कवडसे- निमित्तमात्र

>> महेंद्र पाटील

आपल्या आयुष्यात कधी कधी काही भेटी अकल्पित असतात. त्या भेटींचं निमित्त काहीतरी वेगळं असतं. तसं काहीसं आपल्या भेटीचं झालंय. ज्या वळणावर आपली ओळख झाली ते वळण अनोळखी होतं. तुझ्या माझ्यासाठी, पण तरीही आपली ओळख झाली. ओळख झाली तेव्हा ही ओळख का झाली हे ठाऊक नव्हतं. तरीही आपण त्या अनोळखी वळणाहून दूर दूर चालत गेलो. ओळखीच्या वाटा शोधत आणि एक दिवस आपण एका निवांत ओळखीच्या वळणावर एका निवांत दुपारी भेटायचं ठरवलं. वेगवेगळ्या वाटेवरून प्रवास करत आपण दोघेही पोहोचलो त्या वळणावर. जिथून एक नवा अध्याय सुरू होणार होता, आपल्या मैत्रीचा. आपण सामोरासमोर बसून बोलत राहिलो.

आपण ज्या निमित्ताने भेटलो होतो, त्यावर चर्चा करता करता अचानक काही विषय बोलू लागलो. योगायोगाने ते विषय आपल्या दोघांच्याही मनाच्या आवडीचे होते. वेळ हळूहळू पुढे सरकत होती आणि आपल्या गप्पांचा ओघ तसाच कायम होता. दोघांच्याही मनातील आयुष्यातील जाणिवा-उणिवा एकमेकांना सांगून एकमेकांच्या मनाचा थांग घेऊ लागलो होतो. बोलता बोलता संध्याकाळ कशी झाली, समजलंच नाही. संध्याकाळी तुला तुझ्या घराच्या वाटेवर सोडून मी परतीच्या वाटेवर निघालो. जाता जाता तुझे शब्द आठवत होते. तुझ्या निष्पाप, निरागस डोळ्यांतील स्वप्नं मलाही दिसू लागली होती. तुझ्या आयुष्यातील कोंडी संपून लवकरच तुझी स्वप्नं खरी व्हावीत असं मनोमन वाटू लागलं होतं मला, पण तुझा प्रवास खडतर होता. एकीकडे तुझ्या आयुष्यातील कटुसत्य, तर दुसरीकडे मनातील गोड स्वप्नं यांची सांगड घालताना तुझा जो काही खडतर प्रवास होतो, त्या प्रवासात मी तुझा सहप्रवासी नसलो तरी साथ द्यायचं ठरवलंय मी आता.
आपल्या भेटीपूर्वी अतिशय शांत असलेलं माझं मन आता तुझी काळजी घेऊ लागलं होतं. तुझ्या मनातले सारे प्रहर जाणून घेऊन त्यांना जपावं ही धडपड सुरू झाली होती माझ्या मनात. काही दिवस आपण खूप छान बोललो. एकमेकांच्या मनाचा खोलवर थांग घेत राहिलो आपण. आता तुझा प्रवास नित्यनियमाने सुरू झाला आणि त्या क्षणापासून आपलं बोलणं कमी होत गेलं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलणं होत होतं आपलं. पुन्हा बोलणं होईपर्यंत मधला जो काही वेळ होता, तेव्हा मनात अनामिक हुरहुर दाटून येत होती. कुठेतरी मन आतल्या आत तुझी वाट पाहत होतं.

मी चालत निघालोय दूरवर हा विचार करत की, कधी कधी काही भेटी, काही ओळखी या सहज होत आहेत असं वाटत असलं तरी त्या सहज नसतात. माझ्या मनात निर्माण होणारी हुरहुर हेच सांगू पाहत आहे की, आपली भेट ही सहज नसून विधिलिखित असावी. तुझं स्वप्न कदाचित पूर्ण करता करता, आयुष्यातले काही कडवट सत्याचे बंध सैल करता करता मी माझ्या वाटेवर चालत राहीन. तूही तुझ्या वाटेवर चालत रहा. कदाचित पुन्हा अनोळखी वळणावर मला तू भेटशील एक नवी ओळख घेऊन आणि त्या क्षितिजावर मी उभा असेन तुझ्या डोळ्यांतलं स्वप्न माझ्या हाताच्या ओंजळीत घेऊन. तेव्हा जाणीव होईल, कधी कधी काही भेटींचं निमित्त हे कधीच आपण ठरवू शकत नाही. ते नियतीने ठरवलेलं असतं. आपण फक्त निमित्तमात्र असतो…

[email protected]