
>> डॉ. मंजिरी भालेराव
हिंदुस्थानातील विविध वास्तू या त्यांच्या स्थापत्यापेक्षा कधी कधी तिथे असलेल्या शिल्पांमुळे जास्त प्रसिद्ध असतात. ही शिल्पे एका विशिष्ट काळाच्या आणि प्रदेशाच्या चौकटीत बनलेली असतात. त्या त्या काळात काही विशेष हेतू मनात ठेऊन त्यांची निर्मिती झालेली असते. काळाच्या ओघात ते सगळे संदर्भ नाहीसे होतात आणि त्या शिल्पांचे प्रयोजन, अर्थ समजेनासा होतो. हिंदुस्थानात तर मोठय़ा प्रमाणात असे घडलेले दिसते. त्या ओळख विसरलेल्या शिल्पांची नव्याने ओळख देणारी ही मालिका…
कमळावर आरूढ झालेल्या या दोन हात असलेल्या देवीच्या दोन्ही बाजूला चार हत्ती सोंडेत कलश घेऊन उभे असलेले हे शिल्प जगप्रसिद्ध वेरूळच्या इ.स. च्या 8व्या शतकातील कैलास लेण्यात प्रवेश करताना समोरच दिसते. तिला नमस्कार करून मगच मंदिरात प्रवेश करायचा हे यातून स्पष्ट होते. या शिल्पाशेजारी एक छोटासा शिलालेख आहे. त्यामध्ये तिला ‘जलक्रीडालक्ष्मी’ आणि शेजारच्या हत्तींना ‘उदधीचंड’ असे म्हटले आहे. ते आपल्या सोंडेतल्या त्या कलशातील पाण्याने देवीला अभिषेक करत आहेत. अशा प्रकारचे रूप असलेली ही देवता अगदी प्राचीन काळापासून हिंदुस्थानात अतिशय महत्त्वाची आहे. श्रीसूक्तामध्ये ‘हस्तिनादप्रबोधिनि’ असे वर्णन केलेली आधी सर्जनाचे आणि त्यामुळे आलेल्या समृद्धीचे प्रतीक असलेली ही देवता आहे. वैदिक आणि पौराणिक हिंदू परंपरेत हिला अपरंपार महत्त्व असल्याचे आपल्याला दिसते. पण वेदप्रामाण्य न मानणाऱया जैन आणि बौद्ध परम्परांमधेही या देवतेला खूप महत्त्व होते, असेही दिसते. प्राचीन हिंदुस्थानी कलेत गजलक्ष्मीचे अंकन हे कमीत कमी दोन हजार वर्षांपूर्वीपासून पाहायला मिळते. इ.स. पूर्व 2ऱया शतकातील मध्य प्रदेशातील भारहूत येथील बौद्ध स्तूपावर या देवतेचे अंकन 2 ते 3 वेळा पहायला मिळते. इथे एका कुंभातून निघालेल्या कमळाच्या फुलांवर देवी कधी उभी तर कधी बसलेली दाखवली आहे. तिच्या दोन्ही बाजूला हत्ती सोंडेत कलश घेऊन उभे दाखवले आहेत. त्या कलशातील पाण्याने ते देवीवर अभिषेक करत आहेत. यामध्ये मुळातच कुंभ हे सर्जनाचे म्हणजे खरे तर स्त्राrच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे. यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेमध्ये असा उल्लेख येतो. त्यामुळे ज्या समृद्धीची निर्मिती व्हायची आहे ती कुम्भातूनच होणार या कल्पनेतून हे कमळाचे देठ कुम्भातूनच आलेले दाखवले आहेत. कमळसुद्धा पावित्र्याचे आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. हत्तीही त्यांच्या सोंडेत धरलेल्या कुंभातून पाण्याचा अभिषेक करताना दाखवले आहेत. या देवतेच्या शिल्पाची मूळ संकल्पना ही पृथ्विमातेवर हत्तीरूपी ढगांनी करायचा पर्जन्याचा अभिषेक ही आहे. त्यामुळे इथे लक्ष्मी ही कोणी विशिष्ट देवता न मानता खरे तर पृथ्वीमाता आणि तिच्यावर होणारा पर्जन्याचा वर्षाव हीच संकल्पना यामागे आहे. त्यामुळे आदिम कालापासून या रूपकाचे पूजन होत आहे. पावसामुळे जशी संपूर्ण धरती धन धान्याने समृद्ध होते तशी समृद्धी (धान्याची आणि मुलाबाळांची) आम्हाला मिळो अशा विचारांनी या शिल्पाची निर्मिती झाली असावी. त्यामुळे सर्व जाती आणि धर्माच्या कक्षा ओलांडून या देवतेची उपासना सर्व लोक करत असत असे दिसून येते.
गजलक्ष्मी ही संकल्पना आणि तिची शिल्पे हिंदुस्थानातील अनेक प्रांतांतच नव्हे तर परदेशातही पोचलेली दिसतात. कंबोडिया येथील बांते श्राय या मंदिरातही एक अतिशय देखणे शिल्प पाहायला मिळते. श्रीलंकेतील पोलोनरुवा येथील गलपोथा नावाने प्रसिद्ध असलेल्या मोठया शिलालेखाच्या शिलेवर एका बाजूला गजलक्ष्मीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे.
अशा प्रकारे हिंदुस्थानी संस्कृतीने आणि स्मृतीने शेकडो वर्ष जपलेले हे प्रतीक ही भूमी सुजलाम् आणि सुफलाम् होण्यासाठी आणि भक्तांच्या आयुष्यात समृद्धी येण्यासाठी केलेली एक अनंत काळाची प्रार्थना आहे.



























































