आभाळमाया – ‘किंताऱ्या’ची कथा

>> [email protected]

सतराव्या शतकापर्यंत जगभरातील खगोल अभ्यासक केवळ डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणांवर आधारित आपले खगोलीय सिद्धांत नोंदवत होते. मात्र त्यातही त्यांनी खूपच प्रगती केली होती. अनेक वर्षे रोज रात्री किंवा ठरावीक काळाने आकाश निरीक्षण करून ते ‘पिंजून’ काढण्याचा ध्यास जगातील अनेक संशोधकांनी घेतला. आपल्याकडे वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट आणि भास्कराचार्य, गणेश दैवज्ञ असे संशोधक होऊन गेले. एफिमेरिस किंवा पंचांगातील ग्रहगणित आपल्याकडेही विकसित झाले.

मात्र गॅलिलिओने दुर्बिणीचा वापर करून 1609 मध्ये ग्रहांचं प्रत्यक्ष रूप न्याहाळलं तेव्हापासून खगोलीय निरीक्षणाला वेगळंच परिमाण लाभलं. पुढे दुर्बिणींमध्येही संशोधनात्मक बदल होऊन प्रभावी दुर्बिणी तयार झाल्या. प्रचंड दुर्बिणींच्या वेधशाळा उभ्या राहिल्या. आपल्याकडे क्वालूर येथे 99 इंची आरशाची दुर्बिण निरीक्षकांना अवकाशातील अनेक गोष्टी स्पष्टपणे दाखवू लागली. छोटे ‘ऑप्टिकल’ म्हणजे आरशाचे परावर्ती स्वरूपाचे टेलिस्कोप आमच्यासारखे अव्यावसायिक खगोल अभ्यासकही वापरतात आणि जनसामान्यांच्या मनातील विराट विश्वाचे कुतूहल लक्षात घेऊन रात्रभराच्या आकाशदर्शनाचे कार्यक्रमही आयोजित करतात. परदेशात म्हणजे सुबत्ता असलेल्या देशात स्वतःच्या मोठमोठय़ा दुर्बिणी घेऊन अवकाश निरीक्षक रात्री जागवतात. आपल्याकडेही आता या शास्त्राचा अभ्यास चांगलाच वाढत आहे. विराट विश्वाचे घटक असलेले आपण या विश्वाचे अस्तित्व कसे आहे याबद्दल बऱयाचदा अनभिज्ञ असतो. कारण हा अभ्यास थोडासा कठीण आहे, परंतु तो तितकाच रंजकही आहे. आपल्या मनात जसे कुतूहल असते तसेच सुरुवातीला संशोधकांच्या, शास्त्रज्ञांच्या मनात असते. त्यात मोठा फरक असा की, ही मंडळी आपलं आयुष्य त्या विषयाच्या अभ्यासाचा ध्यास घेऊन संशोधनाला समर्पित करतात. अशा महान संशोधकांमुळेच एरवीही आपलं जीवन प्रगत आणि सुखी करणाऱया रेडिओ, टीव्ही, फोन, सेलफोन, विमानं, मोटारी, ट्रेन वगैरे सोयी निर्माण झाल्या आहेत याची जाणीव ठेवायला हवी.

कोणत्याही संशोधनात बदलत्या काळात पूर्वीपेक्षा भर पडत असते. आधीच्या गृहितकांमध्ये बदल होतात किंवा त्यांचा विस्तार होतो, नव्या संकल्पना स्फुरतात आणि संशोधन अव्याहत सुरू राहते. संशोधन अमुक क्षणी सुरू झाले आणि ठरावीक क्षणी संपलं असं होत नाही. ती एक सततची प्रक्रिया आणि माणसाच्या मेंदूतील विचारशक्तीचं प्रतिबिंब आहे. खगोल अभ्यासात दुर्बिणीचा टप्पा जसा महत्त्वाचा होता तसाच रेडिओ खगोलशास्त्राचा (radio-astronomy) उदय हीसुद्धा क्रांतिकारी घटना होती. विश्वाच्या महाप्रसारणाचा (बिग बॅन्ग) सिद्धांत स्वीकारताना एडविन हबल यांच्या संशोधनाने विश्वाचे प्रसरण प्रत्यक्ष पाहता येऊ लागले. विश्वातील दीर्घिका (गॅलेक्सी) परस्परांपासून दूर जात असतानाचे ‘रेड शिफ्ट’ (ताम्रसृती) सिद्ध झाल्यावर प्रसरणशील विश्व संकल्पनेविषयी शंका राहिली नाही. रेडिओ दुर्बिणीच्या सहाय्याने विश्वातील अतिदूरच्या प्राचीन दीर्घिकांकडून प्राप्त झालेल्या संदेशांवरून (सिग्नल) विश्वाची मर्यादा व त्याचे वय याचीही मांडणी करण्यात आली. स्थिर स्थिती (Steady state) आणि प्रसरणशील (Expanding) विश्व संकल्पनांचा विचार नंतर विस्ताराने करता येईल.

या लेखात रेडिओ खगोलशास्त्राविषयी सर्वसाधारण माहिती घेऊ. 1937 मध्ये जगातील पहिली रेडिओ दुर्बीण ग्रॉट रेबर या हौशी खगोल अभ्यासकाने बनवली. तो अमेरिकेतील इलिनॉइस राज्यात राहायचा. त्या दुर्बिणीच्या ‘डिश’द्वारे त्याला 1944 पर्यंत धनु रास, शर्मिष्ठा आणि हंस तारकासमूहातील तीव्र रेडिओ सिग्नल ग्रहण करता आले. त्यापैकी धनु आणि शर्मिष्ठामधील सिग्नल आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतीलच होते. हंस मात्र एका फिकट (डिम) दीर्घिकेचा भाग होता.

रेडिओ टेलिस्कोपमध्येही 1960 पर्यंत बरेच बदल होऊन त्यांच्याकडून परिणामकारी माहिती मिळू लागली. 1960 मध्ये ऍलन सॅन्डेज यांना एक दूरस्थ ‘तारा’ सापडला. तो आपल्या सूर्यमालेपासून पाच अब्ज प्रकाशवर्षे दूर होता (म्हणजे सूर्याच्या सध्याच्या वयाइतका!). त्यानंतर 1962 मध्ये 3 अब्ज अंतरावरचा एक ‘तारा’ सापडला. मात्र त्याचा वेग लक्षात घेता तो आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील नसावा असा कयास शास्त्र्ाज्ञांनी केला. त्या ताऱयाचा वेग प्रकाशाच्या 15 टक्के म्हणजे सेकंदाला 45 हजार किलोमीटर एवढा होता. या ताऱयाचा अभ्यास करताना या ‘तारासदृश’ अवकाशस्थ वस्तूला ‘किंतारा’ किंवा ‘क्वेसार’ (क्वासी स्टेलर) असे नाव ठरविण्यात आले. आतापर्यंत अशा सुमारे 3 ते 4 हजार क्वेसारचा शोध लागला असून अजूनही विश्वातील कितीतरी गोष्टी आपल्याला ‘गूढ’ वाटाव्या अशाच आहेत.

अशा दूरस्थ खगोलीय वस्तूंचा अभ्यास अधिकाधिक विकसित होत गेला की, आपल्याला विश्वरूप जास्तीत जास्त समजेल. ते पूर्णपणे समजले असे मात्र होणे कठीण. कारण विराट विश्वातील अनेक गोष्टींचा मागोवा घेण्याची यंत्रणा विकसित होत गेली की, ‘नवे’ (म्हणजे विश्वातील जुने) काही सापडते. संशोधनाला मात्र त्यातून नवी दिशा मिळते एवढे खरे!

आपली प्रतिक्रिया द्या