
>> महेंद्र पाटील
सुने झाले असते उन्हाळे तुझ्या माझ्या मनातले. भेटलो असतो, बोललो असतो तेव्हा चार शब्द काहीतरी आणि चालत गेलो दूर त्या वाटेवर एकमेकांचा हात हातात घेऊन क्षितिजाच्याही पल्याड जाऊन शोधत राहिलो असतो आपणच आपल्या मनाचे किनारे कधीतरी, पण ती वेळ आली नव्हती, कधी कधी खूप गोष्टी आपल्या हातात असतात. अगदी आपल्या समोर असतात. म्हणून आपण निवांत असतो आणि आपल्याला वाटतं असतं, कुठे जाणार आहेत हे क्षण…इथेच तर आहेत आपल्या भोवती. असंच काहीसं आपल्या बाबतीत झालं. तुझी ओळख झाली आणि छान मैत्री झाली आपली, खरं तर मैत्रीच्याही पलीकडे आपलं नातं सुरुवातीपासून होतं का? कसं? ठाऊक नाही, पण सुंदर नातं निर्माण झालं होतं आणि जे आपल्या दोघांनाही आवडत होतं, बऱयाच भावना अबोल होत्या आपल्या, पण तरी आपल्यात एक खूप वेगळा संवाद होता, ओढ होती आपल्याला एकमेकांशी बोलण्याची, एकमेकांना भेटण्याची आणि आपण एकमेकांच्या मनाचा थांग घेऊ पाहत होतो, चालत होतो आपण वेगवेगळ्या वाटेवर आणि कधीतरी त्या दोन वाटा एकत्र येऊन आपण एकाच क्षितिजावर भेटू असं दोघांना वाटत होतं, पण आपण चालत राहिलो निरंतर आपआपल्या वाटेवर, पण खूप दूर दूर चालत गेलो तरी आपल्या वाटा एकत्र येतील असं वळण कधी आलं नाही…आज येईल, उद्या येईल याची वाट पाहण्यात खूप वेळ गेला आणि नंतर मनाचासुद्धा दुरावा वाढत गेला आणि सगळंच बदलत गेलं.
जरी तू वेगळ्या वाटेवर चालत होतीस तरी तुझं मन मला विसरणार नाही याची खात्री होती मला, कारण मी तुझ्या मनाचा विचार कायम करत राहिलो, आणि आता अशी वेळ आलीये की तुझं मन मला विसरलं नाहीये, पण ते जुनी ओळखसुद्धा देत नाहीये, ते जुने क्षण , त्या जुन्या आठवणी, त्याच जुन्या आणाभाका ह्या सगळ्या गोष्टी मी मनात साठवून ठेवल्या होत्या, आपलं रस्ता एक होईल तेव्हा बोलण्यासाठी त्या क्षणासाठी, आता काही अंतर पुढे चालत गेल्यावर कदाचित आपले रस्ते एकत्र येऊन समोर येऊ आपण, पण ती तीच ओळख घेऊन समोर येणार असशील तर अर्थ आहे. नाहीतर आजवर पाहिलेली वाट, मनात जपून ठेवलेली हुरहूर…सारं काही व्यर्थ आहे.
तू तुझ्या वाटेवर एकटी चालत असताना कोणती वळणे आली माहीत नाही. खूप प्रश्न पडले आहेत माझ्या मनाला…खरं तर ज्या वाटा एकत्र यायच्या असतील त्यांनी वेळीच एकत्र यावं, कारण वेगवेगळं चालताना खूप वेगवेगळे बरे वाईट अनुभव येतात आणि आपण त्याच गोष्टी मनात धरून पुढील वाट चालू लागतो, खरं तर वाईट अनुभव आले तर त्याच वळणावर ते सोडून पुढे जायचं असतं, पण आपल्याला दुख: कुरवाळत बसायची सवय असते ना, तेच तू करतेस आता ..आणि मला हा रस्ता संपताना एक जाणीव झाली आहे की, कधीही आपल्या समोर आलेले क्षण पकडून ठेवायचे, आपल्याला आवडणाऱया गोष्टी जपून ठेवायच्या, आपल्या मनात आलेले विचार तेव्हाच बोलून मोकळं व्हायचं, नाहीतर वेळ निघून जाते आणि हताश होण्यापालीकडे आपल्या हाती काही उरत नाही. आता हे बोलता बोलता मला काही अंतरावर एक नवं क्षितिज दिसतंय. कदाचित तुझी पावलं चालत येतील तिथवर माझा शोध घेत आणि माझी पावलं चालत येतील. तुझा शोध घेत…समोर येऊच आणि पाहूया काय ठरवलं आहे नियतीने आपल्या बाबतीत…
?कदाचित आपण एकमेकांचा हातात हातात घेऊन क्षितिजाच्या पल्याडसुद्धा जाऊ. कदाचित आपणच एक क्षितिज होऊ …वेळच ठरवेल सगळं काही, पण मी मात्र मनाशी पक्क ठरवलं आहे …आता जे क्षण समोर येतील त्यांना निसटू द्यायचं नाही…ती वेळ हातातून जाऊ द्यायची नाही…कारण कदाचित माझ्या मनातील ही हुरहूर आणि बेचैनी आतून मला सांगते आहे, जगून घे आता तू. “हीच ती वेळ आणि हाच तो क्षण”






























































