
>> मलिका अमरशेख
ज्या घरात लेकराला गुलाम आणि आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन न समजता त्याच्या पंखांना बळ देत त्याला हव्या त्या आकाशात उडण्याचं स्वातंत्र्य देतं ते घर.
घर! सर्वांचं सुखनिधान, सुरक्षित, उबदार. बापाच्या भक्कम खाद्यासारख्या भिंती, वर आईच्या मायेसारखं सावली देणारं छप्पर… कानाकोपऱयात लपलेल्या आठवणी, घरातल्या प्रत्येक वस्तूत कोन्यात, कपाटात कितीतरी कडूगोड, आंबट आठवणी. शाळा सुटल्यावर मुले धूम पळत सुटतात ते थेट घरी. थोडं मोठं झाल्यावर म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रमैत्रिणींच्या घरी, कधी त्यांच्या मनातल्या घरात वेळ घालवतो. मन म्हणजे पण घरच की. अनंत दृश्यअदृश्य खोल्या असलेलं. तर चाकरमानी नोकरीवरून तुफान गर्दीत लढाई लढणाऱया सैनिकाच्या आवेशात घुसून कधी धावती ट्रेन पकडून लोंबकळत जिवाच्या कराराने प्रवास करून जातात ते घरीच जाण्यासाठीच.
हक्काचं घर असावं यासाठी काडी काडी जमवून पैसे जोडतात. घर सोडून जाताना मुली रडतात. खरंतर ज्या घरी जाणार असतात तेपण घरच असतं. पण या घरात आईबाप, भाऊबहीण, लहानपणाच्या स्मृती, सासरी काय झाल्यावर डोळय़ातलं पाणी लपवत आठवते ते माहेरचं घरच.
स्त्री असा, पुरुष प्रत्येकाचं प्रथम प्राधान्य असतं ते घराला. अगदी झोपडी असो, पण तिला स्वच्छ सारवतील… आदिवासी पाडा असेल तर वैशिष्टय़पूर्ण रांगोळय़ा काढून ती सजवतील. तर शहरातला आधुनिक फ्लॅट असो, सणवाराला सजवणार. दिवाळीला तर खासच! आकाशकंदिलाने चमचमणाऱ्या दीपमाळा, पणत्यांनी उजळून लखलखणारं न् दारातल्या रांगोळीनं सजलेलं घर आतून छान खमंग गोड करंज्या, लाडवाचा वास तर शेवचिवडा -चकल्यांचं आमंत्रण. आत धावपळ करणाऱ्या नटलेल्या सुंदर गृहिणी, बाहेर फटाके, फुलबाजे पाऊस लावत नव्या कपडय़ात आनंदात हसत उडय़ा मारणारी बच्चे कंपनी. किती छान दृश्य असतं ते. काही बिल्डिंग सोसायटय़ा सगळे ठरवून एकसारखे कंदील लावतात. रात्री ती इमारत किती सुंदर लखलखत हसत असते. सगळं शहरच सुंदर नटलेली नवरी वाटते.
तर या संकल्पनेची सुरुवात झाली गुहेपासून. नखं, दाढीमिश्या वाढलेली, थंडीवाऱयाचं रक्षण म्हणून पानं, झाडाच्या साली गुंडाळलेली, दगडांची शस्त्र घेऊन शिकार करणारे आपले पूर्वज पाऊस, वारा, वीज यांचं कार्यकारण न समजून घाबरणारे पण गुहा सापडल्यावर त्याचा निवारा घेत आसरा घेत. इथं दडलं तर पाऊस, वारा, थंडी व वीज या भयंकर गोष्टींपासून वाचता येतं हे कळल्यावर तो तिथे राहू लागला. पण मग प्रत्येकाच्या टोळीला गुहा अपुरी पडल्यावर टोळीयुद्ध सुरू झाली. मग त्यातूनच लाकडाच्या वाळक्या फांद्या, पाने, मोठाले दगड याचा घर म्हणून वापर करून निवारा करू लागले आणि मानवी बुद्धीनुसार वर्षांनुवर्षं, शतकानुशतपं त्यात बदल, भर पडत गेली. सतत सोय आणि सुविधा हे माणूस पाहत आलाय. काय आहे आणि काय असावं यातला फरक माणूसच जाणू शकतो.
आता तसं पाहिलं तर पक्षीही घरटी सुंदर, सुबक विणतात. कोटय़वधी फेऱया मारत फक्त चोच हे एकमेव साधन असतानाही त्यांचं कौशल्य अफलातूनच. गवळणीचं घरटं. बहिणाबाई म्हणतात तसे –
‘‘अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला
तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ
तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं’’
काही पक्ष्यांची घरटी तर मजबूत मातीची लिंपून केलेली. त्यातही पानं, मऊ कापूस, मऊ गवत असे पिलांना रुपू नये म्हणून मऊ गादी असं कल्पक काम इवलेसे पक्षी करतात. याचं आश्चर्य आणि प्रत्येक पक्षाची याबाबतची उपजत बुद्धी हे निसर्गाचं अद्भुतच!
म्हणजे नुसतं स्वसंरक्षणच नाही तर आपण जिथं राहतो ते घरटं उबदार, सुरक्षित तसंच ते शत्रूपासून संरक्षित ठिकाणीही असावं याचाही ते विचार करतात. तर झाड आपण अतिदुय्यम सजीव समजतो पण तेही विचार करतं! घटपर्णी! जे कीटक आत आल्यावर घटाचं पान बंद होतं. कीटक आत मरून जातो न् त्या कीटकाचा अन्न म्हणून ते झाड त्याचा वापर करतं. एका झाडाला काटे असतात. पण त्याचा वास व रंग याला भुलून कीटक आत जातो न् अडकतो. माणसासारखे हात, पाय व बुद्धी मेंदू नसतानाही एका जागी राहूनपण झाड त्याचे खाद्यं मिळवतं न् परागकणातून पक्ष्यांकडून, पुनरुत्पादनही करतो. ही साखळी खरोखरच चमत्कृतिपूर्णच!
गोगलगाय तर पूर्ण घरच पाठीवर घेऊन चालते. कासवही. शंखात राहणारे जीव तर विशेषच. तर कोळी हा तलम नाजूक जाळ विणतो. तो स्वतःच्या अंगातल्या द्रवापासून इतकं विशेष जाळं विणतो की तो स्वतः तुरुतुरु चालतो. त्यात स्वतः अडकत नाही. बाकीचे कीटक मात्र अडकतात. रेशमाचा किडा कोश निर्माण करतो तेच त्याचं घर. न् बाहेर येतं ते सुंदर फुलपाखरू! मुंग्यांचं वारूळ, मधमाशांचं पोळं किती विविधता घरांमध्ये. वारुळात तर आपल्या खोल्यांसारखे अनेक कप्पे असतात. उद्योगी मुंग्या पावसाआधी धान्याचा साठा करण्यात गुंग असतात. त्याबाबत त्या माणसांसारख्याच. माणसंही धान्य, पैसे, दागिने साठवून ठेवतात. काही माणसं जुन्या आठवणी, जुनी माणसं घरात साठवून ठेवतात. पिलं मोठी झाली की घरटी सोडतात. पण माणसांचं तसं नाही. घर सोडून जाताना माणसं तळमळतात, फडफडतात. अजूनही पाहा – नाइलाजानं शहराकडे कामासाठी आलेला माणूस पै पै जोडून गणपतीला, सणाला गावाकडे धावेल. जिथं जन्मलो तिथंच शेवटचे दिवस काढायलाही गावी घर बांधायचं स्वप्न बघेल. आजकाल शहरातल्या घरात फर्निचर राहतं. माणसं बाहेर, फर्निचर घरात. झोपायपुरते घरी येतात. दार बंद मनाची न् घराचीही. शेजारी कोण राहतं हे पण कळत नाही. गावात पिंवा शहरातल्या चाळीत असं नव्हतं. साखर संपली न् पाहुणे आले की हक्कानं शेजाऱयांकडून साखर मागितली जायची. न् नंतर त्याबदल्यात रात्री फ्राय मासे पिंवा अळूवडय़ा त्याच वाटीतून परत केले जाते. आजारी पडलं तरी डॉक्टरकडे जाण्याआधी शेजारच्या काकू सुंठ, काळीमिरी पूड घातलेला चहा आणून देत. तर आपला बाळू पास झाल्याचा आनंद सर्व चाळीला व्हायचा. तिथल्या प्रत्येक घराला आपलेपणाचा रंग असायचा. दाराला मायाममतेचं तोरण असायचा न् प्रेमाचे करुणेचे आकाशपंदील पेटायचे. आनंद समाधानाचे, निरांजनदिवे लागायचे. ती खरी घरं. ज्या घरात गृहिणीला सन्मान मिळतो. ज्या घरात लेकराला गुलाम आणि आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन न समजता त्याच्या पंखांना बळ देत त्याला हव्या त्या आकाशात उडण्याचं स्वातंत्र्य देतं ते घर.
बाकी नुसत्या बराकी न् गुहा! बराकी सैनिकांसाठी बांधलेल्या आणि गुहा आदिमानवासाठी. त्याला कुणी घर म्हणत नाही.
घराला घरपण घरातली स्त्री देते. घराला घरपण बाळानं केलेला पसारा, भिंतीवर रेखाटलेली अप्रतिम चित्रकला देते. ताई-दादांची लटकी भांडणंदेखील घराला घरपण देते. बापाचं राबणं न् ऐन संकटकाळी आईनं गुपचूप काढून दिलेलं स्त्री धन. स्त्रीयांचे धन चंद्रहार, चपलाहार तन्मणी नसतो. घरात हसणारे चेहरे न् तृप्तावलेली जिव्हा हे स्त्रीयांचं धन असतं. त्यावर ती जीव पाखडते आणि अशी घरं आताशा बघायला मिळत नाहीत. आहेत खूपशा सिमेंटच्या काडिपेटय़ा. ज्यात फर्निचर, फ्रीझ, वॉशिंग मशीन, डिशवॉशर राहतं. भिंतीला प्लास्टिक पेंट असतो न् प्लास्टिकचं हसणं गालावर चिटकावून लोक बाहेर पडतात.





























































