
>> महेंद्र पाटील
आता तुझ्या शब्दांनी नको पुन्हा घायाळ होणे,
आता तुझ्या शब्दांनी नको मला हे दूर नेणे…
या ओळी मनात हळूहळू घर करू लागल्या होत्या. ऐन संध्याकाळच्या प्रहरी अशी उदास गाणी माझ्या मनात का घोळू लागली? तुझ्या ज्या शब्दांवर एकेकाळी मन आनंदी असायचं, ज्या शब्दांनी मला सावरलं, माझ्या भावनांचं वादळ ज्या शब्दांनी आवरलं, माझ्या मनातले अनेक तप्त उन्हाळे शांत करणारे तुझे शब्द आज का परके वाटू लागलेत? ज्या शब्दांनी मला इथवर आणलं, ज्या शब्दांनी मला एक नवी पहाट दाखवली, ज्या शब्दांनी माझे प्रत्येक प्रहर सजवले, माझ्या प्रत्येक क्षणाला सुखी केलं. सगळं जग एकीकडे विरोधात उभं ठाकलं असताना, तुझे शब्द खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. त्यांच्या या आपलेपणामुळे मला त्यांचा लळा लागला आणि त्या शब्दांच्याच आधारावर मी माझं पुढचं आयुष्य जगण्याचा निर्धार केला.
आयुष्याच्या वाटेवर… तुझा एक-एक शब्द माझ्या सोबतीला येऊन माझा प्रत्येक दिवस सुखी करून गेला. माझ्या प्रत्येक प्रवासात, प्रत्येक वळणावर हे शब्द माझ्या पाठीशी होते. त्यामुळे एकटा असूनही कधी एकटं वाटलं नाही मला. माणसं उगीच आयुष्यात एकटेपणाचा बाऊ करतात आणि स्वतःला एका बंदिस्त कोषात बांधून ठेवतात. एकटेपणा, एकांत म्हणजे एक शाप वाटू लागतो त्यांना. आपल्या एकाकी आयुष्याचं रडगाणं गात बसतात, पण खरंच आपण एकटे असतो का? आपल्या मनाने जर ठरवलं तर हा एकटेपणा आपल्याला कधीच जाणवणार नाही. कारण मनाचा पसारा इतका मोठा आहे, त्यात जरा डोकावून पाहिलं तर अवघं विश्व साकारलेलं असतं. मातीच्या कणासारखे आठवणींचे असंख्य कण, श्रावणाच्या सरीसारखे अश्रूंचे ओले सण, आजवर सहन केलेल्या दुःखाचा डोंगर, मनात जपलेल्या आठवणींचा महासागर, काळजात खोलवर गुदमरलेल्या भावनांचा डोह, मायेचा झरा, प्रेमाच्या सावल्या, प्रगतीच्या वाटा, प्रवासातील वळणं आणि नव्या स्वप्नांचं उत्तुंग आभाळ… त्या आभाळात भरारी घेण्यासाठी आपल्या मनाला दिलेली विलक्षण कल्पनाशक्तीचे पंख! इतकं सगळं सुंदर विश्व आपल्या मनात रुजलेलं असतं.
पापण्या मिटल्या की, क्षणार्धात हे विश्व आपल्या डोळय़ासमोर उभं राहतं आणि आपण या विश्वात कुठेही कसेही जाऊन भ्रमण करू शकतो. मनात येईल त्या आठवणींशी गप्पा मारू शकतो किंवा मनात जतन केलेली एखादी खंत पुसून टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. खोल डोहात गुदमरलेल्या भावना अलगदपणे आपल्या ओंजळीत घेऊन एखादी मायेची हळुवार फुंकर घालून त्यांना एक मोकळा श्वास घ्यायला शिकवू शकतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपलंच एखादं हळवं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नव्याने करू शकतो. मनात सलणाऱया काही गोष्टी एकेक करून बाहेर काढत त्यांना प्रेमाच्या सावलीत घेऊ शकतो. आयुष्याच्या वाटेवर चालता चालता आपणच आपल्याला कुठल्या तरी वळणावर हरवून बसलेलो असतो. आपले हरवलेले हेच क्षण आपण पुन्हा नव्याने शोधू शकतो. अशा कित्येक गोष्टी आपल्याला एकांतात करता येण्यासारख्या असतात, पण आपण त्या न करता उगीचंच जुन्या आठवणींशी खेळत बसतो. मग आपल्याला नेहमीच सुख देणाऱया आजवर आपल्याला जपत आलेल्या गोष्टी काही काळापुरत्या दूर गेल्या की, आपल्याला एकटं वाटू लागतं.
खरं तर ही एक अशी वेळ आहे की, ज्या वेळेत आपल्याला आपली ओळख पटते. सभोवतालच्या गर्दीत रमताना आपण आपल्याला कुठेतरी हरवून आलोय आणि इथून पुढे कुठे जायचं या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त एकांतातच मिळू शकतात. म्हणून एकांतात दुःख करत बसण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करावी. त्यावेळी आपणच आपली ओळख शोधावी, पण चंचल मन विनाकारण स्वतःहून स्वतःलाच या एकटेपणात गुरफटून घेतं आणि उगीचंच कारण नसताना उदास होऊ लागतं. माझ्या मनाचंही बहुधा असंच काहीसं झालं असावं. कारण गेल्या कित्येक दिवसांत माझे शब्द हे माझ्या मनाचे आधारस्तंभ होते. मनाला वाटेल तसं, वाटेल तेव्हा हे शब्द मदतीला धावून यायचे, पण गेल्या काही दिवसांत संध्याकाळच्या प्रहरी माझ्या लेखणीतून कविता उतरली नाही. त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं असावं आणि आता माझे शब्दच मला दिसेनासे झाले आहेत. नेहमी साथ देणारे हवेहवेसे वाटणारे माझे शब्द, माझ्या कविता आता नकोशा वाटू लागल्या आहेत. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी माझ्याच मनातले काही शब्द वेचले…
आता तुझ्या शब्दांनी
नको पुन्हा घायाळ होणे,
आता तुझ्या शब्दांनी
नको मला हे दूर नेणे.
मला सखे तुझ्यासवे
दूर दूर जायचे गं
उदास सांज वेळी
मला तुझेच गीत गायचे गं…