परीक्षण- रंजक आणि रहस्यांनी वेढलेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्योती नांदेडकर

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजे सीआयए, रशियाची एफएसबी, चिनी गुप्तहेर यंत्रणा आयएलडी, फ्रान्सची डीएएस, इंग्लंडची एसआयएस जिला एमआय 6 या नावानं ओळखलं जातं, भारताची रॉ आणि पाकिस्तानची आयसिस या गुप्तचर यंत्रणांविषयींची माहिती अधूनमधून आपल्या वाचनात येते. आंतरराष्ट्रीय राजकारणातील साद-पडसाद समजून घेताना या गुप्तहेर संघटनांच्या  कारवाया आणि त्यांचे जागतिक राजकारणावर होणारे परिणाम, त्याच्या उमटणाऱया प्रतिािढया यांची संगती लावणे महत्त्वाचे असते.

‘मोसाद’ या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेविषयी जगात सर्वाधिक चर्चा होते. इस्रायल हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱयाला लागून आग्नेयेस वसलेला एक चिमुकला देश. हिटलरच्या वंशसंहारातून वाचलेल्या मूठभर यहुदी लोकांनी दुसऱया महायुद्धानंतर एकत्र येऊन स्थापन केलेल्या इस्रायल या देशाने अल्पावधीतच प्रचंड प्रगती साध्य केली. या देशाचे मनुष्यबळ कमी असले तरी अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर तेथे आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली गुप्तचर संघटना निर्माण झाली, जिचं नाव आहे- मोसाद! संशयाच्या धुक्याने वेढलेल्या गुप्ततेच्या जगात गुप्तचर यंत्रणांचा उदय आणि अस्त यांबद्दल अनेक कथा, प्रचलित असतात; परंतु इस्रायलच्या मोसाद आणि अमान या लष्करी गुप्तचर यंत्रणा मात्र त्यांची एकनिष्ठा आणि कार्यक्षमता यांसाठी आदरास पात्र ठरलेल्या आहेत.

‘मोसाद : इस्रायलची सर्वाधिक महत्त्वाची गुप्तचर यंत्रणा’ या अनुवादित पुस्तकाचे लेखक आहेत रोनाल्ड पायने. हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे या विषयांचे अभ्यासक असलेले रोनाल्ड पायने हे प्रख्यात ब्रिटिश पत्रकार होते. त्यांनी 1950 च्या दशकात पूर्वेतील देशांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. दहशतवाद आणि युद्ध या विषयांवरची त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली. हे पुस्तक म्हणजे जगासमोर आलेला मोसादचा पहिला संपूर्ण इतिहास होय. अतिशय तटस्थ राहून मोसादमधील ऐतिहासिक घटनांच्या कारणांची आणि परिणामांची मीमांसा करण्यात लेखक कमालीचे यशस्वी ठरतात. मोसादचं संपूर्ण स्वरूप, त्याचा उद्देश या सर्व बाबीदेखील तपशीलवार मांडण्यात आल्या आहेत. मोसादच्या एकेका मोहिमेबाबतची माहिती प्रसंगनिहाय सांगण्यात आली आहे. त्यात सखोलता आणि विविध बारकावेही असल्यामुळे पुस्तक अधिक रोचक झाले आहे. हे वर्णन करत असताना लेखकाने रंजकता आणि थरार कुठेही कमी होणार नाही, याचीही पुरेपूर दक्षता घेतल्याचे जाणवते. या संस्थेने देशाबाहेर केलेल्या सर्व कारवाया विलक्षण कार्यक्षम, कावेबाज आणि भयभीत करणाऱया आहेत. त्यामुळे हे पुस्तक लिहीत असल्याचे कळताच अनेकांनी लेखकाला हे काम धोकादायक आहे असे सांगितले.

आपल्या नवनिर्मित देशासाठी प्राणालाही तुच्छ लेखणाऱया मोसाद एजंट्सच्या विविध कारवाया आणि दहशतवादविरोधी तंत्रं यांच्या अविश्वसनीय कथा या पुस्तकातून आपल्याला समजतात. गुप्तहेरांचे आयुष्य कितीही कठीण असले तरीही; त्यांची देशभक्ती किती प्रखर असू शकते, हे या पुस्तकातील पहिल्या प्रकरणातूनच लक्षात येते.

1972 च्या म्युनिकमधील हत्याकांडानंतर मोसाद एजंट्सनी ज्याप्रकारे 12 संशयितांचा जगभर पाठलाग करून त्यांना यमसदनी धाडले, त्याची चर्चा तर सातत्याने जगभर करण्यात येते. जर्मनीतील निर्घृण अशा ज्यू वंशसंहारात महत्त्वाचा सहभाग असणारा नाझी अधिकारी अॅडॉल्फ आइकमन याने हिटलरच्या मृत्यूनंतर आपली ओळख लपवली आणि अर्जेंटिना देशाच्या एका कोपऱयात राहू लागला. मोसादने त्याच्याच घरात घुसून प्रचंड शिताफीने त्याचे अपहरण केले आणि इस्रायलमध्ये आणून फासावर लटकवले; मात्र इतर सार्वभौम देशांच्या हद्दीत जाऊन अपहरणापासून खुनापर्यंतची कृत्ये हातोहात करण्याबद्दल मोसाद ही संघटना कायमच वादग्रस्त ठरली आहे.

यहुदी आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये असणारे वैर का आहे, इस्रायल हा स्वतंत्र देश निर्माण होणे अवघड का होते, सोव्हिएत युनियन- अमेरिका- चीनची भूमिका काय होती, मोसादने अमेरिकेला कोणती मदत आणि का केली, इराण-इराकचं युद्ध का झालं, त्यावेळी मोसादची भूमिका काय होती? अशा अनेक मुद्दय़ांची उकल या पुस्तकातून सविस्तरपणे होते. मोसादच्या यशस्वी झालेल्या मोहिमांबरोबरच ज्या मोहिमा अयशस्वी झाल्या, त्यांचीही चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे. निव्वळ घटनांवरच भर न देता त्यात सहभागी असणाऱया व्यक्तिरेखाही लेखकाने तितक्याच ताकदीने उभ्या केल्या आहेत. या पोट सर्व्हिस एजन्सीमध्ये काम करणारे शिलेदार जाज्वल्य राष्ट्रभक्तीची प्रतीकं असण्यासोबतच  माणसंही आहेत, याचीही जाणीव या व्यक्तिरेखांबाबत वाचत असताना होते. मोसादचे हे उल्लेखनीय वैशिष्टय़ आहे की, ती आपल्या लोकांना जिवंत परत मिळविण्यामध्ये वारंवार यशस्वी ठरली आहे. रोनाल्ड पायने यांनी लिहिलेल्या ‘मोसाद’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद अॅड. जुई परळीकर यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरू शकेल, इतक्या विस्तृत स्वरूपाची माहिती देतानासुद्धा वाचकाची उत्कंठा तेवढीच कायम ठेवणारे हे पुस्तक आवर्जून संग्रही असावे.

मोसाद – इस्त्रायलची सर्वाधिक महत्त्वपूर्ण गुप्तचर यंत्रणा

लेखक : रोनाल्ड पायने

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे : 296, मूल्य : 399/- रुपये