देतो. 1999 साली युनेस्कोचे पॅरिसमध्ये अधिवेशन भरले होते तेव्हा 21 मार्च जगभर कवितांचा दिवस म्हणून साजरा व्हावा हा निर्णय घेतला गेला होता. भाषांतील वैविध्यतेला कवितांच्या माध्यमातून आधार देणे व नामशेष होत चाललेल्या भाषांना पुनर्जीवित करणे हा या दिवसाच्या साजरीकरणाचा हेतू होय.

पु. ल. एकदा म्हणाले होतेः ‘‘मधुमेह झालेला हलवाई म्हणजे स्वतःच्या कविता गाऊ न शकणारा कवी होय.’’ प्रत्येक भाषेत कविता असते तसेच ही कविता प्रत्येक व्यक्तिमत्त्वात दडलेली असते. कविता ही एक आंतरिक घटना असते. भाववृत्ती हाच तिचा आशय असतो. ती कविपरत्वे वेगळी असू शकते. म्हणून कवितेचे विषय तेच तेच असले तरी त्यात आकारित होणारी भाववृत्ती तीच ती असते, असे साहित्यिक म. सु. पाटील म्हणतात ते किती खरं आहे! कधी साध्यासुध्या रूपात तर कधी क्लिष्ट स्वरूपात कविता मानवी जीवनातील भावना व्यक्त करत असते. मानवी जीवनातील रहस्ये कवितातून प्रकट होत असतात. कविता हा असा एक प्रांत आहे, जिथे विविधरंगी शब्द आपल्या तालासुरांसह प्रत्येकाच्या भेटीस येत असतात. कवितेचे शब्द कुठल्याही भाषेतले असोत, ते दूरवर माणुसकीचा संदेश घेऊन जातात आणि मानवी प्रतिष्ठsचा हुंकार व्यक्त करत असतात. कविता म्हणजे जागतिक पातळीवरचा दुमदुमणारा प्रतिध्वनी होय. त्यासाठीच तर कविता सामान्य माणसापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांचे विविध भाषांत अनुवाद होऊन कवितेतील वैविध्यता अजून एक गोष्ट अधोरेखित करते व ती म्हणजे जगातल्या कानाकोपऱयात जगणाऱया समस्या आणि भावना सारख्याच असतात. कविता स्वातंत्र्याचा हुंकार असतात व आपल्या मानवी अस्मितेची त्या आपल्याला जाणीव करून देतात. त्यामुळे शैक्षणिक साचेबंदात कवितांना हमखास स्थान मिळत असते. कवितांच्या प्रवाहामुळे तरुणांना जग ओळखणे आणि समजणे सोपे जाते. भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडे पोहोचून कविता-क्षेत्रात आपण घुसखोरी करतो तेव्हा इतरांच्या भाषा, भावना, संवेदन क्षमता आपल्याला अनुभवता येतात. कारण कविता ज्ञानाचे गतिशील वाहन आहे आणि नावीन्याचा शोध घेण्यास लावणारे प्रेरक स्थान आहे. सिंधुदुर्गमधील मालगुंड येथील केशवसुत स्मारकात एक वचन कोरलेले आहेः ‘कवी म्हणजे आत्म्याचे चित्र रेखाटणारा चित्रकार’! किती संपर्क आहे ते!

अंतःकरणातून स्फुरलेले आणि अचूक, नेमक्या शब्दांत गुंफलेले काव्य हे कवीच्या श्वासोच्छ्वासासारखे असते. कविश्रेष्ठ कुमुमाग्रज म्हणाले होते, त्याप्रमाणे ‘‘कवितेच्या स्वामित्वाची मुद्रा एकदा कपाळावर बसली म्हणजे माणसाच्या जीवनात एक विचित्र कैफ निर्माण होतो. तसा कैफ माझ्याही वाटेला आला. नेहमीप्रमाणे वेगळे आकार नि वेगळे रंग माझ्या दृष्टीला पडू लागले. कवितेने अनेक व्यथा, दुखणी माझ्या दाराशी आणली असतील हे खरं आहे, परंतु त्याचबरोबर हेही खरं आहे की, कवितेने मला जे सुख आणि समाधान दिले ते मला इतरत्र कुठेही मिळाले नाही.’’
जो माणूस असतो तो कवी असतो. त्याचे शब्द ही दुनिया सुंदर व स्वच्छ करण्यासाठी लढत असतात. कवीला जिवंत माणसाचे हृदय लाभलेलं असते. कवीचा लौकिकार्थाने या युद्धात अनेकदा पराभव होतो, पण हे पराभव माणसाला आणि कवीला अजिंक्य बनवितात. कवी खऱया अर्थाने कधीच पराभूत होत नसतो. कवितांचे माहात्म्य इतके मोठे असते. कविता ही मितव्ययी, नेमकी आणि टोकदार रचना असते. ती कमी काळात, कमी शब्दांत वेगवान आवाहन करते. त्यामुळे तिच्यावरील जबाबदारी अधिक वाढते. हा जबाबदारीचा गोळीबंदपणा सैल पडला, तर कवितेची पडझड होते. त्यामुळे जबाबदार असणे ही कवितेची पूर्वअट असते.

कविता तुम्हाला शोधत येत असते. तुम्ही कविता लिहिता हा केवळ भ्रम असतो. कविता हा कवीच्या उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. कविजन मनस्वी स्वभावाचे असतात. कारण तो त्यांचा स्वभावधर्म असतो. काही कवी संयमी वृतीचेदेखील असतात. उत्कट भावनेला ते विचारांची बैठक देतात. शूचिता, त्याग या मूल्यांवर त्यांची असीम निष्ठा असते. अजोड काव्यात्मक आवाजासाठी, ज्यांच्या साधेपणात सौंदर्य दडलेले असते आणि जे वैयक्तितेला वैश्विक परिणाम बहाल करण्याची कुवत त्यांच्या ठायी असते. त्यांच्या कवितांचा नैसर्गिक स्वर, प्रांजळपणा, भावनिकता आणि अल्पाक्षरांतील काव्यात्मकता ठळक उठून दिसणारी असते. आयुष्यात सगळ्यांनाच अनुभव येतात, पण त्याची कविता घडविणे ही कला साऱयांनाच जमत नाही.

कवी शशिकांत तिरोडकर म्हणतात, त्याप्रमाणेः ठिणगीचा वणव्याशी आणि थेंबाचा समुद्राशी जसा आत्मसंबंध असतोच तसा कवितेचा ठिणगीशी आणि थेंबाशी एकाच वेळी असावा. कविता झिरपते काळजाच्या आत, जसे पाणी जमिनीतून मार्ग शोधत जाते. कविता भरारी घेते तेव्हा तिला तिच्या पंखाने उडू द्यावे…

म.वा. धोंड म्हणतात की, कविता म्हणजे मृगजळ किंवा जाळ्यातला चंद्र…! चंद्र जाळ्यात सापडला असं वाटते, जाळे पाण्याबाहेर काढलं की, निसटून गेलेला… कविता हा साहित्य प्रकार वाङ्मयाचा एक महत्त्वाचा भाग असूनही मध्यंतरी कवीचे जे बेसुमार तृण-पीक वाढले आणि कवितांचा सुळसुळाट झाला, त्यामुळे रसिकांनी तिच्याशी फारकत घेतल्यासारखे झाले. तरीही खरी कविता कवी आणि रसिकांना आनंद देणारी असते. कवीची कविता लिहून झाली की, ती त्याची राहत नाही, ती रसिकांची होते. कवीने कवितेत मांडलेला विचार व अनुभव रसिकांच्या विचारांशी, अनुभवाशी मिळताजुळता असतो, तेव्हा तो सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतो व रसिक दाद देतो. कवी जे अनुभवत असतात…आयुष्याच्या वाटेवरले खाचखळगे, वळणे पार करताना कवीच्या मनावर ते अनुभव टीपकागदासारखे टिपले जातात. प्रतिभेचा स्पर्श झाला की, हे अनुभव शब्दरूप घेऊन कागदावर उतरतात, कोवळ्या उन्हात सकाळी सकाळी अंगणात येणाऱया पाखरासारखे !
जपानमध्ये दहा यशस्वी ‘हायकू’ लिहिणाऱया कवीला ‘फिलॉसॉफर’ म्हटले जाते, यावरून कवितांची महती लक्षात यावी.

आपली प्रतिक्रिया द्या