कठीण झालेलं सोपं जगणं

290

>> मलिका अमरशेख

‘मला जगायचंय्’…

‘मला जगायचंय्’…

‘At any cost मला जगायचंय्’…

खूप सोप्पं असतं जगणं… आपण ते खूप कठीण करून ठेवलंय्…

जगभरातल्या कोटय़वधी घरातून भिंतीतून छपरातून हॉस्पिटलच्या औषधांच्या उग्र दर्पातून कर्कश आरोळय़ांचे पडसाद… ‘मला जगायचंय्’…

रहावेचना… त्या किंकाळय़ा… ते आक्रोश… ते रडणं… त्या यातना हाडं फोडून काढणाऱया… ते रक्त… त्या जखमा… बुब्बुळ बाहेर पडणारे तारवटलेले डोळे… न् फक्त असहायता… शरीर जातानाची… न् ते जाणं फक्त बघण्यातली असहाय अपरिहार्यता…

…मी झडाडून उठलो… पाहय़लं… एक छोटसं हिरवंगार बेट होतं… एकलकोंडं… अनाथ बालकागत… मी ते घेतलं… हो… कुशीत घेतलं… समुद्रानं आधीच चारी बाजूंनी मस्त कवेत घेतलेलं…

हिरवीगार कुरणं… मऊ मऊ पुळणं… छोटी फुलं पांघरावीत गालिच्यागत तशी स्टारफुलं पांढरीशुभ्र त्या पुळणीवर…

समुद्राचं पाणी इतकं निळंशार की आतल्या गूढ गहन तळातले पांढरेशुभ्र दगडगोटे… मंद लहरणारी प्रवाळं… सोनेरी… निळे… नारिंगी चमकणारे सुळसुळणारे मासे… सगळं स्पष्ट दिसणारं… निवळचंग पाणी थंडगार… स्वच्छ निळय़ा आभाळाचं प्रतिबिंब असं पडलेलं की जणू एखादं पाळण्यात पहुडलेलं तान्हं मूल हसतंय् आईकडं बघून हातपाय उडवत!

मी तिथल्या जंगलात हिंडलो… सगळय़ा झाडांचा – माश्यांचा – पशुपक्ष्यांचा सर्व्हे केला. त्या सर्व्हे करणाऱया कुणालाही तिथं तंबाखू – धूम्रपान – मदिरा या सर्वांचा मज्जाव केला. त्यामुळे काम झाल्या झाल्या सगळय़ांनी पोबारा करून तिथलं प्रदूषण कमी केलं.

ज्यांना खूप खूप खूप खूप जगायचंय् न् आरोग्यपूर्ण चांगलं जगायचंय् त्यांची मी यादीच मागवली. माझ्या काही महत्त्वाच्या अटी होत्या.

मी त्या बेटावर पर्यावरणपूरक घरं बांधून घेतली होती. त्यात प्लॅस्टिक वा कुठल्याही रासायनिक वस्तूंना मनाई& होती. अगदी गॅसवर चालणारा स्टोव्हपण नाही. वीज नाही. धूर नाही. झाडाचं पानपण तोडायचं नाही. या जमिनीत स्वतःच्या घरापुढं प्रत्येकाला एक छान सुपीक जमीन मिळणार होती. त्यात प्रत्येकानं आपल्याला आवडणारा भाजीपाला  उगवायचा न् खायचा.

जे ज्येष्ठ असतील त्यांची काळजी त्यांच्या घरातील तरुण माणसं घेतील. नाहीतर या बेटावरची संरक्षक फळी म्हणून कार्यरत असणारी माणसं त्यांची सर्वतोपरी काळजी घेतील. औषधउपचार – पथ्यपाणी यासाठी त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

औषधोपचार मोफत – जेवण – नाश्ता सर्व काही प्रेमासहित – माणसांची – वृक्षांची – पशुपक्ष्यांची – हवेचीही काळजी घेणारी ही वसुधैवकुटुंबकम् संस्था असेल. यात तामसी लोकांना प्रवेश नाही. मात्र सर्व प्रकारचे पशुपक्षी, प्राणी, मासे, जलचर यांना मुक्त प्रवेश आहे. त्यांची इथे शिकार होणार नाही असे अभयदान आहे.

थोडक्यात म्हंजे अर्ध आदिम अर्ध नागरी अर्धग्राम्य जीवन जगायचं होतं. ज्यामुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ, खरं सौंदर्य न्  खरं महत्त्व कळणार होतं…मानव्याचा जीवनाचा खरा अर्थ काय?

मुळात अर्थ न शोधताही सुंदर जीवन जगता येतं हेच मूळ खरं सत्य आहे शाश्वत असंही…

विकास… याचा अर्थ काय? स्वतःपासून अन् आपल्या माणसांपासून दूर जाणं? निसर्गापासून दूर जाणं? स्वच्छ हवेपासून, स्वच्छ पाण्यापासून दूर जाणं? कृत्रिम खाणं-पिणं-हवा यावर अवलंबून रहाणं? अन्न-वस्त्र्ा-निवारा याबाबत तडजोडी करत मिळेल ते गलिच्छ प्रदूषित भेसळयुक्त यंत्रानं बनवलेलं अन्न खाऊन भयंकर आजार ओढवून घेणं?

मन – शरीर – घर – कुटुंब – समाज – परिसर हे सर्व आपल्यातले व आपल्याभवतालचे आधिभौतिक वातावरण जोवर ते सुदृढ निरामय आरोग्यदायी होत नाही तोवर काहीच होणार नाही  मनापास्नच सुरुवात करू… मन – हे एक बेटच! संपूर्णतः आपल्या मालकीचं! शरीर त्यावरही आपली मालकी कुटुंब… मनात आणलं तर चांगल्या स्वस्थ गोष्टी आणू शकतो.

समाज… परिसर… हा एकच प्रॉब्लेम की जे आपण पूर्णतः अमलात आणू शकत नाही. पण प्रत्येकजणानं मन हे बेट मानून चांगल्या गोष्टी केल्या की प्रत्येकच परिसर न् समाज पर्यायानं हळूहळू बदलत जाईल! मायक्रोओव्हन – सेलफोन – टीव्ही याशिवाय आपण राहू शकतो. पण सकाळचं प्रसन्न कोवळं ऊन – पाऊस – पाणी याशिवाय आपण नाही राहू शकत.

कॉम्प्युटरसमोर बसा पाच-सहा तास – न् मग सकाळच्या कोवळय़ा उन्हात मऊ पुळणीवर अंग पसरा – खोल श्वास घ्या… किंवा – मुसळधार पावसात छत्री फेकून भिजा मनसोक्त किंवा उभे रहा धबधब्याखाली निवळचंग आवेगात कोसळत्या प्रेमळ प्रपाताखाली…

करू शकताय् तुलना?

किंवा मॅकडोनाल्डचा पिझ्झा बर्गर – फ्रीजमधलं गारढोण दोन दिवसांपूर्वीच अन्न न् गरम गरम तव्यावर शेकलेली भाकर न् तव्यातली मेथीची भाजी – लसणाची चटणी… करू शकताय् तुलना?

आपल्याला फटाफट सुखसोयी पाहिजेत. मायक्रोओव्हन मधल्या जेवणासारख्या…

असं असेल तर मरणपण फटाफट् मिळेलच!

मग नाही म्हणायचं… ‘जगायचंय् मला… जगायचंय्. ‘At any cost’. जगायचंय् …

असं तर कायम जगातल्या सर्वच बायका म्हणतात – गर्भात असल्यापास्नं. तुम्ही कुठं ऐकताय्? त्या सर्व बायका गर्भात असल्यापासून किंचाळतायत् आक्रंदन करतात.

‘जगायचंय्  मला… मला जगायचंय्… ‘At any cost’….

ऐकताय् तुम्ही? का तुम्हीही बहिरं व्हायचं नाटक करणार आहात?

कुठंवर?

का बेटावर यायचं ठरवतायत्?

ठरवा पटकन् काय ते!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या