आपला माणूस : पर्यावरण रक्षणाची ‘मशाल’!

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

ग्रेटा थंबर्ग… वय फक्त 16 वर्षे… करीअरचा ध्यास घेणारे हे वय, पण ग्रेटाने ध्यास घेतला आहे तो पर्यावरण सुरक्षेचा. त्यासाठी तिने शाळाही सोडली आहे. मिळेल त्या माध्यमातून ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या धोक्याचे इशारे निर्भीडपणे मांडत आहे. पर्यावरण रक्षणाची ती  धगधगती ‘मशाल’च बनली आहे. पर्यावरणाचे नोबेल म्हटले जाणारे ‘राईट लाइव्हली हूड’ हा पुरस्कार तिला जाहीर झाला आहे. शिवाय शांततेच्या ‘नोबेल’साठीही तिचे नामांकन झाले आहे.

फार तर सोळा वर्षांची असेल ती… आणि हजारो मुलं तिच्या सोबत शाळेच्या बाहेर पडत आहेत. गेल्या वर्षीपासून दर शुक्रवारी आपलं भांडण लोकांसमोर मांडत आलेली ही छोटी मुलगी तिच्या वयाच्या जगभरातील लाखो मुलांना प्रभावित करत आहे. मुलांनाच का, सुजाण नागरिक असलेल्या जगभरातल्या प्रत्येक माणसाला अंतर्मुख करत आहे आणि ते अनेकदा अपराधी भावनेने ग्रासत आहेत. गेटा थंबर्ग या राग आणि त्वेषाने बोलणाऱया शाळकरी कार्यकर्तीने गेल्या काही दिवसांमध्ये जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच या किशोरवयीन मुलीचे शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे. त्याचबरोबर 25 सप्टेंबरला तिला पर्यावरणाचे नोबेल समजले जाणाऱया ‘राईट लाईव्हली हूड’ पुरस्काराची घोषणा झाली आहे.  ग्रेटा थंबर्गचा जन्म 3 जानेवारी 2003 या दिवशी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. ती ओपेरा गायिका आई मेलेना अर्नमन आणि वडील अभिनेता स्वांते थंबर्ग यांची कन्या. वयाच्या आठव्या वर्षी, 2011 मध्ये पहिल्यांदा तिला वातावरण प्रदूषणाची जाणीव झाली होती. वातावरण झपाटय़ाने बदलत आहे आणि ग्लोबल वार्ंमगचा फटका येत्या बारा वर्षांमध्ये संपूर्ण पृथ्वीला भोगावा लागणार आहे असे तिने वाचले होते. ती वातावरण बदलाच्या संदर्भात अस्वस्थ झाली. या सगळ्याला एकंदर कार्यपद्धती जबाबदार आहे हे तिच्या लक्षात आले. कार्यपद्धती राबवणारे प्रशासन, राजकारणी, सत्ताधीश या सगळ्यांबद्दल तिच्या मनात राग साठत गेला. गेल्या वर्षी म्हणजे ग्रेटा नववीला असताना यासंबंधी ग्लोबल वार्ंमगसंदर्भात काऊंटडाऊन सुरू झाले आहे लक्षात आले आणि तिच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला. घरात तिने विमान प्रवासाला विरोध केला. त्यामुळे तिच्या आईला गायिकेचे आंतरराष्ट्रीय करीअर सोडावे लागले. ती स्वतःही देशोदेशी भाषणाला जाताना नावेतून किंवा रोडने प्रवास करते. ग्रेटाने वातावरणाच्या बदलासाठी संप पुकारला, जागोजागी जाऊन भाषणे करू लागली. 2018 मध्ये तिने एका निबंध स्पर्धेमध्ये पर्यावरण बदलाच्या संदर्भात निबंध लिहिला. ती लिहिते ‘मला सुरक्षित आयुष्य जगायचं आहे. मात्र, मानवी इतिहासात वातावरण बदलाच्या ज्या भयानक परिस्थितीतून आपण जात आहोत, त्यामुळे मी सुरक्षित कशी राहणार?’ या तिच्या निबंधानंतर काही पर्यावरणवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. मात्र ग्लोबल वार्ंमगच्या संदर्भात सगळे नुसतेच बोलतात आणि ठोस काही काम होत नाही हे तिच्या लक्षात आले. 20 ऑगस्टला मात्र तिने शाळा सोडली आणि संसदेच्या समोर आंदोलन सुरू केले. स्वीडनमध्ये उष्मा-लहरी आणि वणवे पेटले. त्यामुळे या आंदोलनाची निकड तिला वाटू लागली. सरकारने कार्बन उत्सर्ग थांबवण्यासाठी तातडीची पावले उचलावी अशी तिची मागणी होती. सतत तीन आठवडे दररोज शाळेच्या वेळेत ती संसदेसमोर जाऊन बसत होती. तिच्या हातामध्ये ‘वातावरणासाठी शाळेचा संप’ अशा प्रकारचा फलक झळकत होता आणि जाणाऱया येणाऱयाला ती पत्रके वाटत होती, ज्यात ‘मी हे करते. कारण तुम्ही माझे भविष्य घाण करता’ असा संदेश होता. पुढे तिने तिचा संप एखाद्या कॅम्पेनसारखा राबवला. दर शुक्रवारी ती जगभरातल्या मुलांना संबोधित करून भाषणे देते, त्याची प्रेरणा घेऊन जगभरात दर शुक्रवारी कुठे ना कुठे पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांचे संप सुरू आहेत. संपूर्ण जगाने यासंदर्भात विज्ञानवादी व्हावे हे ती पटवून देत आहे. युनायटेड नेशनचे सचिव गटर्स यांनी तिच्या संपाला पाठिंबा दिला.  ती एकाच वेळी पर्यावरणाचे प्रखर नेतृत्व करणारी आणि त्याचवेळी टीकेचे लक्ष्य ठरली. ग्रेटाचा रोख जगभरातल्या राजकारण्यांवर आहे. ज्यांच्या हातात देश चालवणे पर्यायाने पृथ्वीचे रक्षण करणे आहे ते केवळ पर्यावरण बदलाबद्दल बोलतात आणि स्वार्थाचे राजकारण करतात असा तिचा थेट आरोप आहे. तिच्या तडाख्यातून जगभरातला एकही पंतप्रधान सुटला नाही. साहजिकच तिच्यावर अमेरिकेपासून ते जगातले अनेक प्रमुख नेते अत्यंत नाराज आहेत आणि तिची खिल्ली उडवत आहे. ‘ती वेडसर आहे’ असा आरोप होत आहे. मात्र सगळ्यांनाच तुंबडीभरू राजकारण्यांची लबाडी समजते. हे तिच्या चळवळीचे फार मोठे लौकिक यश आहे. ग्रेटाला जगभरातून प्रचंड सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. विविध पर्यावरणविषयक जागतिक परिषदांना ती संबोधित करते. मात्र, त्याच वेळी तिच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. तिचं वय आणि ‘मुलगी’ असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे गांभीर्याने बघू नये, असे स्वार्थी राजकारणी म्हणत आहेत. काहीही असो, आज पर्यावरण बदलाबद्दल अत्यंत निकडीची मागणी करणारी ग्रेटा सगळ्यांच्या शाबासकीला पात्र ठरत आहे. तिला नोबेल मिळेल न मिळेल, मात्र पर्यावरण बदलाच्या संदर्भात राजकारणी लोकांनी ठोस पाऊल उचलले नाही तर त्यांचे काही खरे नाही एवढे मात्र नक्की. ग्रेटाच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘सुरक्षित भविष्य आमचा अधिकार आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत.’

–  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या