आगळं वेगळं – बाळाचं ‘नाव’ ठेवताना काळजी घ्या!

>> मंगल गोगटे

एखाद्या घरात बाळ येणार अशी खबर लागली की बाळाचं नाव काय ठेवायचं याबद्दल विचार करणं आणि नावं सुचवणं याची जणू स्पर्धा सुरू होते. अनेक वेळा तर परकीय वाटावी अशी नावं ठेवली जातात, ज्याचा अर्थ विचारावा लागतो. अनेकदा तर त्या मुलांनादेखील त्यांच्याच नावांचा अर्थ माहीत नसतो किंवा लहानपणी ती मुलंच स्वतःचं नाव नीट उच्चारू शकत नाहीत, मग त्याचा काहीतरी वेगळाच अपभ्रंश तयार होतो आणि तेच नाव मुलाला आयुष्यभर चिकटतं.

मुलांना नांव ठेवण्याचा पालकांचा हक्क अमेरिकन सरकारने नियंत्रित केलेला आहे. कुटुंबांतील इतर व्यक्ती तिरस्कार करतील असं वा इतर मुलं त्याची त्या नावामुळे टिंगल करतील असं नांव ठेवण्याची परवानगी इथल्या पालकांना नाही. तेथील अनेक राज्यांमध्ये नावात कुठे एखादाही आकडा नसावा असाही कायदा आहे. मुलाचं नाव किती लांब असावं यावरही बंधन आहे. शिवाय त्याचा काही अर्थ आहे की नाही हेही पाहिलं जातं.

काही काही देशांत तर बाळांची कोणती नावं ठेवण्याची परवानगी आहे, त्याची एक यादीच तयार केलेली आहे. सौदी सरकारने 50पेक्षा जास्त नांवांवर बंदी घातली आहे. कारण ती नावं फार परकीय, अयोग्य, तिरस्कारजन्य किंवा देशाच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरेला धरून नाहीत. तिथल्या सरकारने बंदी घातलेल्यांपैकी काही नावं आहेत, बिनयामीन, मलिका, मलक (म्हणजे देवदूत), लिंडा आणि माया.

पोर्तुगालमध्ये मुलांची नावं पारंपरिक पोर्तुगीज, लिंग दर्शक आणि पूर्ण असावीत असा कायदा आहे. पालकांना सोपं व्हावं म्हणून या देशाने एक चालू शकणाऱया व न चालू शकणाऱया नावांची एक 82 पानी यादी तयार केली आहे. त्यातली काही न चालणारी नावं आहेत, निर्वाण, रिहाना, जिमी, व्हायकिंग व सायोनारा…

न्यूझीलंडमध्ये राहणाऱया ज्या पालकांना आपल्या बाळाचं नाव, 100पेक्षा जास्त मुळाक्षरांतच ठेवायची इच्छा झाली असेल त्यांचं तर नशीबच वाईट म्हणायचं. कारण तिथे ल्युसिफर, तबुला डझ द हुला फ्रॉम हवाई, सेक्स फ्रूट, सिंद्रेला ब्युटी ब्लॉसम, फॅट बॉय असल्या प्रकारची नावं ठेवता येत नाहीत.

मेक्सिकोतील सोनोरा या दोन नंबरच्या राज्यात मानहानिकारक, काहीही अर्थ नसणाऱया व थट्टा करता येण्याजोग्या 61 नांवांवर बंदी घालण्यात आली आहे. उदाहरणार्थ फेसबुक, बॅटमॅन, रॅम्बो, हरमिऑन… मुलांना कुणी केवळ त्यांच्या नावामुळे चिडवू नये या उद्देशाने.

सोरचाई (मूर्ख), चौ टौ (वास येणाऱया डोक्याचा), चायनीज अह चवर (सर्प), खिऊ खू ( कुबड असलेल्या पाठीचा) ही नावं मलेशियात बंदी असलेली आहेत. असल्या नावांमध्ये प्राण्यांची नावं, अपमानकारक नावं, आकडे, राजघराण्यातील नावं व अन्नपदार्थांची नावं यांचाही समावेश आहे.

स्वीडननेदेखील स्पष्टपणे अयोग्य वाटणाऱया अथवा गैरसोयीची वा त्रासदायक वाटण्याऱया नावांवर (पहिलं नाव) बंदी घातली आहे. बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांच्या आत पालकांनी बाळाचं नांव नोंदवावं असा कायदाच आहे त्या देशाचा. अन्यथा कर अधिकाऱयांकडून पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

नॉर्वेमध्ये कोणतंही आडनाव पहिलं नाव म्हणून वापरता येत नाही. जसं की हॅन्सेन, हॉगन, ओल्सेन, जोहेनसन, लारसन. तरी आता तिथले कायदे जरा सैल झाले आहेत, तरी इतर काही कारणाने जर ठेवण्यासाठी सुचवलेलं नाव त्या बाळाला त्रासदायक होऊ शकणारं असेल तरी त्याला परवानगी मिळत नाही. नॉर्वेच्या लोकसंख्या नोंदणी पुस्तकात जर एखादं नांव मधलं नाव वा आडनाव म्हणून आधीच नोंदवलं गेलं असेल तर ते नावही बाळाला ठेवण्यास परवानगी मिळत नाही. यालाही अपवाद आहे तो असा की, जर त्या नावाला नॉर्वेमध्ये वा इतर देशात पहिलं नाव म्हणून परंपरा वा संस्कृती असेल तर ते नाव ठेवण्यास परवानगी आहे.

उत्पादनांची नावं, आडनावं, वस्तूंची नावं ही पहिलं नाव म्हणून जर्मनीत वापरता येत नाहीत. मुलाचं भलं होण्यापासून थांबवणारं नाव त्याला असू नये. किंवा पुढे त्याची नाचक्की होईल असंही घडू नये अशी खबरदारी तिथलं सरकार घेतं. त्यामुळे पालकांना ऍडॉल्फ हिटलर, ओसामा बिन लादेन, मॅटी, स्टॉम्प, को(ह्)ल अशी नांवं बाळासाठी वापरता येत नाहीत.

डेन्मार्कमध्ये तर कोपनहेगन युनिव्हर्सिटी व चर्चबाबत निर्णय घेणारं मंत्रालय मिळून दरवर्षी अनेक नावांचा पुनर्विचार करतात. आईसलॅंडमध्ये बाळाची नावं त्यांच्या भाषिक रचनेचा मान ठेवून बनवलेली व पारंपरिक स्पेलिंग असलेली असावी लागतात. स्वित्झर्लंडमध्ये नावांना सरकारी मंजुरी मिळवावी लागते.

तसं तर आणखीही अनेक देशांत बाळाचं नाव ठेवताना खूप विचार करूनच ठेवावं लागतं. आपल्याकडे मात्र अजून त्याबाबत कोणतेही कायदे नाहीत. तरीही परंपरेने काही गोष्टी टाळल्या जातात. ते बंधन आहेच.

– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या