आगळं वेगळं – प्लॅस्टिक कोडस्

>> मंगल गोगटे

प्लॅस्टिकमध्ये असणारे ‘बीपीए’ (BPA) हे विषारी केमिकल; लठ्ठपणा, कॅन्सर, गर्भावर व मुलांवर होणारे दुष्परिणाम यांना कारणीभूत असू शकतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘बिना विष क्रांती’ चळवळीने प्लॅस्टिकला 1 ते 7 कोड नंबर दिले आहेत ज्यामुळे आपल्याला त्या त्या प्लॅस्टिकचे आपल्या शरीरावर व पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतात ते कळतं.

‘पाठलाग करणारे’ बाण हे त्रिकोणी चिन्ह आपण अनेक प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बघतो, पण त्याचा अर्थ ती वस्तू ‘परत वापरण्यायोग्य’ (recyclable) आहे असा होत नाही. त्या त्रिकोणात लिहिलेला आकडा खरं काय ते सांगतो. हे आकडे 1 ते 7 पर्यंत असतात आणि ते वापरलेल्या प्लॅस्टिकचा प्रकार नमूद करतात. त्यावरून कळतं की पुनर्वापर तर सोडा पण काही प्लॅस्टिक तर लगेच टाकून द्यायच्या लायकीचं असतं. तरीही अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वा पॅकिंगसाठी याशिवाय पर्याय नाही. मात्र त्याच्या आपल्या शरीरावर व पर्यावरणावर होणाऱया परीणामांबद्दल विचार केला आहे का?

हे समजण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख करून घ्यायला हवी. प्लॅस्टिकमध्ये असणारे ‘बीपीए’ (BPA) हे विषारी केमिकल; लठ्ठपणा, कॅन्सर, गर्भावर व मुलांवर होणारे दुष्परिणाम यांना कारणीभूत असू शकतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘बिना विष क्रांती’ चळवळीने प्लॅस्टिकला 1 ते 7 नंबर दिले आहेत ज्यामुळे आपल्याला त्या त्या प्लॅस्टिकचे आपल्या शरीरावर व पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतात ते कळतं. प्रत्येक प्लॅस्टिक कंटेनरच्या बुडाशी (वा कधी बाजूला वा झाकणावर) एक नंबर असतोच. प्लॅस्टिकच्या अनेक वस्तू बनवण्यासाठी जगात दरवर्षी सुमारे 9.2 अब्ज टन्स प्लॅस्टिक वापरलं जातं. शक्यतो कुठलंही प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी न वापरणंच योग्य होईल.

एक नंबर असलेले पॉलिथिलिन टेरेफ्तलेट किंवा पेट (PET वा PETE) हे रंगहीन असतं. बऱयाचशा गोष्टी पॅकबंद करण्यासाठी याचा वापर केला जातो. घर साफ करण्याच्या अनेक गोष्टी अशा प्रकारच्याच प्लॅस्टिकमधे मिळतात. तसं हे प्लॅस्टिक बरं असतं, पण हे कुठल्याही आगीजवळ असू नये. कारण त्यामुळे त्यातील वस्तूंनी कॅन्सर होऊ शकतो.

दोन नंबरचे हाय डेंसिटी पॉलिथिलिन (High Density Polyethylene) हे प्लॅस्टिक कडक असतं. दुधाच्या पिशव्या, ज्यापासून खेळणी, तेलाच्या बाटल्या अशा वस्तू बनतात. यावर पुनर्प्रक्रिया करता येते आणि प्रक्रियाही साधी आणि स्वस्त आहे. हे प्लॅस्टिक उन्हामुळे वा अतिगरम/थंड केल्याने तुटत किंवा मोडत नाही. म्हणून त्यापासून बागेतील बेंच, पिकनिकसाठी टेबलं, कचऱयाचे डबे अशा प्रकारच्या टिकाऊ वस्तू बनवल्या जातात. हे प्लॅस्टिक बागकामासाठी लोकप्रिय आहे. HDPE पासून बनवलेल्या वस्तू पुनर्वापरासाठी आणि पुनर्प्रक्रियेसाठी वापरता येतात.

नंबर तीनचे प्लॅस्टिक मऊ व लवचीक असतं. जे मुलांची खेळणी, अन्नाचं पॅकिंग, स्वयंपाकाच्या तेलाच्या बाटल्या यासाठी वापरलं जातं. शिवाय प्लॅस्टिक पाइप्स, कॉम्प्युटरच्या केबल, बागेत वापरल्या जाणाऱया रबरी नळ्या या प्लॅस्टिकने बनतात. सूर्यप्रकाश व हवा यांना ते अभेद्य असतं. हे PVC वा पॉलिव्हिनाइल क्लोराईड ‘विषारी प्लॅस्टिक’ समजलं जातं कारण यातून वेगवेगळं विष आपल्या शरीरात भिनतं. हे बनवण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेलं प्लॅस्टिक चालत नाही आणि हे पुनर्प्रक्रियेसाठी वापरता येत नाही.

पिळता येणाऱया बाटल्या, ब्रेडचं पॅकिंग, ड्रायक्लिनिंग करून येणाऱया कपडय़ांच्या बॅगा, वाण्याच्या दुकानात वापरल्या जाणाऱया पिशव्या हे सगळं नंबर चार प्लॅस्टिक — LDPE वा लो डेंसिटी पॉलिथिलिन. काही प्रकारचं फर्निचर आणि कपडेदेखील या प्लॅस्टिकपासून बनवतात. बाकी प्लॅस्टिकच्या मानाने हे कमी विषारी आणि वापरण्यासाठी सुरक्षित असतं. अलीकडे याच्या पुनर्प्रक्रियेसाठीही नव्या प्रक्रिया बनविल्या आहेत. प्लॅस्टिक नंबर पाच. दमटपणा, तेल आणि केमिकल्स यापासून बचावासाठी हे प्लॅस्टिक वापरलं जातं. उष्णतारोधक असल्याने हे पुनर्वापरासाठी चालतं. प्लॅस्टिक बाटल्यांची झाकणं, दही व बटरसाठी कंटेनर्स, टाकून देता येतील असे डायपर्स, स्ट्रॉज, बादल्या बनवण्यासाठी या प्लॅस्टिकचा उपयोग होतो.

सहा नंबरचे प्लॅस्टिक म्हणजे PS वा पॉलिस्टिरिन (नंबर सहा) स्वस्त, वजनाला हलकं आणि कोणताही आकार घेणारं असतं व ते पिकनिकसाठीची कटलरी, डिसपोझेबल कप, अंडय़ासाठी कार्टन्स, अशा अनेक गोष्टींसाठी वापरता येतं. माणसांच्या प्रकृतीवर या कॅन्सर देऊ शकणाऱया वा प्रजोत्पादनावर परिणाम करणाऱया प्लॅस्टिकमधील केमिकल्सचा परिणाम होतो. शक्य होईल तेव्हा याचा वापर टाळावा.

प्लॅस्टिक नंबर सात. यात इतर ×ÏèÔ– बिस्फेनॉल (Bisphenol A), पॉलिकार्बोनेट (PC) व लेक्सन –प्लॅस्टिक येतं. कारण या प्रकारांचं अजून पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर याबाबतचं प्रमाणीकरण झालेलं नाही. यांच्यातून अन्नात व पेयांमधे विष भिनणं नक्की आहे, कारण BPA असलेल्या पॉलिकार्बोनेटमधून भिनलेल्या क्सेनोस्ट्रेजिनमुळे अंतर्स्रावावर परिणाम होतो. लहानग्यांच्या बाटल्या, सिपी कप्स, गाडीचे पार्टस् हे यापासून बनवतात. शक्यतो हे वापरू नये. पुनर्वापरासाठी तर नाहीच.

सर्वसाधारणपणे 2, 4 व 5 या नंबरचे प्लॅस्टिक त्यातल्या त्यात बरं मानलं जातं. बाकीची प्लॅस्टिक्स तर शक्य तेवढी टाळावीच.
– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या