
>> कल्पना राणे
चेहऱयावर निरागसता आणि पर्सनॅलिटी डॅशिंग… युवावर्गात त्याला पसंती न मिळाली तरच नवल. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱया शिव ठाकरेला इंटरनेटवर प्रचंड मोठा चाहता वर्ग लाभला आहे. त्यासाठी तो स्वतःला भाग्यवान समजतो. डिजिटल युगात इंटरनेटवर लाईक्स, शेअर, व्हय़ूज मिळवणारा हा युथ आयकॉन शिव ठाकरे मुख्यधारेतल्या हीरोच्या तोडीचे लाईक्स मिळवणारा ठरला आहे.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद मिळालं आणि शिव ठाकरे घराघरात पोहोचला. त्यानंतर बिग बॉस हिंदीत सहभागी होण्याची संधी मिळाली. भले तो विजेता ठरला नाही, पण देशाच्या कानाकोपऱयात मात्र पोहोचला. इंटरनेटवर त्याला प्रचंड मोठा चाहता वर्ग लाभला.त्याच्या प्रत्येक छोटय़ा बातमीला लाखो लाइक्स/व्हय़ूज मिळतात. त्यामुळे टीव्ही चॅनलने त्याला रिऍलिटी शोजचा हीरो बनवलं. ‘चाहते माझ्यावर सगळय़ा बाजूने प्रेमाचा वर्षाव करतात. पण ही पापाराझी एखाद्या पोलिसांसारखे माझ्या सतत मागावर असते. लोकप्रियता मिळते, पण त्यामुळे विनाकारण माझ्याबद्दल गैरसमजही होतात,’ शिव मनापासून बोलतो.
शिवचं वागणं-बोलणं पाहता त्याला अजून ग्लॅमरच्या ‘ग’ची लागण झाली नसल्याचं जाणवतं. एम-टीव्ही रोडीजमध्ये त्याने ‘मराठी माणूस’ अशी ओळख प्रस्थापित करत सगळय़ांचे लक्ष वेधून घेतलं. फॅन्स तयार व्हायला तिथेच सुरुवात झाली. आलेली प्रत्येक संधी घ्यायची हे त्याने ठरवलं होतं. मनात खूप स्वप्नं बाळगून तो अमरावतीवरून मुंबईला आला होता. मग मराठी बिग बॉसने बोलावलं. त्याच्यातल्या निरागसतेला, त्याच्या लहानपणींच्या किश्शांना दाद मिळाली. मग शिवने मागे वळून पाहिलंच नाही. हिंदी बिग बॉस, अनेक ब्रँड एन्डॉर्समेंट आणि सध्या सुरू असलेलं ‘खतरों के खिलाडी’!
‘कंटाळा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. मिळतील त्या संधी घ्यायच्या हे ठरलेलं आहेच. जर तुम्ही मनाने आणि कामाने खरे असाल तर ओळख ही मिळतेच.’ शिवचे पाय अजूनही जमिनीवरच असल्याचं जाणवतं. कोविडनंतर जसजसं जग उघडायला लागलं तसं त्याने एका टीव्ही चॅनलच्या क्रिएटिव्ह माणसाला फोन करून बिग बॉस हिंदीत एंट्री मिळवण्यासाठी खूप विनवण्या केल्या. दुसऱया दिवशी ऑडिशनमध्ये त्याने सगळय़ांची मनं जिंकली. मग ‘खतरों के खिलाडी’ने बोलावलं. ‘माझ्यासोबत अनेक मोठमोठे कलाकार होते. पण प्रत्येक एपिसोडमध्ये माझ्यावर फोकस होता. कारण माझा चाहता वर्ग! माझ्यावरचा असा फोकस मला फार सुखावणारा होता. प्रत्येक टास्क करतेवेळी मनात भीती असायची. पण मी बोलण्यातूत ती भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न करायचो. मला स्विमिंग येत नाही तरी मी पाण्यात शिरलो. रिअलिटी शोच्या माध्यमातून यश रिऍलिटीमध्ये उतरतंय. मग जिद्द उफाळून यायची. हरलो तरी चालेल, आपण परीक्षा द्यायची हे मन ठरवायचं आणि उडी मारायचो. टास्क पूर्ण व्हायचा.’
हारजीत हा प्रकार शिवच्या मनात येतच नाही. स्वतःच्या तत्त्वावर तो चालतोय म्हणून अमरावतीवरून मुंबईच्या ग्लॅमर वर्ल्डपर्यंत पोहोचला. थांबायचं नाही हे ठरवून तो करिअर आखतोय. एकेकाळी ज्या कुटुंबियांना सोशल मीडियाचा गंध नव्हता अशा कुटुंबातल्या शिवच्या पाठीशी आहेत जगभरातले इंटरनेटवरचे चाहते!
सापशिडीच्या खेळाप्रमाणे सापाने गिळलं की परत शिडी चढण्याचं त्याला माहीत आहे. लवकरच अतिशय उत्कंठापूर्वक मराठी चित्रपटातून तो त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


























































