आगळं वेगळं – खोकाबंद पिण्याचे पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगल गोगटे

आजकाल पाणी विकत घ्यावं लागतं. अनेकदा. विशेषतः घराबाहेर पडल्यावर. रेस्टॉरंटमधे, प्रवासात. खास करून लांबच्या प्रवासात. जवळपास जाताना आपण थोडं पाणी घेऊनच बाहेर पडतो. नंतर पटकन पाण्याची बाटली विकत घेतात सगळे. कारण बाहेर पडल्यावर ते पाणी सुरक्षित असल्याची आपली भावना असते. मात्र या शेकडो हजारो बाटल्या जगातलं प्लॅस्टिक वाढवत आहेत.

हे धोके लक्षात घेऊन यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात नवीन पर्यायी वस्तूचं उत्पादन सुरू झालं आहे – पाण्याच्या खोक्यांचं!! आता बाटल्यांऐवजी खोक्यातून पाणी विकलं जातंय. याचा मोठा फायदा असा आहे की खोक्यातल्या पाण्याची वाहतूक चांगल्या प्रकारे होते. शिवाय हे खोके पर्यावरणपूरक आहेत. 144 बिलियन डॉलर्सच्या जागतिक बाजारात पाणी खोक्यातून विकायला खूपच वाव आहे. अमेरिकेच्या बावीस राज्यांत, कॅनडा, मेक्सिको, हाँगकाँग आणि पुअर्टो रिकोमधे खोक्यातील पाणी उपलब्ध आहे. या पाण्याचं नाव आहे ‘बॉक्सड वॉटर इज बेटर.’ नावातच सगळं सामावलेलं आहे. हा खोका, अगदी वरच्या झाकणासह, पुनर्वापरयोग्य आहे. याचा 74 टक्के भाग प्रमाणित, शाश्वत व्यवस्थापित जंगलामधून बनवलेल्या कागदाचा वापर करून बनवला आहे आणि रिव्हर्स ऑस्मोसिस आणि अल्ट्राव्हायोलेट फिल्टरव्दारे पाणी शुध्द केलं जातं.

एका ट्रकच्या किमतीच्या बाटलीबंद पाण्यासाठी खोक्यातील पाणी 26 ट्रक किमतीचे पाण्याचे कार्टन वितरीत करू शकतात. शिवाय एका ट्रकमधे गोलाकार बाटल्यांपेक्षा एकावर एक ठेवलेले पाण्याचे खोके कितीतरी जास्त राहतात. खोकाबंद पाणी चांगल्या कार्टन्समधे असतं. यात 74 टक्के कागद, 1 टक्का ऍल्युमिनियम आणि 25 टक्के प्लॅस्टिक वापरलेलं असतं. अर्थात प्लॅस्टिक हे कागद वॉटरप्रूफ राहण्यासाठी गरजेचं आहे.

2018 मधे सुमारे 600 दशलक्ष कुटुंबं बाटलीबंद पाणी वापरत होती आणि त्यानंतर आता लोकसंख्येत कितीतरी वाढ झाली आहे. लोकांत आता जास्त शुध्द पाणी पिण्याबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. पूर्वीसारखं मिळेल तिथे विहिरीचं वा नदीचं पाणी प्यायला वापरणं योग्य वाटत नाही. त्यामुळे दरवर्षी बाटलीबंद पाण्याची मागणी सुमारे 118 अब्ज गॅलन किंवा एक दशलक्ष बाटल्या प्रती मिनिट एवढी आहे. कारण बाटलीबंद पाणी प्रवासासाठी अत्यंत सोयीचं आहे. क्लोरीनमुळे नळाच्या पाण्याची चव आवडत नाही. आता त्यातही अनेक प्रकारच्या चवीचं पाणी उपलब्ध आहे आणि बाटलीबंद पाणी जास्त स्वच्छ आहे. शिवाय कितीही म्हटलं तरी प्रत्यक्षात सगळ्या बाटल्या पुनर्वापरासाठी जात नाहीत. जगभर अनेक लोक प्लॅस्टिक कमी करण्यासाठी पुढाकार घेत असूनही समुद्रात सगळीकडे प्लॅस्टिक दिसत आहे. अनेकांनी नळाचं पाणी पिणं पूर्णपणे थांबवलं आहे.

या सगळ्याचा विचार करता आता जगाने बाटल्या वापरण्याचं बंद करून पर्यायी गोष्टी वापरायची गरज आहे. जसं पाण्याचे कागदाचे खोके पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. हे खोके आता एक नवीन जीवनशैली देण्याचा प्रयत्न करत आहेत. या खोक्यांचा कागद जो 74 टक्के आहे तो नष्ट होतो, परंतु पाण्याच्या बाटलीचा 100 टक्के भाग लडफिलमधे हजारो वर्ष राहतो. या खोकेबंद पाण्याने नुसती नवीन जीवनशैली नाही तर अत्यंत डिस्पोजेबल उत्पादनाचे निर्माण, पॅकेज आणि वितरण या सगळ्याला नवीन दृष्टी दिली. काही उच्चभ्रू लोकांमधे तर बाटलीतलं पाणी वापरणं हे खालच्या दर्जाचं मानलं जातं. खोक्यातील पाणी हाच ‘नॉर्म’ आहे आणि विशेष म्हणजे हे ऍमेझॉन कंपनीदेखील पुरवत आहे.

‘कॅरो वॉटर’ (Caro water) हे आपल्या देशातलं पहिलं ‘वॉटर बॉक्स’ आहे. अनेक वर्षांपासून आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी संघर्ष करत आहोत. आपल्याकडे अजूनही पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या वापरण्याचं प्रमाण खूप आहे. लोकांनी अजूनही पाण्याच्या खोक्यांच्या वापराचा विचार केलेला नाही. कारण अर्थातच ते आपल्याकडे फारसं उपलब्ध नाही. परंतु आता लवकरच ते बाजारात दिसू लागेल अशी चिन्हे आहेत. सुरुवातीस ते महाग असलं तरी जसजशी पर्यावरणप्रेमी या टिकाऊ पर्यायाची मागणी वाढवत नेतील तसतसं भविष्यात ते स्वस्तही होत जाईल, यात शंका नाही. सगळ्यात मोठा फायदा हा की हे खोके 36 टक्के कमी कार्बन फूटप्रिंट तयार करतात, 43 टक्के कमी जीवाश्म इंधन वापरतात आणि ओझोनवर 95 टक्के कमी परिणाम करतात.
 [email protected]