
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
आमच्या सोसायटीत आमची ज्येष्ठ नागरिकांची एक ‘तरुण’ टोळी आहे. कुणी साठी पार, कुणी सत्तरी पार, तर कुणी ऐंशी पार! प्रश्न वयाचा नाही, एकदा साठी ओलांडली आणि ज्येष्ठत्वाचे लेबल लागले की, सगळे एकाच मापामध्ये येतात! यातला प्रत्येक जण ‘‘मी कसा ‘फिट’ आहे’’ हे दाखविण्याच्या प्रयत्नात! एखाद्याच्या कमरेला कुस्तीत दिल्या जाणाऱया बेल्टसारखा बेल्ट बांधलेला असतो, पण हा बेल्ट तात्पुरता आहे हे सांगत असतो. एखाद्या वेळी हसता हसता शेजाऱयाच्या मांडीवर थाप मारताना त्याची ‘नी कॅप’ हाताला लागते तेव्हा ‘‘परवा पाय लचकला होता ना…’’ म्हणून सारवासारव करतो. एखादा दर पंधरा मिनिटांनी करंगळी वर करून वेगाने नाहीसा होऊन जातो! एखादा त्रस्त ‘‘आयला! कालपासून ‘दोन नंबर’ झालीच नाही’’ असं कानात सांगून जातो. थोडक्यात, म्हातारपण शरीरात भिनत असतानाही आपल्यातलं मानसिक तरुणपण जिवंत ठेवण्याचा अट्टहास कौतुकास्पद! त्यात अर्थात मीही आलोच! यात अनेक घोटाळेही होत असतात, पण याचे पर्यवसान म्हणा, शेवट म्हणा, सुखात होऊन जात असतो हेही खरे! काय? पटत नाही? मग माझे हे अनुभव ऐका. सॉरी, वाचा!
सोसायटीच्या पार्कमध्ये सगळे खिदळत बसलेले. माझ्या बाजूला भोपळे.
‘‘दादा, शिंदे साहेबांचा नंबर आहे का?’’
‘‘आहे ना!’’
‘‘सांगा ना!’’ मी नंबर सांगितला. शिंदे म्हणजे आमच्या सोसायटीतले, आमच्या टोळक्यातले. भोपळ्यांनी फोन लावला.
‘‘हॅलो! मी भोपळे बोलतोय! ’’
‘‘बोला!’’
‘‘आमच्या घरी आज हळदीकुंकू आहे, तेवढं तुमच्या मिसेसना सांगा!’’
‘‘कुठशिक?’’ फोन स्पीकरवर होता.
‘‘अहो, असं काय करता? मी भोपळे, भोपळे!’’
‘‘कोन भोपळे?’’ भोपळे हैराण! त्या संवादात मी उडी घेतली!
‘‘अहो शिंदे साहेब, मी बोलतोय उदगीरकर!’’
‘‘बोला की, उदगीरकर साहेब! अवो, कुटं हाव काय न्हाय? फोन नाय काय नाय, रागावला का काय आमच्यावर?’’ माझ्या डोक्यात हजार कॅन्डलचा उजेड भक्कन लागला. चुकून परभणीतल्या माझ्या मित्राला फोन लागला होता! मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यापासून माझा चष्मा गेला या आत्मविश्वासाला तडा गेला होता! पण ‘चुकून’ लागलेल्या फोनने त्यानंतर माझ्या पदरात सुख टाकलं ते अवर्णनीय! घटकाभर परभणीत गेल्याचा भास झाला!
पुणे- परभणी गाडीने निघालो होतो. मस्त लोअर बर्थ मिळालेला. रात्रीचे दहा वाजलेले. सेकंड एसीचा डबा. सगळं मनासारखं जमून आलेलं. आता गाडी सुटली की, टिफिन उघडायचा, हाणायचं आणि ताणून द्यायची असा विचार करत असतानाच कंपार्टमेंटचं दार ढकलून एक व्यक्ती प्रवेश करती झाली. इनशर्ट, सडसडीत चण, नाकावर घसरणारा चष्मा परत परत नाकावर ठेवण्याची स्टाइल, एका क्षणात ओळख पटली… नंद्या! मला आनंदाचं भरतं आलं. मी जागचा उठलो आणि त्याच्या पाठीत सणसणीत बुक्का घातला आणि ओरडलो,
‘‘अबे नंद्या!’’ ते गृहस्थ सावकाश मागे वळले आणि माझ्या अंगाचे पाणी पाणी झाले! ते वेगळेच कुणीतरी निघाले!
‘‘सॉरी सर! मला वाटलं आमचा नंदूच आहे! एक्सट्रीम्ली सॉरी!’’
‘‘त्यात ‘सॉरी’ म्हणण्यासारखं काय आहे? मी कुणीतरी ओळखीचा भेटतोय का हे शोधतच फिरत होतो, तुमची आपोआपच ओळख झाली! आजच्यापुरता मला तुमचा नंदू समजा!’’ मी आश्वस्त झालो.
‘‘आपला परिचय?’’
‘‘मी भारद्वाज! नंदकुमार भारद्वाज!’’ त्यांनी डोळे मिचकावले.
माझ्या अधू दृष्टीनं माझ्या जुन्या ओळखीचा जीर्णोद्धार केला होता आणि एका नवीन ओळखीचा पाया रचला होता. म्हातारपणातल्या या ‘ठेचा’ कधी कधी हव्याहव्याशा होऊन जातात. या नव्या-जुन्या ओळखी इंद्रधनुष्य होऊन मानसिकतेच्या क्षितिजावर साकार होऊन जातात, ऊर्जा देऊन जातात, जगायला ऊर्जा देऊन जातात…!





























































