कवडसे – विधिलिखित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील 

आपल्या आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या आधीच लिहिलेल्या असतात असं आपण म्हणतो. आपण प्रयत्न करत असलेल्या गोष्टी कधी कधी आपल्याला साध्य होत नाहीत किंवा आपण ज्या क्षणांची वाट पाहतो ते आपल्याला भेटत नाहीत. यावर आपलं मन म्हणतं की, आपल्या नशिबातच नाही त्याला आपण काय करणार? पण विचार सुरूच असतात. सुखदुःखाच्या गर्दीत हरवलेलं आपलं मन सावल्या शोधत असतं. पण कधी अचानक वाऱ्याची एखादी झुळूक येते आणि मनाला काही क्षणांचा गारवा देऊन जाते. योगायोगाच्या गोष्टी आणि नशिबाच्या रेषा आपल्याला काही वेळा आवडतात आणि काही वेळा पचणाऱ्या नसतात. अशाच दोन मनाच्या योगाची गोष्ट या क्षणाला डोळ्यासमोर येत आहे.

एक वेडं मन आपल्या विश्वात रममाण असतं आणि सुंदर क्षण जगत असतं. त्याची एका दुसऱया मनाची सुंदर मैत्री जमते. त्या जगात ते सुखी असतात. एकमेकांसाठी जन्माला आली आहेत असं त्यांना पाहून वाटतं. त्या दोन मनांनी एकत्र संसार थाटायचा ठरवलेला असतो. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असते. बरीच वर्षं एकत्र एकमेकांच्या मनाला आधार देऊन जगणारी दोन मनं आता एकरूप होण्यासाठी आतुर असतात. काही दिवस उरलेले असतात आणि एक दिवस अचानकपणे कोणताही अंदाज न देता वादळ घोंगावत येतं तसं त्या दोन मनांपैकी एका मनाच्या आयुष्यात आलं. त्या वेडय़ा मनासमोर एक नवीन मन उभं राहिलं आणि त्या दोघांची मैत्री अचानकपणे झाली. त्या मनांच्या जोडगोळीमधलं एक मन हळूहळू नव्या मनाच्या संपर्कात येऊ लागलं आणि इथे सुरू झाली गोष्ट मनाच्या नशिबाची. नियतीने लिहिल्याप्रमाणे सर्वकाही घडू लागलं. इतकं छान नातं निर्माण होऊ लागलं त्या दोन मनांचं. यात आधीचं मन एकटं होतं त्याला काही कल्पनाही नव्हती. ते येणाऱया दिवसांच्या तयारीत मग्न होतं आणि दुसरं मन हरवून गेलं नव्या मनाच्या नव्या विश्वात. पण हे हरवून जाणं कायमचं नव्हतं. कारण आपल्या जोडीदाराला विसरून त्याला नवीन मनाची संगत करायची नव्हती. नवीन मनालासुद्धा जपायचं होतं. अशी कोंडी त्या मनाची झाली. ती कोंडी नसून एक वेगळय़ा मनाचं नातं समजून त्याने सर्वकाही जपलं. एकाच वेळी दोन मनाचं प्रेम, रुसवा, दोन मनांचे हट्ट आणि दोन मनांचे सारे ऋतू जपलं. त्या नवीन मनाला कळत होतं त्या दोन मनांच्या विश्वात, त्यांच्या गोष्टीत आपण आलोय. त्यांच्या विश्वाला आणि विश्वासाला जपत ते मन त्या गोष्टीत आपल्या वाटेला आलेल्या क्षणांचा शोध घेऊ लागलं. त्यांना जपून ठेवू लागलं वेडय़ासारखं…

एकदा त्या मनाने आपल्या नव्या मित्राला जुन्या मित्राची ओळख करून दिली आणि ते जुनं मन काहीसं गोंधळलेल्या अवस्थेत का होईना, पण भेटून थोडं शांत झालं. मग सुरू झाली त्या तीन मनांची गोष्ट… आधीची दोन मनं ठरल्याप्रमाणे एकरूप झाली आणि त्या क्षणांचा साक्षीदार नवीन आलेलं मन झालं. नवं मन हळूहळू गतकाळातल्या आठवणी उराशी घेऊन जगू लागलं. त्याने आपली वाट बदलली. त्या मनाला असं वाटत होतं आपण या दोन मनांच्या गोष्टीत नको यायला. आपण आपली वेगळी वाट शोधूया आणि एक वेगळं विश्व निर्माण करूया. पण त्या मनाशी झालेली मैत्रीमुळे ते मन कायम आसपास राहायला लागलं. एक दिवस मनाला असं वाटलं की कदाचित त्या मनाशी झालेली आपली मैत्री काही क्षणांची होती किंवा तो चकवा असावा.

आता किती दिवस त्या आठवणी कुरवाळत जगायचं. त्यापेक्षा मनाचं नातं असं नसतं अशी आपण आपल्या मनाला समजूत घालायची आणि त्या सर्व आठवणीतून बाहेर पडायचं. मनाने पूर्ण तयारी केली आणि हळूहळू बाहेर पडू लागलं. त्यावेळी ललाट रेषा जाग्या झाल्या. त्याच्या मनाशी मैत्री केलेलं वेडं मन पुन्हा एकदा समोर आलं. आपण ठरवून आपल्या नात्यामध्ये कधीच काही बदल होणार नाही, कारण त्या नात्याची गुंफण आपण केली नसून त्या नियतीने केलेली आहे. ही स्वरचित गोष्ट नसून आपल्या ललाटी लिहून ठेवलेला तो एक योग आहे. या योगाची वेळ जशी जशी जवळ येऊ लागते तसं त्या जोडीतले मन बेचैन होतं. कारण त्याला वाटू लागतं की आपल्या जोडीदारावर आपण अन्याय करतोय आणि आपण असं कसं करू शकतो? पण त्याला हे ठाऊक नसतं, या जगात जन्माला येताना जो तो आपलं एक नशीब घेऊन जन्माला येतो. त्यामुळे आपल्या वाटा जरी सारख्या असल्या तरी आपल्याला कुठल्या वळणावर थांबायचं हे आपणच ठरवितो किंवा आपलं मन. मग का ही बेचैनी? या सर्व घुसमटीतून काहीच साध्य होणार नसतं. एकीकडे आपल्या जोडीदाराचं मन जपत दुसरीकड नव्या मनाचा सखासुद्धा आयुष्यात हवा असतो. पण त्या सख्याच्या मनातली भावना, त्याला असणारं प्रेम आणि त्याने आपल्यासाठी जगलेल्या जागवलेल्या रात्री ह्या सर्व गोष्टीचा हिशोब करता येण्यासारखा नसतो. या तीन मनांच्या चेहऱयाकडे पाहिलं तर असं वाटतं की यांचं आयुष्य म्हणजे जोडसाखळीचा खेळ आहे जणू! एका मनाचा हात हातात घेऊन पळत राहायचं आणि आयुष्याच्या रंगपटावर बाद व्हायच्या आत आपल्या सख्याने हात हाती घेऊन आपल्याला बाद होण्यापासून वाचवावं. पण एका जोडीतली मनं आपल्या जोडीदाराचा हात सोडू शकत नाहीत. काही क्षणांकरता का होईना, तो बाद होईल अशी भीता बाळगली तर… या खेळाचा डाव इथे संपत नाही. तो असाच अविरतपणे सुरू राहणार. एक वेडं मन दूर जातंय. ललाट रेखा पुसून टाकूया असं म्हणतंय आणि त्या मनाला त्याचा सखा सांगतोय की या रेषा कधीच पुसता येत नाहीत. पण ऐकतंय कुठे? त्या रेषा पुसल्या जाव्या म्हणून दुरावा, अबोला सर्व काही त्या दोन मनात आहे. बघूया आता पुढे काय होतंय? टाळू म्हटलं तर टाळता येत नाही. त्यालाच विधिलिखित म्हणतात!!

[email protected]