ललित – फजिती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर 

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

रिसेप्शनचा सोहळा. गंपू सहवर्तमान हजर होता. हॉलमध्ये गर्दी उसळलेली. गंपूनं नव्या कोऱया नेहरूशर्ट पायजम्याची घडी मोडलेली. बायकोही पैठणीत सजलेली. हॉलमध्ये शिरल्या शिरल्या दोघांची ताटातूट झाली! हा पुरुषांमध्ये आणि ती बायकांमध्ये अशी वाटणी झाली. त्या गर्दीत गंपू आणि मित्रमंडळीचा हास्य विनोद रंगला होता.

‘काय गंपूशेट! नवीन नेहरूशर्ट वाटतं?’
‘हो ना! कालच घेतला!’
‘मस्तय! कितीला पडला रे?’
‘थोडा महाग पडला. एक हजार!’
‘आयला! भारीय! पण मस्त दिसतोय!’

अशा गप्पा चालल्या होत्या. थोडय़ाच वेळात सगळ्यांनी जेवणाकडे मोर्चा वळवला. आपापल्या डीशेस भरून घेऊन एका निवांत कोपऱयात सगळा घोळका जमला. हसत खेळत गप्पा आणि जेवणं चालू झाली. जेवण झाल्यावर हात धुवायला गंपू मागे गेला. हात धुतल्यावर पाणी प्यायला म्हणून ग्लास हातात घेऊन पाण्याच्या जार समोर वाकला, आणि ‘कट’ असा आवाज झाला! त्याच क्षणी त्याला जाणीव झाली की पायजमा कंबरेपाशी ढिला झाल्यासारखा वाटतोय! चाचपून पाहिले तर त्याची शंका खरी ठरली होती. पायजम्याचा नाडा तुटला होता. त्याने गडबडीने एका हाताने शर्टावरूनच खाली घसरणारी पॅण्ट सावरून धरली. एका हातात पॅण्ट धरलेली आणि दुसऱया हातात पाण्याचा ग्लास अशा अलौकिक अवस्थेत गंपू हैराण होऊन उभा राहून मनातल्या मनात दुकानदाराला शिव्यांची लाखोली वाहत उभा होता! आता नेमके काय करावे हे त्याला समजेना! त्याने पाणी पिऊन ग्लास ठेवला आणि थोडा अंधाऱया एकांत जागी जाऊन नेहरूशर्ट वर करून नेमक्या अपघातस्थळाची पाहणी करायचा प्रयत्न केला. दिसलं तर काहीच नाही, पण पायजम्याने कंबरेचा ठाव पूर्णपणे सोडलेला लक्षात येताच गंपूचाही ठाव सुटला! आता एवढय़ा गर्दीत बायकोला कुठे शोधायचं, आणि इथून कसं निघायचं या दोन गहन समस्या त्याच्या समोर उभ्या होत्या. एका हाताने शर्टच्या आत हात घालून त्याने पायजम्याची एक बाजू घट्ट धरून ठेवली होती! ते दिसायला थोडं विसंगत दिसत होतं, पण इलाज नव्हता. त्यातच एकाने ‘गंपूशेट, आईक्रीम घ्या!’ म्हणून त्याच्यासमोर कप धरला, तेव्हा सवयीने डावा हात पुढे करण्याच्या बेतात गंपू असतानाच विजारीच्या पकडलेल्या घोळाची पकड सुटण्याची वेळ आली होती, पण वेळीच सावरल्यामुळे पुढचा अनावस्था प्रसंग टळला!’ अरे, मी आताच आईक्रीम घेतलं!’ असं काहीतरी म्हणत पुढे सटकला. त्याची नजर बायकोला शोधत होती. एक हात शर्टच्या आत आणि एक हात मोकळा अशा अवतारात तो हॉलमध्ये फिरत होता. येणारे जाणारे त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. शेवटी एकदाची बायको दिसली! मैत्रिणींच्या घोळक्यात हसतखेळत जेवण चाललं होतं. त्याने हातवारे करून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एक हात हलवून दुखू लागला, पण त्या माऊलीचं लक्ष जाईना! पण तिच्या बाजूच्या एकीचं लक्ष गेलं.

‘कोण आहेत गं ते? बघ ना हात कसे हलवताहेत!’
तेव्हा बायकोचं लक्ष गेलं!
‘काय हो?’
तिनं तिथूनच ओरडून विचारलं. गंपू चिडला. त्याने तिला त्याच्याकडे येण्याची खूण केली. तिनेही जरा थांबा अशी परतीची खूण केली आणि परत गप्पांमध्ये सामील झाली! गंपूला आता काय करावं समजेना. तेवढय़ात यजमान समोर आले!
‘काय साहेब! जेवण केलंय ना?’
‘हो हो, हे काय आताच झालं. छान बेत होता बरं का!’ वगैरे बोलून कनवट सांभाळत दूर झाला! दहा मिनिटांनंतर बायको उठली. शांतपणे पाणी वगैरे पिऊन गंपूजवळ आली.
‘काय हो? कशाला बोलवत होता? आणि असे का उभे आहात? पोटात कळ आली की काय?’
‘तू चल आधी येथून!’
‘अहो पण का? घरी जाऊन तरी काय करायचंय?’
‘माझे आई, कृपा कर आणि चल!’
‘अहो पण एवढी गडबड कशासाठी करताय?’
‘इथं सांगू शकत नाही! रस्त्यात सांगतो, अगोदर चल!’
एव्हाना बायकोच्या चेहऱयावर रडवेले भाव साकारले होते!
‘मला अगोदर सांगा!’ तिनं हट्ट धरला! तिच्या मनात नाना कुशंका थैमान घालू लागल्या होत्या!
‘तसं काही नाही, पण अगोदर चल!’
शेवटी ती त्याच्या मागोमाग बाहेर आली.
‘गाडीत बस!’
ती बसली. गंपूही बसला आणि त्याने सुटकेचा निःश्वास सोडला!
‘आतातरी सांगा!’ बायकोने काळजीने विचारलं.
गंपूने कनवट सोडली! आता काही धोका नव्हता! त्याने शर्ट वर केला आणि बायको हसत सुटली.
‘असंय होय? मग तिथेच का नाही सांगितलं?’
‘सगळ्यांसमोर सांगायचं होतं का, पायजम्याची नाडी तुटली म्हणून?’
बायकोला हसू आवरेना, आता गंपूही तिच्या हसण्यात सामील झाला होता!
[email protected]