
>> मंगल गोगटे
केदारनाथ… हिंदू धर्मानुसार चार धामपैकी एक म्हटलं तर चुकीचं ठरू नये इतपं महत्त्व असलेलं. कारण त्यात आहेत बद्रीनाथ (सत्ययुगाचे धाम), रामेश्वर (त्रेतायुगाचे धाम), द्वारका (द्वापारयुगाचे धाम ) आणि जगन्नाथ पुरी ( कलियुगाचे धाम ). तरीही जोपर्यंत केदारनाथचं दर्शन होत नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण झाली असे मानत नाहीत. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही छोटी चार धाम यात्रा मानली जाते. केदारनाथ हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सगळ्यात उंचावर आहे. या सगळ्यात देवदर्शनाइतकाच प्रवासही महत्त्वाचा मानला जातो. पदयात्रेत तपस्या म्हणून यात्रेकरूने अनवाणी व वाहन आणि छत्रीशिवाय प्रवास करावा असं म्हटलं जातं. आजकाल हेलिकॉप्टरने ही यात्रा करणं जमवता येतं.
केदारनाथ मंदिर तीन बाजूंनी उंच पर्वतांनी घेरलेलं आहे. एका बाजूला 22 हजार फूट उंचीचं केदारनाथ शिखर आहे. दुसरीकडे 22,600 फूट उंचीचं खर्चपुंड आणि तिसऱया बाजूला आहे 22,700 उंचीचं भरतपुंड. इथे पाच नद्यांचा संगमसुद्धा होतो – मधुगंधा, मंदाकिनी, सरस्वती, स्वर्णगौरी आणि क्षीरगंगा! यापैकी काही नद्या आता लोप पावल्या आहेत, परंतु अलकनंदाची उपनदी मंदाकिनी आजही आहे. हिच्या किनाऱयावरच केदारनाथ मंदिर आहे. इथे हिवाळ्यात खूप बर्फ असतो आणि पावसाळ्यात भरपूर पाणी. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3584 मीटर आहे. त्यामुळे इथे पोचणं खूप कठीण आहे. अनेकांना हे माहीत नाही की इथे कोणत्याही मूर्तीची पूजा होत नाही. फक्त शिवलिंग आणि शाळिग्रामाची पूजाअर्चा होत असे, परंतु काळानुसार शाळिग्रामच्या जागी विष्णू आणि कृष्ण यांच्या मूर्तींची व शंकराच्या मूर्तीची स्थापना झाली.
केदारनाथबाबत अनेक धार्मिक विश्वास आहेत. केदारनाथाच्या दर्शनासाठी निघालेला भक्त रस्त्यातच मरण पावला तरी त्याला मुक्ती मिळते. इथे आल्यावर पूजा करून जर त्याने पाणी प्यायलं तर त्याचा पुनर्जन्म होत नाही. यावरून लोकांच्या भक्तीची कल्पना येते. असं मानलं जातं की काशी, गुप्तकाशी व उत्तरकाशी शंकराच्या त्रिशूळावर वसले आहेत आणि तिथूनच स्वर्ग वा पाताळाला जाणारा रस्ता आहे. मंदिराच्या गर्भगृहाकडे जाणाऱया मोठय़ा राखाडी पायऱयांवर पालीमध्ये कोरलेले शिलालेख सापडतात. दाराबाहेर एक दगडी नंदी उभा आहे.
सध्याच्या विज्ञानाच्या म्हणण्यानुसार केदारनाथ मंदिराची निर्मिती ही साधारणतः 8 व्या शतकात झाली असावी. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथे अस्तित्वात आहे. केदारनाथ येथील भूभागाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशी आजही 21 व्या शतकातही पाहायला मिळते. अशा प्रतिकूल जागेत एखादी रचना उभी करायची म्हणजे किती अवघड आहे. केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी आजही चांगले रस्ते नाहीत. पृथ्वीवर सन 1300 ते 1700 या काळात मोठी हिमवृष्टी होऊन या काळात हे मंदिर बर्फाखाली गाडलं गेलं होतं. तरीसुद्धा बांधकामाला कोणतेही नुकसान झालेलं दिसत नाही. हे मंदिर वैशाखीनंतर उघडले जाते आणि दीपावलीनंतर पाडव्याला बंद होते. 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर मंदिराचे पुजारी या मंदिरात दिवा लावतात. पुढचे 6 महिने तो तेवत राहतो आणि 6 महिन्यांनी हे मंदिर उघडल्यावर हा दिवा जळताना आढळतो.
हे मंदिर प्राचीन कात्यहरी शैलीत बनवलेलं असून त्याचं छत लाकडी असून त्यावर सोन्याचा कलश ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी प्रलयसदृश झालेल्या पावसाने हे मंदिर वाहून न जाण्याचं कारण केवळ त्याची उत्तर-दक्षिण दिशा आहे. शिवाय बांधकामासाठी अत्यंत मजबूत असा वालुकाश्म दगड (जो इथला नाही, तर तो इथे आला कसा व कुठून?) वापरलेला असून हे दगड ‘एशलर’ पद्धतीने एकमेकांत गुंफलेले आहेत. त्यामुळे वातावरणातील प्रचंड तापमान बदलाचा कोणताही परीणाम या दगडांच्या जोडणीवर होत नाही. प्रलयाच्या वेळी एक मोठी शिळा मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार विभागली गेली व मंदिर आणि आत आश्रय घेतलेले लोक सुरक्षित राहिले. उंची 85 फूट, रुंदी 80 फूट, लांबी 187 फूट आणि 12 फूट जाडीच्या भिंती, 6 फूट चबुतऱयावर बांधण्यासाठीचं विज्ञान त्यावेळीसुद्धा किती प्रगत असेल.































































